‘आझादी’च्या अनाठायी वल्गना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2018   
Total Views |

 
”भारताला कधीही स्वातंत्र्य मिळणार नाही, असे ब्रिटिश म्हणायचे. पण, अखेरीस लोकांच्या इच्छाशक्तीपुढे त्यांना झुकावे लागले, देश सोडावा लागला,” असे संतापजनक विधान फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते मीरवाईज उमर फारुख यांनी केले. त्याआधी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी ”तुमची ‘आझादी’ची मागणी कधीही पूर्ण होणार नाही,” अशा शब्दांत फुटीरतावाद्यांना आणि काश्मिरातील दगडफेक्यांना ठणकावले होते. मीरवाईज यांनी लष्करप्रमुखांच्या याच वक्तव्याला प्रतिसाद देत वरील उत्तर दिले. सय्यद अली शाह गिलानी, यासीन मलिक, मीरवाईज उमर फारुख यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे नव्हे तर विषवल्ली जम्मू-काश्मिरात गेल्या कित्येक वर्षांपासून फोफावल्याचे आपण पाहिले. भारतापासून ‘आझादी’ मिळवून कफल्लक झालेल्या पाकिस्तानकडून आपल्या ताटात काही पडते की काय, याची वाट पाहणारी ही सारी मंडळी.

स्वतःच्या फालतू राजकीय महत्त्वाकांक्षेपायी सर्वसामान्य काश्मिरी नागरिकांचे वाटोळे झाले तरी त्याचे कोणतेही वैषम्य न वाटणारी यांची कार्यपद्धती. या लोकांना ना काश्मिरी नागरिकांच्या भवितव्याची चिंता ना त्यांच्या सोयी-सुविधा-आर्थिक उत्कर्षाची ना विकासाची. फुटीरतावाद्यांना काळजी ती फक्त स्वतःचा मतलब साधण्याची. त्याच मतलबापायी लष्कर-ए-तोयबासारखी दहशतवादी संघटना, पाकिस्तान आणि आयएसआयने फेकलेल्या तुकड्यांना दाताखाली घेऊन ही लोकं शेपट्या हलवत बडबडत असतात. काश्मिरी तरुण-तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत त्यांच्याकडून दगडफेक करवून घेत असतात. आताही आपल्या बोलवित्या धन्यांपुढे काश्मिरी जनतेतील स्वतःच्या तथाकथित प्रभावाची शेखी मिरवण्यासाठी फुटीरतावाद्यांनी भारताला, भारत सरकारला, भारतीय लष्करालाच ब्रिटिशांची उपमा देण्याचा उद्दामपणा केला. यामागे जसा भारताला डिवचण्याचा उद्देश दिसतो, तसाच सर्वसामान्य काश्मिरींच्या मनात ’आपण आणि ते’ अशी सरळसरळ विभागणी करण्याचा कावा असल्याचेही लक्षात येते. आज जम्मू-काश्मिरातील जनतेला ज्या सोयी-सुविधा, जे स्वातंत्र्य, जी विकासाची संधी भारत सरकार देते, त्याच्या एक दशांशही पाकिस्तान देऊ शकणार नाही. फाळणीवेळी जी मुस्लीम कुटुंबे पाकिस्तानात गेली, त्यांना आजही तिथे समाजातील सर्वात खालच्या स्तरांत म्हणजे मोहाजिरांमध्येच गणले जातेे. दुसरीकडे आज पाकिस्तानची अवस्था भुकेकंगाल देशासारखी आहे. अशा देशाच्या आश्रयाला जाऊन काश्मिरी जनतेला दुःख आणि दैन्याशिवाय काय मिळू शकते? हे कळत असूनही फक्त स्वतःची सत्तालालसेची भूक शमविण्यासाठी सर्वसामान्य काश्मिरी जनतेच्या सुखदुःखाची फिकीर नसलेली फुटीरतावादी मंडळी ‘आझादी’चे नारे लगावताना दिसतात.


000000
मीरवाईजची तथ्यहीन तुलना


जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग असल्याचे सर्वांनाच मान्य आहे, पण जित्याची खोड जशी मेल्याशिवाय जात नाही, तशी पाकिस्तान, आयएसआय, दहशतवादी संघटना आणि त्या जोडीला फुटीरतावादी नेत्यांची आझादीच्या किंकाळ्या फोडण्याची सवय जाताना दिसत नाही. मीरवाईज उमर फारुख हे ‘आझादी’च्या किंकाळ्या फोडणार्‍या टोळीचेच प्रतिनिधी. लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या वक्तव्याला उत्तर म्हणून त्यांनी जे वक्तव्य केले, त्यात ब्रिटिशांनी भारतावर 100 वर्षे राज्य केल्याचा, हजारो भारतीयांची हत्या केल्याचा उल्लेख केला. शिवाय लोकांच्या इच्छाशक्तीसमोर ब्रिटिशांना झुकावे लागल्याचे, देश सोडावा लागल्याचेही त्यांनी म्हटले. मुळात भारत हा ब्रिटनशी आणि ब्रिटन हा भारताशी कधीही कोणत्याही प्रकारे धर्म, संस्कृती वा ऐतिहासिक वारशाने जोडलेला देश नव्हता. काश्मीर मात्र हजारो वर्षांपासून भारताचाच घटक असल्याचे कित्येक दाखले सापडतात. त्यामुळे मीरवाईज फारुखनी केलेली तुलना बिनडोकपणाचीच म्हटली पाहिजे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यावेळी ब्रिटिशांविरोधात लढण्याची, स्वातंत्र्य मिळवण्याची उर्मी आणि प्रबळ इच्छाशक्ती कोट्यवधी भारतीयांच्या मनात स्वयंस्फूर्तीने निर्माण झाली. त्या शक्तीच्या जोरावरच भारतीयांनी ब्रिटिशांना इथून हुसकावून लावले, तर सर्वसामान्य काश्मिरींच्या मनात सुरुवातीपासूनच भारताबद्दल नितांत आदर, प्रेम आणि आस्था असल्याचे दिसते. तसे जर नसते तर संपूर्ण देशातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांनी कधी प्रवेश घेतलाच नसता आणि देशवासीयांनीही त्यांना आपलेपणाची वागणूक दिली नसती. म्हणजे दोन्हीकडची आत्मीयतेची भावना सारखीच असल्याचे दिसते. शिवाय काश्मिरी जनतेने लोकशाही प्रक्रियेत कधी सहभागच घेतला नसता, पण आज काश्मिरातले सरकार आणि प्रशासन हे भारतीय संविधानानुसारच चालते. उलट जे ‘आझादी’ची मागणी करतात, ते लोक दहशतवादी संघटना, पाकिस्तान वा आयएसआयच्या इशार्‍यावर दगड फेकणारे भाड्याचे पित्तेच असल्याचे नेहमीच उघड होते. दिवसात, आठवड्यात, महिन्यात अमुक वेळा दगडफेक केल्यास त्यांना त्याची बिदागीही मिळते. अशांना कसले स्वातंत्र्यसैनिक म्हणायचे? हे तर पेडसैनिक! खरे म्हणजे स्वतःची तुलना स्वातंत्र्यसैनिकांशी करणार्‍या मीरवाईज उमर यांनी आधी स्वतःची लायकी तपासली पाहिजे. आपले जनतेच्या मनातले स्थान काय, जनता आपल्या इशार्‍याबरहुकूम वागायला खरेच तयार आहे का? हे पाहिले पाहिजे. कारण तिथले चित्र नेमके उलटे आहे. मूठभर पाठीराखे सोडल्यास बाकीचे सर्वच दगडफेके, स्वातंत्र्याच्या प्रेरणेने नव्हे तर दमडीसाठी जमणारेच असतात. अशा लोकांना ‘आझादी’ तर मिळत नसतेच, उलट देशविरोधी कारवाया केल्याने त्याची शिक्षा नक्कीच मिळत असते.


- महेश पुराणिक
@@AUTHORINFO_V1@@