कारवारमध्ये अस्तित्वाची लढाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


हेगडे हे केंद्रात भाजपचे प्रतिनिधीत्व करत असून या भागामध्ये भाजपचा जोर आणि वर्चस्व वाढविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे, तर कारवार, कुमठा आणि भटकळ मतदारसंघातील उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारीही त्यांना पेलावी लागणार आहे.

गोव्यातून कर्नाटकात येण्याचे प्रवेशद्वार म्हणजे कारवार. एकीकडे अरबी समुद्र तर दुसरीकडे पश्चिम घाटाने समृद्ध असलेल्या कारवारमध्ये सध्या निवडणुकीमुळे वातावरण कमालीचेच तापलेले पाहायला मिळत आहे. पर्यटनासाठी चर्चेत असलेला कारवार सध्या निवडणुकीदरम्यान होणार्‍या बंडखोरीमुळे चर्चेत आला आहे. कारवार असेल किंवा कुमठा असेल अशा काही मतदारसंघांना बंडखोरीची लागण झाली आहे. असे असले तरी जिल्ह्यात काँग्रेस यावेळी ’क्लीन स्वीप’च्या प्रयत्नात आहे. कारवारमध्ये गेल्या निवडणुकीत सहापैकी पाच जागांवर काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यामुळे याठिकाणी सहापैकी सहा जागा जिंकण्याचा निर्धार काँग्रेसने केल्याचे प्रकर्षाने जाणवते.

कारवारमध्ये प्रामुख्याने उद्योगमंत्री आर. व्ही. देशपांडे यांचा प्रभाव जाणवतो. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांची प्रतिष्ठादेखील पणाला लागली आहे. जिल्ह्यात काँग्रेसचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणजे भाजप. तर गेल्या निवडणुकांमध्ये खातेही उघडता न आलेल्या निजदची प्रतिष्ठाही यानिमित्ताने पणाला लागली आहे. 2008 साली झालेल्या निवडणुकांमध्ये कुमठा आणि हल्याळ मतदारसंघात निजदच्या उमेदवारांना विजय मिळाला होता. मात्र, 2013 मध्ये त्यांना हार पत्करावी लागली. परिणामी पुन्हा जिंकण्यासाठी निजदनेही स्वत:ला झोकून दिले आहे. काँग्रेसचा विचार केला तर 2013 साली झालेल्या निवडणुकांमध्ये हल्ल्याळ, यल्लापूर आणि यल्लापूर मतदार संघात काँग्रेसने बाजी मारली होती, तर कुमठा आणि भटकळ मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता. मात्र, बंडखोरी करत कुमठा आणि भटकळच्या उमेदवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि या दोन्ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या. यानंतर शिर्सी हा एकमेव मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राहिला होता. त्यामुळे यावेळी सहापैकी पाच मतदारसंघांवर आपले वर्चस्व टिकवण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. भाजपच्या ताब्यात असलेला शिर्सी हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेसची मोठी कसरत सुरू आहे तर दुसरीकडे भाजपनेही पुन्हा आपले वर्चस्व प्राप्त करण्यासाठी तगडे उमेदवार देत काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

निजदचा विचार केला तर 2008 साली मिळालेले यश 2013 साली पार पडलेल्या निवडणुकांमध्ये निजदला टिकवता आले नाही. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये आपली राजकीय पत मिळवण्याची मोठी जबाबदारी निजदला पार पाडावी लागणार आहे.

हल्ल्याळ, शिर्सी, यल्लापूरमध्ये शिवसेना इन


हल्ल्याळ, शिर्सी आणि यल्लापूरमध्ये शिवसेनेने एन्ट्री घेतली आहे. मात्र, केवळ तीनच मतदारसंघांवर उमेदवार का? याचा मात्र खुलासा शिवसेनेकडून करण्यात आला नाही. या भागात शिवसेनेची ताकद कमी असली आणि मतदारांवर फारसा प्रभाव नसला तर त्यांना मिळणारी काहीशे मतं ही इतर उमेदवारांसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेने हल्ल्याळमधून शंकर फाकरी, शिर्सीतून आण्णाप्पा कडगेरी आणि यल्लापूरमधून सचिन नाईक यांना रिंगणात उतरवले आहे.

देशपांडे आणि हेगडे यांची कसोटी


हेगडे हे केंद्रात भाजपचे प्रतिनिधीत्व करत असून या भागामध्ये भाजपचा जोर आणि वर्चस्व वाढविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे, तर कारवार, कुमठा आणि भटकळ मतदारसंघातील उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारीही त्यांना पेलावी लागणार आहे. दुसरीकडे काँग्रेसचे आर. व्ही. देशपांडे हे जिल्ह्यातील मोठे प्रस्थ मानले जातात. तीन दशकांपेक्षा अधिक राजकारणाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. अशातच त्यांची प्रतिष्ठादेखील पणाला लागली आहे. आपल्या मतदार संघातून निवडून येण्याबरोबरच काँग्रेसच्या इतर उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. त्यांनी या ठिकाणी अनेक विकासकामे केली असली तर भाजपच्या सतीश हेगडे यांचे तगडे आव्हान त्यांच्यासमोर आहे. तसेच या ठिकणी जेडीएस, शिवसेना आणि अपक्ष उमेदवार त्यांच्यावर किती परिणाम करतात हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यात काँग्रेस, भाजप, निजद हे तिन्ही पक्ष बंडखोरीच्या समस्येने ग्रासलेले आहेत. कुमठ्यात काँग्रेसच्या कृष्णा गौडा यांनी तर भाजपच्या सूरज नाईक आणि यशोधर नाईक यांनी बंडखोरी केली आहे. निजदची परिस्थिती पाहिली तर एकंदरीत ही निवडणूक त्यांच्यासाठी आर या पार की लढाई ठरण्याची शक्यता आहे. निजदलाही बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता असून हल्ल्याळसारख्या मतदारसंघात बंडखोरी करत चंद्रशेखर यांनी निजदच्या उमेदवारासमोरच आव्हान उभे केले आहे.

संवेदनशील भटकळ मतदारसंघ


कारवार जिल्ह्यातील भटकळ हा मतदारसंघ संवेदनशील मतदारसंघ मानला जातो. या ठिकाणी काँग्रेसच्या महांकाळू वैद्य आणि भाजपच्या सुनील नाईक यांच्यात अटीतटीचा सामना रंगण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे निजदवर नामुष्की ओढवून घेण्याची वेळ आली आहे. निजदच्या इनायततुल्ला शाबंद्री यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने निजदवर नामुष्की ओढवून घेण्याची वेळ आली आहे. भटकळ मतदारसंघात मुस्लीम समाजातील मतदारांची संख्या जास्त असल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, समाजाकडून मिळणारा अल्प प्रतिसाद पाहता त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा या ठिकाणी होत आहे, तर संवेदनशील असलेल्या या मतदारसंघात निवडणुका शांततेने पार पाडण्यासाठी प्रशासनाचीही कसोटी लागणार आहे. या ठिकाणी बर्‍याच दिवसांपासून सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि कर्नाटक पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे छावणीचे स्वरूप प्राप्त झालेल्या या मतदारसंघात कोण बाजी मारेल, हे येणारा काळच ठरवणार आहे.

हुबळी धारवाडमध्ये शेट्टरांचे विशेष लक्ष

हातमाग आणि वस्त्रोद्योग क्षेत्रामुळे धारवाड जिल्हा सर्वांच्याच परिचयाचा आहे, परंतु हुबळी धारवाड पूर्व मतदार संघातील निवडणूक यावेळी चुरशीची ठरणार आहे. मादीग, चलवादी समाजाबरोबरच सावजी समाजातील मते ही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रसाद अब्बय्या यांनी 42 हजार 353 मते मिळवत विजय मिळवला होता, तर यावेळीही काँग्रेसकडून प्रसाद अब्बय्या यांनाच उमेदवारी देण्यात आली असून भाजपकडून चंद्रशेखर गोकाक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गोकाक हे प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही त्यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. तसेच भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनीदेखील या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. तसेच शेट्टर हे यावेळी धारवाड मध्यमधून निवडणूक लढवत असून यापूर्वी तब्बल ते पाच वेळा निवडून आले आहेत. येडियुरप्पा यांच्यानंतर लिंगायत समाजातून आलेले प्रभावी असे शेट्टर दुसरे मोठे व्यक्तिमत्त्व मानले जातात. शेट्टर यांनी आपल्या कार्यकाळात राबवलेली विकासकामे आणि त्यांची मतदारांमध्ये असलेली प्रतिमा ही त्यांच्यासाठी यावेळी फायद्याची ठरण्याची शक्यता आहे. 1994 साली शेट्टर हे हुबळी धारवाड मध्य येथून पहिल्यांदा विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांचा यावेळीही विजय निश्चित मानला जात आहे.


- जयदीप दाभोळकर
@@AUTHORINFO_V1@@