Raazi Movie Review : भावनाप्रधान राझी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



साल १९७१. भारत-पाकिस्तान मधील युद्धाचा काळ. याच काळात एक घटना घडली आणि यामुळे भारत देशाच्या हिताने पुढे अनेक गोष्टी घडत गेल्या. 'कॉलिंग सहमत' या नावाची हरिंदर सिक्का यांनी एक कादंबरी लिहिली होती आणि याच कादंबरीवर आधारित 'राझी' हा चित्रपट नव्याने आपल्या या घटनेचे अनेक पैलू मोठ्या पडद्यावर उलगडून दाखवतो. भारतातील आरुषी तलवार हत्याकांडाचा अतिशय किचकट विषय दिग्दर्शनाच्या पदार्पणातच हाताळणाऱ्या मेघना गुलजार यांनी 'राझी'चे दिग्दर्शन केले आहे त्यामुळे अर्थातच ज्यांनी मेघना यांचा 'तलवार' बघतीला असेल त्यांना 'राझी' कडून बऱ्याच अपेक्षा असतील. विशेष म्हणजे मेघना यांनी ही अपेक्षा पूर्ती करण्याचा आपल्यापरीने पुरेपूर प्रयत्न केला असल्याचे दिसून येते.
 
'राझी' ट्रेलर बघितल्यावर किंवा गुगल वर सेहमत खान असं जरी सर्च मारलं तरी साधारण ही घटना नेमकी काय होती याची इत्यंभूत माहिती मिळून जाते. दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या सेहमतवर एक दिवशी अचानक पाकिस्तानात जाऊन गुप्तहेर म्हणून काम करण्याची वेळ येते आणि त्यासाठी पाकिस्तानातील लष्करात मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या परवेझ सय्यद यांच्या कुटुंबात परवेझ यांचा मुलगा असणाऱ्या इकबालशी सहमतच लग्न होतं आणि तिथूनच 'राझी'चा हेरगिरीचा प्रवास सुरु होतो.
 
 
भारत-पाक संबंधावर भाष्य करणारे अनेक चित्रपट आजपर्यंत बॉलिवूडने आपल्याला दाखवले पण 'राझी'चं यातही वेगळेपण जाणवतं. कारण पाकिस्तान असा शब्द जरी उच्चरला तरी आपल्याला त्याबद्दल एक वेगळीच ईर्षा निर्माण होते, पण 'राझी' बघताना आपण फक्त 'सेहमत'शी संबंधित घडणाऱ्या घटनांचा विचार करतो. तिथे पाकिस्तानचा द्वेष क्वचितच आपल्या मनात निर्माण होतो आणि हेच मेघना यांच्या हाताळणीच वैशिट्य आहे. 'ए वतन' हे गाणं असेल किंवा हद्द पार करण्याचे काही सीन्स असतील या प्रत्येकातून भारत-पाकिस्तान संबंधांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकने मेघना यांनी आपल्याला दाखवला आहे. इथे युद्ध, हाणामारी पेक्षा भावनांना अधिक प्राधान्य आहे. एका विद्यार्थिनीच्या, एका देशप्रेमाच्या, एका बायकोच्या भावनांवर हा चित्रपट अधिक भाष्य करतो.
 
भवानी इय्यर आणि मेघना गुलझार यांनी पटकथेवर प्रचंड काम केल्याचे दिसून येते. हेरगिरीची पद्धत, त्यांचे प्रशिक्षण, पाकिस्तान गेल्यावर येणाऱ्या अडचणी, त्यावर सेहमतने खुबीने केलेली मात, या सगळ्या गोष्टी अगदी बारकाव्यानिशी चित्रपटात मांडल्या आहेत. पण राहून राहून एक बाब मात्र खटकत राहते आणि ती म्हणजे ज्या पद्धतीने सेहमत या सगळ्या गोष्टी घडवून आणते त्या खूपच सोप्या दाखवल्या आहेत. ती जेव्हा या सगळ्या ऍक्टिव्हिटी करत असते तेव्हा तेव्हा घरात कोणीच कसं नसतं, पाकिस्तानी लष्करातील एवढ्या मोठ्या हुद्द्यावरील अधिकाऱ्याचे घर सुरक्षेच्या दृष्टीने फारच प्रार्थमिक दर्जाचे दाखवण्यात आले आहे, किंवा जेव्हा सेहमत हेर असल्याचे तिच्या नवऱ्याला कळते तेव्हाची त्याची प्रतिक्रियाही फिल्मी वाटते. वरील २-३ गोष्टी सोडल्या तर 'राझी' एका वेगळ्या प्रकारचे चित्रण करण्यात नक्कीच यशस्वी ठरला आहे, यात शंका नाही.
 
चित्रपटातील पहिली ३-४ दृश्य वगळली तर नंतरच्या प्रत्येक दृश्यात आपल्याला आलिया भटचा वावर प्रकर्षाने जाणवतो. तिनेही सेहमत खूप छान साकारली आहे. पण 'राझी' मधल्या सेहमत पेक्षा अजूनही तिचा 'हायवे' किंवा 'उडता पंजाब' मधला अभिनय अधिक सशक्त वाटतो. 'राझी' मध्ये बऱ्याच ठिकाणी तिने अधिक जास्त अभिनय करण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथेच ती फसलीये. बाकी जयदीप अहलावत (भारतीय गुप्तहेर अधिकारी) आणि विकी कौशल (सेहमतचा नवरा) या दोघांनी अगदी सहज अभिनय केलाय. या चित्रपटातील व्यक्तिरेखांसाठी त्यांची केलेली निवड अगदी योग्यच आहे असच म्हणावं लागेल. याशिवाय मराठमोळ्या अमृता खानविलकरचही विशेष कौतुक करायला हवं. तिनेही पाकिस्तानी बायकोची भूमिका बखुबी निभावलीये.
बाकी चित्रपटात गुलझार यांचे शब्द आहेत, शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत आहे, जम्मू काश्मीरचं निसर्ग सौंदर्य आहे आणि मेघना यांचा भारत-पाकिस्तान संबंधांकडे बघण्याचा वेगळा ऍप्रोच देखील आहे. देशासाठी आपले प्राण पणाला लावून गुप्तपणे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एकदातरी 'राझी' चित्रपट बघायलाच हवा!
-----
राझी
आलिया भट, विकी कौशल
दिग्दर्शक : मेघना गुलजार
साडेतीन स्टार
----
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@