आपत्तीग्रस्त जग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2018   
Total Views |

’जगाच्या पाठीवर’ सध्या विपरीत घटना घडत आहेत. माणसाने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कितीही प्रगती केली तरी निसर्गाच्या ताकदीपुढे आपलं काही चालत नाही, हे खरं. सध्या जग मोठ्या अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या काळातून जात आहे. उत्तर पॅसिफिक महासागरातल्या ‘हवाई’ बेटांवरच्या सुप्रसिद्ध किलाऊ ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला. गेला आठवडाभर तिथे सुरू असलेल्या सततच्या ज्वालामुखीच्या उद्रेकांनी तिथल्या लोकांना सळो की पळो करून सोडले आहे. ज्वालामुखी ही अशी एक आपत्ती आहे की, ज्याच्यात जीवितहानी फारशी होत नसली तरी वित्तहानी मात्र खूप होते. ‘किलाऊ’ हा जगातला सर्वात मोठा क्रियाशील ज्वालामुखी. १९८३ पासून या ज्वालामुखीचे कमी-अधिक प्रमाणात उद्रेक सुरू आहेत. १९९० साली या ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला होता. त्यात तिथल्या गावांचं आणि संपत्तीचं मोठं नुकसान झालं होतं. गेल्या आठवड्यात ३ मे रोजी या ज्वालामुखीचा पुन्हा मोठा उद्रेक झाला. आगीच्या ज्वाळांनी तप्त लाव्हारस हवाई बेटांवरील घरं आणि मालमत्ता गिळंकृत करत चालला आहे. या ज्वालामुखीने आत्तापर्यंत सुमारे ३० घरं गिळंकृत केली असून सुमारे दोन हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. अर्थात, किलाऊ ज्वालामुखी हे अलीकडे एक जागतिक पर्यटनस्थळ झालं होतं. ज्वालामुखीयुक्त प्रदेश पाहण्यासाठी तिथे जगभरातून पर्यटक जातात. त्यामुळे तिथे पर्यटन उद्योगही वाढला आहे. मात्र, आत्ता झालेल्या संहारक उद्रेकामुळे तिथली घरं आणि हॉटेल्स, गाड्या लाव्हारसात गाडल्या गेल्या आहेत आणि उष्णतामान प्रचंड वाढलं. त्यामुळे तिथलं पर्यटन विस्कळीत होऊन संपत्तीचं मोठं नुकसान झालं आहे. येणार्‍या दिवसांमध्ये या ज्वालामुखीचे आणखी संहारक उद्रेक होण्याची शक्यता भूगर्भशास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आफ्रिका खंडातल्या केनिया, सोमालिया, युगांडा, टांझानिया या देशांमध्ये पडलेल्या भयंकर दुष्काळानंतर आता तिथे अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. मार्चपासून सुरू असलेल्या या अतिवृष्टीने आतापर्यंत सुमारे दीडशे लोकांचा बळी घेतला असून सुमारे सव्वादोन लाख लोकांना दुसरीकडे हलवावं लागलं आहे. कालच दक्षिण केनियाच्या भागात एक धरण फुटून २७ लोकांचा बुडून मृत्यू झाला. तेथील सोलई गावात रात्री लोक झोपलेले असताना अचानक धरण फुटून महापूर आला आणि अख्खी घरंच्या घरं वाहून गेली. ‘रेडक्रॉस’ संस्थेच्या पाहणीनुसार, मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत तिथे सुमारे २१ हजार एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. पुरामुळे भूस्खलनही तिथे मोठ्या प्रमाणावर होत असून त्यात सुमारे २०० लोक मरण पावल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गेली सलग तीन वर्षे दुष्काळ पडलेला हा प्रदेश यंदा महापुराने उद्ध्वस्त झाला आहे.

तिकडे हे पूरनाट्य चालू असतानाच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या प्रदेशात काल दोन सणसणीत भूकंपाचे धक्के बसले. अफगाणिस्तान-ताजिकिस्तानच्या सीमेवर बुधवारी ६.२ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला, ज्यात घरांची पडझड होऊन लोक जखमी झाले. त्याच दिवशी पाकिस्तानच्या खैबर-पख्तुन्वा प्रांतात ५.५ रिश्टर स्केल आणि ६.४ रिश्टर स्केल क्षमतेच्या दोन भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांना हादरा दिला. हा भूकंप दिल्लीपर्यंत जाणवला. सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही.
एका बाजूला ही अस्मानी संकटं ओढवलेली असताना सुलतानी (मानवनिर्मित) संकटांची त्यात भर पडत आहे. सीरियामधले हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. नुकतेच इस्रायलने सीरियामध्ये असलेल्या इराणच्या तळांवर जोरदार हवाई हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही इस्रायलच्या लष्करी तळांवर हल्ला केला. सीरिया ही आता युद्धभूमी झाली आहे. इस्रायल आणि इराण सीरियाच्या भूमीत एकमेकांवर हल्ल्याच्या तयारीत उतरले आहेत. यामुळे तिथे युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकीकडे आर्थिक विकासाची पावलं टाकत असताना या वाढत्या अस्मानी आणि सुलतानी संकटांबाबतची सावधानता आणि त्यांना तोंड देण्याची तयारी जगातल्या प्रत्येक देशाला बाळगावीच लागेल.


- हर्षद तुळपुळे
@@AUTHORINFO_V1@@