अनुभवाची किंमत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |




जीवनात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मिळालेल्या अनुभवांमुळे आपण परिपक्व होत जातो. काही वेळा खूप लहान वयातच निरनिराळे बरे – वाईट अनुभव मिळाल्यामुळे वयाच्या मानाने maturity जास्त दिसते काही जणांमध्ये. कोणत्या प्रसंगात कसे वागावे, कोणते निर्णय घ्यावे अशा प्रश्नांची उत्तरे आधी प्राप्त केलेल्या अनुभवांच्या आधारेच आपण घेत असतो. पण हे कोणतेही अनुभव आपल्याला मोफत मिळत नाहीत. कमी अधिक प्रमाणात त्यांची किंमत प्रत्येकानेच मोजलेली असते. हे विचार चक्र सुरु झाले ते एका रिक्षेवाल्याच्या बोलण्यामुळे. रिक्षात बसल्या बसल्या त्याने बोलायला सुरुवातच केली. “ताई, हल्ली कोणावर विश्वास ठेवण्याचे दिवसच नाहीत बघा! चांगल्या वस्तीत रिक्षा उभी करून जेवायला गेलो होतो. कागदपत्रं ठेवायला ही छोटीशी डिकी करून घेतली सीट जवळ. पण कुठून बुद्धी झाली आणि त्या दिवशीची ६०० रु. ची कमाई पण तिच्यात ठेवली. डिकीतून रुपये गेलेच पण माझी बँकेची पासबुकं आणि कार्ड पण गेलं.“
“अहो दादा पैसे बँकेत का नाही जमा केलेत?”
“ मुलगी जाणार होती पैसे घेऊन बँकेत, पण तिची परीक्षा सुरु आहे, वेळ नको वाया जायला म्हणून नको म्हणालो. उद्या एकदम भरू पैसे असा विचार केला. पैसे गेल्याच्या दुःखापेक्षा कागदपत्रं गेल्याचं दुःख जास्त आहे. पुन्हा बँकेचं पासबुक मिळवा, कार्डासाठी अर्ज करा, धंद्याचा वेळ यातच जाणार. एकाच पिशवीत रुपये, पासबुक आणि कार्ड ठेवण्याचा मूर्खपणा केला. आता कानाला खडा! “ त्याची कैफियत ऐकून मनात आलं याच्या अनुभवाची किंमत ६०० रुपये आहे.
सर्वांनाच अनुभव इतके स्वस्तात मिळतील असं नाही अर्थात त्या रिक्षेवाल्याला ही किंमत जबरच होती. काही वेळा व्यवसायातील फसलेल्या पार्टनरशिप, चुकलेले आडाखे, कोणीतरी दिलेल्या शब्दांवर ठेवलेला अनाठायी विश्वास, नफ्या – तोट्याची गणिते, यातून मिळालेल्या अनुभवाची शिदोरी खूपच महागात पडते. कधी हजारात, लाखात, कोटीत किंवा कधी बेघर होण्याची किंमतही चुकवावी लागते या शिदोरीसाठी.
अनुभवातून आलेलं शहाणपण घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं. ‘ पुढच्यास ठेच, मागचा शहाणा ‘ हे ऐकायला बरं वाटतं पण ते नेहमी उपयोगी पडेलच असं नाही. कारण प्रत्येकाचे रस्ते वेगळे, त्यामुळे अडथळे वेगळे आणि म्हणूनच ठेच लागण्याच्या वेळा आणि ठिकाणेही वेगळी. त्यामुळे ही अनुभवाची शिदोरी ज्याने त्याने, ज्याची त्याची मिळवावी लागते. किंमतही स्वतःच चुकवावी लागते.
आपल्याला आलेले माणसांचे अनुभव, आपले समाजातील वागणे ठरवतात. ज्याला स्वतःला पडत्या काळात कोणी मदत केली नसेल, तो माणूस एकतर कधीच कोणाला मदत न करणारा होतो किंवा आपल्यासारखी परिस्थिती दुसऱ्याची होऊ नये म्हणून सदैव गरजूंच्या मदतीसाठी तत्पर, असा होतो. एका अर्थी त्या माणसाला आलेल्या विपरीत अनुभवाची किंमत दुसरा पण अप्रत्यक्ष रितीने चुकवतो.
लहान मूल सुद्धा अनुभवातूनच शिकतं. पिवळ्या केशरी लवलवत्या ज्योतीला उत्सुकते पोटी हात लावल्यावर बसलेला चटका, ही त्याने अग्निसंबंधी मिळवलेल्या धोक्याच्या अनुभवाची किंमतच असते. अर्थात अशा अनुभवांची किंमत त्याच्या जीवावर बेतू नये याची खबरदारी घरचे घेतातच. तरीसुद्धा छोट्या छोट्या किमतीचे अनेक अनुभव घेत घेतच ते मोठे आणि परिपक्व होत असते.
काही अनुभव सुंदर असतात. पण त्यांचीही, थोड्या वेगळ्या प्रकारची किंमत असतेच. सूर्योदयाचे मनोहारी रंग अनुभवायचे असतील तर पहाटेच्या साखरझोपेच्या मोहाची किंमत द्यावीच लागते. सरळ रस्त्यांवर विनासायास चालण्याचे सुख सोडून, प्रसंगी दमछाक करणारा चढाचा रस्ता घ्यावाच लागतो.
आपल्या संतांनी पण हे अनुभवाचे महत्त्व जाणलेले होते. ग्रंथांची नुसती पारायणे करून, भारंभार ग्रंथ वाचून काहीच उपयोग नाही. ग्रंथ मुखोद्गत असूनही जर आपल्या आयुष्यात त्यातील शिकवणुकीचे जराही प्रतिबिंब नसेल तर अशा संतसाहित्याचा हेतूच निरर्थक होतो. म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात
“ नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी | एक तरी ओवी अनुभवावी || “
आयुष्यात आलेले अनुभव आपण ठरवून घेतलेले नसतात. ते आलेले असतात. पण ज्ञानेश्वरी, दासबोध असे ग्रंथ अनुभवण्यासाठी समजून उमजून प्रयत्न करावे लागतात, त्यांचे वाचन, मनन, चिंतन करावे लागते. मार्गदर्शन मिळवावे लागते. लौकिक आयुष्यातील काही मोहांचा नाद सोडावा लागतो, वेळ द्यावा लागतो. ही धडपडच या अनुभवाची किंमत असते. पण या किंमतीच्या बदल्यात मिळणारा ‘ अनुभव ‘ अनमोल असतो. आयुष्याचे सोने करणारा असा अनुभव मिळणार असेल तर त्यासाठी दिलेली कोणतीही किंमत क्षुल्लकच नाही कां?
दगड देऊन जर परीस मिळत असेल तर हा ‘ घाटेका सौदा ‘ नक्कीच नाही !
- शुभांगी पुरोहित
@@AUTHORINFO_V1@@