कावळ्याच्या शापाने कधी गाय मरते का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2018   
Total Views |


नेहरू घराण्यातील चौथ्या पिढीनेही संघाविरुद्ध गरळ ओकणे चालूच ठेवले आहे, हेच अशा वक्तव्यावरून वरचेवर दिसून येत आहे. केंद्रातील सत्ता गेली, विविध राज्येही हातातून गेली. मग अशा स्थितीत भाजप, संघावर तोंडसुख घेण्याशिवाय हाती उरते काय ? पण, कावळ्याच्या शापाने गाय कधी मरत नसते, हे राहुल गांधी यांना कोणीतरी सांगायला हवे!

मुघलांच्या सैन्यास संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांची एवढी भीती वाटत असे की, त्यांच्या घोड्यांनी पाण्यास तोंड न लावल्यास, ‘’तुला पाण्यात संताजी-धनाजी दिसतात काय रे?”, असा प्रश्न त्यांना केला जात असे! त्या दोघा मराठा सेनानींचे नाव घेतले तरी मुगल सैन्याची पाचावर धारण बसत असे! हे उदाहरण आठवायचे कारण म्हणजे आजच्या घडीला काँग्रेस आणि विरोधी पक्षांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दिसत आहे. भाजप आणि संघाचा धसका घेतलेल्या या मंडळींना, आपल्या मार्गातील हे मोठे अडथळे वाटत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लढण्याच्या राणा भीमदेवी घोषणा केल्या जात आहेत. हे आजचेच नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उच्चाटन करण्याच्या घोषणा पंडित नेहरू यांच्या काळापासून त्यांचा पणतू असलेल्या राहुल गांधी यांच्यापर्यंत अनेक रथी-महारथींनी केल्या. पण, या घोषणा प्रत्येकवेळी हवेत विरून गेल्या. घोषणा करणारेही आठवेनासे झाले.

काँग्रेस पक्षाने दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या सभेत 2019 साली होणार्‍या लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले. येणार्‍या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका काँग्रेसच जिंकणार, असे त्यांनी त्या ‘जनआक्रोश’ सभेत घोषित केले. त्याचवेळी काँग्रेस पक्षातील सर्वांनी एकजुटीने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध ठामपणे उभे राहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. नेहरू घराण्यातील चौथ्या पिढीनेही संघाविरुद्ध गरळ ओकणे चालूच ठेवले आहे, हेच अशा वक्तव्यावरून वरचेवर दिसून येत आहे. केंद्रातील सत्ता गेली, विविध राज्येही हातातून गेली. मग अशा स्थितीत भाजप, संघावर तोंडसुख घेण्याशिवाय हाती उरते काय ? पण, कावळ्याच्या शापाने गाय कधी मरत नसते, हे राहुल गांधी यांना कोणीतरी सांगायला हवे!

या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी जी वक्तव्ये केली आहेत त्याने कोणालाही हसू आल्यावाचून राहणार नाही. काँग्रेस निवडणुका जिंकणारच, याचे स्पष्टीकरण देताना, ”आमच्या कार्यकर्त्यांनी आपले रक्त आणि घाम गाळला आहे. ते पक्षासाठी उन्हातान्हात उभे राहतात. वो शेर का बच्चा और सत्य का सिपाही है,” असे त्यांनी म्हटले. ”सत्यासाठी लढताना ते सर्व काही सहन करतात,” असेही ते म्हणतात. काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे नेते व कार्यकर्ते खरेच एवढे सत्यासाठी लढणारे असते तर जनतेने त्यांना का झुगारून दिले असते? पण, अशा अडचणींच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून दिली जात नाहीत. अपेक्षितही नाहीत.

नरेंद्र मोदी सरकारने ज्या चांगल्या गोष्टी केल्या, त्याबद्दल काँग्रेस आणि अन्य विरोधक एक अवाक्षर काढत नाहीत. तेच तेच जुने मुद्दे उगाळून टीका केली जात आहे. मोदी यांनी घोषित केल्याप्रमाणे, आज देशातील सर्व गावात वीज पोहोचली आहे. पण, काळा चष्मा घातलेल्या विरोधकांना त्या प्रकाशाऐवजी अंधारच दिसणार ना! मोदी यांच्या विदेश दौर्‍यामधून काहीच साध्य झाले नाही, असे विरोधकांना वाटते. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि मोदी यांच्या वुहान येथे झालेल्या भेटीतून हाती काही लागले नाही, असे राहुल गांधी यांना वाटते. सदैव देशाचा विचार करणारे आणि त्यासाठी कार्य करीत असलेले पंतप्रधान मोदी वुहानला काय हवापाण्याच्या गप्पा मारायला गेले होते? पण उगाच बोलत सुटायचे!

लोकशाही संकटात आल्याची आवई उठवायची, संसदेतील कामकाजात अडथळे आणायचे आणि मग अविश्वास ठराव येऊ दिला नाही म्हणून बोंबाबोंब करायची. न्या. बी. एच. लोया मृत्युप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुस्पष्ट निकाल दिला असतानाही त्याबद्दल काँग्रेस नेत्यांनी संशय व्यक्त करायचा! टू जी स्पेक्ट्रम प्रकरणी निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे कौतुक, पण न्या. लोया मृत्युप्रकरणी दिलेला निकाल पाहून न्यायालयाविषयी संशय, असली ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका! लोकशाहीवर विश्वास असल्याचे म्हणायचे, पण त्या लोकशाहीत राज्यसभा अध्यक्षांनी त्यांना असलेल्या अधिकारात, महाभियोगाची नोटीस फेटाळून लावण्याचा घेतलेला निर्णय मात्र विरोधकांना अमान्य!

काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘जनआक्रोश’ सभेवर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी जोरदार टीका केली आहे. “जनादेशामुळे घराणेशाही आणि घराणेशाहीचे शिलेदार सत्तेतून बाहेर फेकले गेले आहेत. हा जनआक्रोश नसून ‘कुटुंबआक्रोश’ आहे. काँग्रेसने देशातील प्रत्येक संस्थेचे नुकसान केले असल्याने त्या पक्षाने देशाची माफी मागितली पाहिजे,” अशी मागणीही अमित शाह यांनी केली आहे, तर राहुल गांधी यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा आम्हीच जिंकणार असल्याची जी घोषणा केली आहे, त्यावर भाजप नेते आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी टीका केली आहे. “अशी वक्तव्ये करून राहुल गांधी दिवास्वप्ने पाहात आहेत. अशी स्वप्ने त्यांनी जरूर पाहावीत, पण पंतप्रधानांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये,” असे त्यांनी म्हटले आहे.

एकूण पाहाता वातावरण चांगलेच तापू लागले आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांची जुळवाजुळव चालू आहे. प्रत्येक मुद्दा केंद्र सरकारची बदनामी करण्यासाठी कसा वापरता येईल, असा प्रयत्न चाललेला आहे. लोकांना चिथावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा सर्व वातावरणात कर्नाटक राज्यात येत्या 12 मे रोजी मतदान होत आहे. त्या राज्यात काय होणार, याचे अंदाज वर्तविण्यास कथित सेफॉलॉजिस्ट मंडळींनी प्रारंभ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटक निवडणुकीपासून काहीसे लांब राहत असल्याचा प्रचार तथाकथित बुद्धिवादी पत्रकार मंडळी करीत आहेत, पण अशा अपप्रचारास भाजपनेते पी. मुरलीधर राव यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या आधीच कर्नाटकमध्ये सभा घेतल्या आहेत. आता त्यांच्या आणखी सभा राज्यात होतील. त्यामुळे पंतप्रधान लांब राहत असल्याचा प्रश्नच कोठे उपस्थित होतो?, असा सवाल त्यांनी केला आहे. मोदी यांची लोकप्रियता आणि जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास ही आमची जमेची बाजू असल्याचे मुरलीधर राव यांनी स्पष्ट केले. “निवडणूक लक्षात घेऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे ज्या खेळी खेळले आहेत, त्या राज्यातील जनता पुरेपूर ओळखून आहे,” असेही मुरलीधर राव यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कर्नाटक दौरा आजपासून सुरू होत आहे. तेथे त्यांच्या 15 सभा होणार आहे, तर भाजप अध्यक्ष अमित शाह 30 सभांमध्ये आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 20 सभांमध्ये भाषण करणार आहेत. केंद्रीय मंत्री अनंतकुमार, के. एस. ईश्वरप्पा यांच्यासह सर्वच नेते कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आपल्याच पक्षाचे सरकार राज्यात येईल, असा विश्वास बी. एस. येडीयुरप्पा यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटक राज्यात काय घडते याचे चित्र येत्या 15 दिवसांत स्पष्ट होणार आहे.



- दत्ता पंचवाघ
@@AUTHORINFO_V1@@