बोंडअळी नियंत्रणासाठी प्रभावी उपाय राबवा : फुंडकर

    09-Apr-2018
Total Views |

खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना विशेष सूचना




बुलढाणा :
गेल्या वर्षी खरीपात बोंडअळीच्या संकटामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागले. त्यामुळे यंदा बोंडअळीवर नियंत्रणासाठी प्रभावी उपाय राबवा, तसेच बियाणे कंपन्यांकडून बियाण्यांच्या पाकिटासोबतच फेरोमन सापळे देखील द्या, असे आदेश पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत. जिल्ह्याच्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे काल जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी फुंडकर बोलत होते.
बोंड अळीमुळे यंदा शेतकऱ्यांच्या कसल्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून यंदा विशेष काळजी घेण्याचे निर्देश फुंडकरांनी दिले. बोंड अळीवर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना जागरूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन हे फेरोमन सापळे शेतकऱ्यांना बियाण्यांच्या पाकिटासोबत देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या जनजागृतीकरीता गावागावांत सभा घेण्यात येणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांना कमी कालावधीत येणाऱ्या कापूस बियाण्यांची लागवड आणि हंगामपूर्व कापूस लागवड न करण्यासाठीसुद्धा जागृत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याच बरोबर जिल्ह्यातील बियाणे, पिक कर्ज, शेती साहित्य, वीजपुरवठा या सर्व गोष्टींचा देखील फुंडकर यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच या सर्व गोष्टींच्या नियोजनासाठी अधिकाऱ्यांना विशेष सूचना देत, कोणत्याही शेतकऱ्याला कसलाही प्रकारचा त्रास होता कामा नये, असे देखील निर्देश त्यांनी दिले.