सरकारला 'ऑफलाईन' करण्यासाठी सज्ज व्हा : तटकरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018
Total Views |

 
 
दहिवडी (सातारा) : हे सरकार धनगर समाजाला आरक्षण देणार नाही. लिंगायत समाजाचे ऐकून घेणार नाही. कारण यांना या गोष्टीचे राजकारण करायचे आहे. जनता याला मतपेटीतून उत्तर देईल. २०१९ साल हे परिवर्तनाचे साल घोषित करून जनतेने या सरकारला खाली खेचले पाहिजे. या सरकारला घरी बसवण्यासाठी, ऑनलाईनच्या नादाला लागलेल्या सरकारला ऑफलाईन करण्यासाठी सज्ज व्हा! असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. राष्ट्रवदाी काँग्रेस पक्षातर्फे सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनात आज सातव्या दिवशी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी येथे जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.
 
 
 
२०१४ साली लोकांसमोर गुजरात मॉडेल ठेवण्यात आले. देशाचा विकास गुजरातसारखा करण्यात येईल, असे लोकांना भासवले गेले. त्यामुळे २०१४ साली देशात सत्ताबदल झाला. मोठ्या प्रमाणावर आश्वासने दिली गेली. मात्र, प्रत्यक्षात आज तसे चित्र दिसत नाही. देशभराच्या राजकीय वातावरणात बदल करण्यात भाजपला यश आले. पण या सरकारला हे यश टिकवता आले नाही असे तटकरे यावेळी म्हणाले.
 
 
 
पवार साहेबांच्या कालखंडात ज्या वेळी देशातील शेतकऱ्यांना अडचण आली, त्या वेळी पवार साहेबांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पायी दिंडी काढली. बोंडअळीमुळे शेतकरी दु:खी होता त्यावेळी जे मुख्यमंत्री आज पवार साहेबांवर टिका करत आहेत, त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. हे पवार साहेबांवर टीका करतात. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही, असा इशारा तटकरे यांनी यावेळी दिला.
 
 
 
 
 
 
भाजपला वाजपेयी, आडवाणी, गोपीनाथ मुंडेेंंचा विसर पडला : धनंजय मुंडे
 
जसजसे हल्लाबोल आंदोलन अंतिम टप्प्यात येत आहे, तसतसे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा धसका घेण्यात सुरुवात केली आहे. ज्या भाजपला अडवाणी, अटलजींनी वैभव प्राप्त करून दिले, ज्या गोपीनाथरावांनी गावागावात भाजप पोहोचवली, अशा नेत्यांचा भाजपला महामेळाव्यात विसर पडला. जे स्वतःच्या नेत्यांशी बेईमान झाले, ते जनतेशी इमानदार कसे राहतील? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
 
 
 
मुख्यमंत्र्यांच्या भाषणात फक्त राष्ट्रवादीचाच उल्लेख होता. याने स्पष्ट होते की भाजपला उतरती कळा लागली आहे. २०१९ साली परिवर्तन नक्कीच घडणार. लोक फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच आशीर्वाद देणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@