पवार साहेबांवर टीका करण्याची यांची औकात आहे का? : अजित पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2018
Total Views |
 
 
दहिवडी (सातारा) : पंतप्रधान मोदी म्हणतात की पवार माझे गुरु आहेत आणि हे साहेबांवर टीका करत आहेत. हे भाजपचे बगलबच्चे पवार साहेबांवर टीका करतात. यांची औकात आहे का पवार साहेबांवर टीका करण्याची? अशा तिखट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनात आज सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी येथे आयोजित जाहीर सभेत ते आज बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
 
भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एक नंबरचे जातीयवादी पक्ष आहेत. जनतेने यांचा इतिहास तपासून बघायला हवा. भाजपने सर्व गुंडांना पक्षात घेऊन ठेवले आहे. असे राजकारण महाराष्ट्रात कधी झाले नव्हते असा आरोप त्यांनी यावेळी सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर केला. ही जी परंपरा रुजवली जात आहे, तिला थांबवण्याचे काम आपण करायला हवे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपापसात भांडू नका, जो उत्तम काम करेल, त्याच्या पाठिशी पक्ष उभा राहील. या सरकारने जी घाण चार वर्षात केली, ती घाण आपल्यालाच साफ करायची आहे. म्हणून आपण एकत्र असणे गरजेचे आहे, असे त्यांनी पवार यांनी नमूद केले.
 
 
 
सातारा जिल्ह्यातील हा भाग कष्टकरी लोकांचा आहे. येथील अनेक जण सैन्यात असून देशाची सेवा करत आहेत. आघाडी सरकारच्या काळात येथील लोकप्रतिनिधींनी या भागासाठी खूप काम केले. या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले असे पवार यावेळी म्हणाले. पवार साहेबांनीही एकेकाळी या भागाचे नेतृत्व केले आहे. या भागाचा विकास कसा होईल, यासाठी पवार साहेबांनीही प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फक्त मत मागायला येथे आली नाही. तुमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत असे पवार यांनी सांगितले.
 
येथे लोकांना वीज उपलब्ध नाही. याबाबत सरकारकडे विचारणा केली, तर थातूरमातूर उत्तर दिले जाते. या भागाला महत्त्वाचे पद देण्याचे काम आम्ही केले. पण आज या भागाला कोणी वाली नाही. शेतकरी भरडून निघत आहे. मात्र, सरकारला त्याची दखल घेण्यास वेळ नाही. साताऱ्याचा विकास आज खुंटत चालला आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करा, अशी आमची मागणी आहे. मात्र सरकार त्यावर काही बोलायला तयार नाही, असे पवार यावेळी म्हणाले.
 
सातारा जिल्हा हागणदारीमुक्तीसाठी पहिल्या क्रमांकावर होता. औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न पेटला. या सरकारने स्वच्छ भारत अभियान आणले. काय अवस्था आहे? प्रत्येक ठिकाणी घाण आहे. स्वतःला चमकवण्यासाठी योजना आणणे या सरकारचे काम आहे. जाहिरातीसाठी पैसे खर्च केले जातात. मात्र सरकार निराधार योजनेसाठी पैसे देत नाही असा आरोप पवार यांनी केला. मराठा समाजात, मुस्लिम समाजात जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत अशांना आरक्षण मिळायला हवे, अशी आमची भूमिका आहे. हे सरकार फक्त अभ्यास करत आहे. समिती नेमत आहे. मात्र, निर्णय घेत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी सरकारवर केली.
 
@@AUTHORINFO_V1@@