कावेरी मॅनेजमेंट बोर्डच्या मागणीसाठी आज तामिळनाडू बंद

    05-Apr-2018
Total Views |


चेन्नई :
कावेरी नदी जलवाटपावर तोडगा काढण्यासाठी 'कावेरी मॅनेजमेंट बोर्ड'ची स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी तामिळनाडूतील सर्व राजकीय पक्षांनी आणि स्थानिक संघटनांनी आज 'तामिळनाडू बंद'ची हाक दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक पक्षांनी रस्ता रोको तसेच रेल रोको करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचा आणि इतर पायाभूत सुविधांचा खोळंबा झाला आहे. तसेच काही ठिकाणी नागरिकांकडून संतप्त निदर्शने सुरु असलेल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

तामिळनाडूमधील सत्ताधारी एआयएडीएमके पक्ष हा कावेरीचा मुद्दा सोडवण्यामध्ये पूर्णपणे अयशस्वी झाल्याची भावना येथील विरोधी पक्ष असलेल्या डीएमके पक्षाकडून व्यक्त करण्यात येत आहे. याच बरोबर केंद्र सरकार देखील तामिळ जनतेला त्यांच्या हक्कपासून ठेवत असल्याचा आरोप केला जात आहे, त्यामुळे 'कावेरी मॅनेजमेंट बोर्ड' लवकरात लवकर लागू करावा, यामागणी राज्यभर निदर्शने केली जात आहे. तामिळनाडूतील कॉंग्रेस पक्षाने देखील यावर आवाज उठवत, सरकार विरोधात निदर्शने आणि रस्ता रोको करण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी कॉंग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला आहे.

तामिळनाडूतील स्थानिक नागरिकांनी देखील या बंदला पाठींबा देत आपली दुकाने तसेच इतर व्यवहार बंद ठेवले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत असल्याचे दिसत आहे. जागोजागी रस्ता रोको केल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा देखील खोळंबा झाला आहे. अनेक ठिकाणी काही पक्षाचे कार्यकर्ते संतप्त निदर्शेने करत असल्यामुळे पोलीस यंत्रणेवर देखील तणाव पडत आहे. त्यामुळे या बंदला हिंसेचे गालबोट लागण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे.



गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कावेरी जलवाटपावर सुनावणी करताना, तामिळनाडूच्या वाट्याचे पाणी कमी करून ते कर्नाटकला देण्याचा निर्णय घेतला होता. यावर तामिळनाडू सरकार आणि जनतेनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाने यावर पुनर्विचार करावा, अशी याचिका देखील तामिळनाडूकडून करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने याला नकार दिल्यानंतर आता सरकारने 'कावेरी मॅनेजमेंट बोर्ड' लागू करावा अशी मागणी केली जात आहे.