अन्यथा रस्ता रोको, रयत सेनेचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा
चाळीसगाव :
चाळीसगाव शहराच्या बाहेरुन बायपास (पर्यायी मार्ग) असतांना देखील काही अवजड वाहने शहरातून जात असल्याने वाहतूक ठप्प होत, सामाजिक शांततेला बाधा पोहोचत अनेकदा छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत तसेच शहरात रोडलगत अनेक शाळा महाविद्यालये आहेत रस्त्यावरुन विद्यार्थी ये जा करीत असतात, या अवजड वाहनांमुळे एखादा अपघात झाल्यास त्यातील प्राणहानी, वित्तहानीला जबाबदार कोण ?... असा सवाल करीत शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद करावा, अशी मागणी रयत सेनेच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अवजड वाहने बंद न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या हस्ते अप्पर पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शहरातून गेल्या काही महिन्यांपासून अवजड वाहने जात आहेत त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत असून अनेकदा छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत.
निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक जळगाव, पोलीस उपविभागीय अधिकारी भाग चाळीसगाव, प्रादेशिक परिवहन विभाग जळगाव (आर.टी.ओ), सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा चाळीसगाव, शहर पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांना पाठवण्यात आल्या आहेत.
निवेदनावर संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, पी.एन.पाटील, प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, सूर्यकांत कदम, देवेंद्र पाटील, मुकुंद पवार, दत्तु पवार, समाधान मांडोळे, सुनिल निंबाळकर, सतीश पवार, संदीप मराठे,राजेंद्र मांडे, अशोक निकम आदिंच्या सह्या आहेत.
पर्यायी रस्ता असताना ही वाहने शहरात येतातच कशी?...
अवजड वाहनांसाठी शहराबाहेरून बायपास रस्ता असतांना ही वाहने शहरात येतात कशी?...असा सवाल उपस्थित करत धुळे कडुन चाळीसगाव शहरात येत असतांना धुळे चाळीसगाव बायपास पासुन वैद्यकीय महाविद्यालयांची सुरुवात होते तेथुन हाकेच्या अंतरावर डेराबर्डी येथे महाविद्यालय व रस्त्या लगत लहान मुलांची शाळा आहे तेथून शहरात आल्यानंतर रस्त्याच्या कडेला मोठे महाविद्यालय आहे त्याच शेजारी सम्राट संस्थेची लहान मुलांची शाळा आहे रेल्वे उड्डाणपुल ओलांडताच रस्त्यालगत सरस्वती विद्यालय ही लहान मुलांची शाळा आहे शेजारीच सिंगल चौकात ५ वी ते १० इयत्ता पर्यंत शाळा आहे तेथून काही अंतरावर सर्वात जास्त लहान मुले असलेली आनंदीबाई बंकट ही शाळा तर ग्लो उर्दू व घाट रोड वर उर्दू शाळा अश्या अनेक शाळा रस्ताच्या कडेला आहेत.
वाढत्या अतिक्रमणासह, रस्ते अरुंद
रस्त्याच्या कडेला अनेक दुकानदार व लोडगाडीधारकांनी अतिक्रमण केल्या मुळे रस्ते अरुंद होऊन रस्त्यावरून वाहने चालणे अथवा चालविणे जिकरीचे झाले आहे अवजड वाहनाना जाण्यायेण्यासाठी शहराबाहेरुन बायपास रस्ता असतांना देखील काही वाहन चालक टोल चुकविण्याच्या उद्देशाने अथवा इतर हेतूने त्यांची अवजड वाहने शहरातून घेउन जातात त्यामुळे अनेकदा अपघात झाले आहेत. मागील काळात अवजड वाहनांमुळे घाटरोड, स्टेशनरोड व धुळेरोडवर अपघात झाले आहेत.
हजारो विद्यार्थ्यांची वर्दळ, प्राणहानीचा धोका
शाळा भरताना व सुटल्यावर हजारो विद्यार्थी ये जा करत असतात एख्याद्या अवजड वाहनाचा ताबा सुटुन काही अपघात झाल्यास यास जबाबदार कोण ?...असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ही परिस्थिती पाहता चाळीसगाव शहरातून जाणारी अवजड वाहने बंद करावीत, तसे आदेश आपल्या स्तरावरून होऊन संबंधित अवजड वाहन धारकांवर कारवाई करावी, आठ दिवसात अशी वाहने शहरात येणे बंद न झाल्यास रयत सेनेच्या वतीने धुळे रोड बायपास वर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.