आड आणि पोहरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



एका उच्चभ्रू लोकांच्या समजल्या जाणाऱ्या सोसायटी मधील ही एक घटना. पार्किंगमध्ये पिझ्झा Delivery boy ने आपली गाडी लावली आणि तो पिझ्झा देऊन खाली आला. त्याच्या box मध्ये असलेला अन्य एका ठिकाणी द्यायचा पिझ्झा गायब झाला होता. सुरक्षा रक्षकांना त्याची गाडी दिसत नव्हती त्यामुळे तेही काही सांगू शकले नाहीत. सीसीटीवी फुटेजमुळे समजले की, तिथेच राहणाऱ्या काही शाळकरी मुलांनी तो काढून घेतला होता आणि खाऊनही टाकला. या मुलांसाठी पिझ्झा ही काही अप्रूप असणारी गोष्ट नव्हती. पिझ्झा परवडणार नाही, असाही प्रकार नव्हता. नवल म्हणजे पालकांनी, “ खेळून भूक लागली असेल म्हणून खाल्ला असेल पिझ्झा! “ अशी प्रतिक्रिया देऊन त्याची किंमत तिथल्यातिथे त्या Delivery boy ला देऊन टाकली.


पेपर फुटीचं प्रकरण गाजतंय सध्या. १५००० रू. पासून ५००० रू. पर्यंत किंमत होती म्हणे त्या पेपर्सची. इतके रुपये घरात कोणाला कळू न देता या विद्यार्थ्यांनी खर्च केले असतील कां ? एकतर इतके रुपये मागितल्यावर, ते कशासाठी हवे आहेत, ते न विचारताच दिले गेले किंवा पालकांच्या न कळत ते घेतले गेले किंवा पालकांना कारण माहिती होते म्हणून ते दिले गेले. पहिली दोन कारणं चिंताजनक आहेतच पण तिसरं फारच चिंताजनक आहे.

मध्यंतरी शिक्षक कसा असावा या विषयातील एक पोस्ट खूप फिरत होती. आपल्या मुलाचा विचार जसा आपण करतो तसाच वर्गातील विद्यार्थ्यांचा केला तर विषय नीट समजावा यासाठी काय करायला हवं हे सुचेल असं काहीसं त्यात म्हटलं होतं. सध्याचे पालक हा अधिकार शिक्षकांना देतात कां ? वर्गातील विद्यार्थी शाळेबाहेर गैर वागताना दिसला आणि त्याबद्दल त्याच्या पालकांना सांगितले तर “ त्याला/तिला वर्गात शिकवण्याचे काम तुम्ही करा. तो/ती बाहेर काय करतो/ करते हा तुमचा विषय नाही “ असे सांगणारे पालक आहेत. सर्व शिक्षक आदर्श आहेत असे अजिबातच नाही. अन्यथा पेपर फुटी प्रकरणात शिक्षकांची नावे आली नसती. विनयभंग किंवा त्याहून निंदनीय प्रकरणात शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले नसते.

ज्या डॉक्टरना सामान्य माणसे देव समजतात त्यांनीच ICU मध्ये मांत्रिकाला रुग्णाला बरे करण्यासाठी बोलवावे ? रुग्ण दगावला आणि त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टर विरुध्द तक्रार केली. समजा रुग्ण बरा झाला असता तर हीच प्रतिक्रिया असती का त्यांची ? ज्या सराईतपणे हे सर्व घडले त्यावरून त्या डॉक्टरची ही पहिलीच वेळ होती असे वाटत नाही.

पेपर फुटीच्या आसपासच ‘ sand paper आणि ball ‘ ही घटना चर्चेत होती. ऑस्ट्रेलियासारख्या, आपल्या कौशल्याच्या बळावर अनेक सामने जिंकलेल्या आणि भविष्यातही जिंकू शकणाऱ्या बलाढ्य संघाने जाणूनबुजून हा मार्ग कां वापरावा ? समजा एखादा सामना हरले असते तर काय बिघडणार होतं ? या घटनेवर एका भारतीय खेळाडूने अशी प्रतिक्रिया दिली की, ball tamparing या आधी कधी झालं नाही असं कुठे आहे ? म्हणजे एका अर्थाने, ‘ चोरी पकडली गेली तर ती चोरी ‘ आणि सर्वमान्य चोरी असेल तर शिक्षा कशाला ? नाही का ?

‘ निर्भया पुरस्कार प्रदान ‘ कार्यक्रमाची एक बातमी मध्यंतरी वाचली. ९ मार्चला झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित एका उच्चपदावर काम केलेल्या माणसाने काढलेले खालील उद्गार चीड आणणारे होते. त्यांचे उद्गार होते, “ If  Nirbhaya’s mother has such a good physique, I can imagine how beautiful Nirbhaya would have been.” इतका उच्चपदस्थ माणूस इतका असंवेदनशील कसा असू शकतो?

अस्वस्थ करणारी आहेत न ही सगळी उदाहरण ! पण खरी चिंता वेगळीच आहे माझी! वर उल्लेख केलेल्या सर्व घटनांमधील मुले, त्यांचे पालक, शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर, खेळाडू, उच्च पदावरील माणसे कुठून दुसऱ्या ग्रहांवरून आलेली नाहीयेत. आपल्या पृथ्वीचाच नव्हे तर आपल्या समाजाचा एक भाग आहेत. आपल्या सारख्या कुटुंबांनी समाज बनतो आणि आपल्या सारख्या माणसांनी कुटुंब बनतं! म्हणजेच आपल्या समाजाचं smallest unit आपणच आहोत.

आपल्या मुलाची नसलेली एखादी गोष्ट, त्याच्या sack मध्ये दिसूनही, त्याबद्दल जर मी त्याला जाब विचारत नसेन; घरात अचानक वाढलेली आर्थिक आवक मला खुपत नसेल, वयात येणाऱ्या मुलांबद्दल बाहेरच्यांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे, खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनेपायी मी दुर्लक्ष करत असेन ; त्याला पाठीशी घालत असेन, घरातल्या स्त्री सदस्यांशी माझी वर्तणूक सन्मानजनक नसेल, तर वरील उदाहरणातील सर्व माणसांना पाहून ‘ कलियुग आलं आहे ‘ असं म्हणण्याचा मला काय अधिकार पोचतो ?

या सर्व लोकांना दोषी ठरवतांना मी जेंव्हा त्यांच्या कडे अंगुलीनिर्देश करेन तेव्हा हाताची उर्वरित तीन बोटे माझ्याकडे निर्देश करत असतात हे मी विसरून चालणार नाही.


‘ जे आडात तेच पोहऱ्यात ‘ या न्यायाने पोहरा स्वच्छ पाण्याने भरून यायला हवा असेल तर आड स्वच्छ पाण्याने भरलेला हवा. असे अस्वच्छ पाण्याचे पोहरे अजून तरी अपवादात्मक आहेत. वेळ अजून तरी निघून गेलेली नाही. सुरुवात मात्र लौकर करायला हवी.


- शुभांगी पुरोहित 
@@AUTHORINFO_V1@@