सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे : तटकरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |
 
 
आटपाडी : या सरकारने सत्तेवर येण्याआधी प्रचंड घोषणाबाजी केली होती. पण एकही आश्वासन यांनी पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांसोबत न्याय व्हायचा, तो पवार साहेबांचा काळ आजही लोकांना लक्षात आहे. सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे आणि कर्जमाफीची घोषणा हे त्याचे उदाहरण आहे. हे सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात आज आटपाडी येथे सभा झाली. या सभेत ते बोलत होते.
 
 
या सरकारने कर्जमाफी दिली. मात्र, त्यात मोठ्या प्रमाणावर निकष लावले. पवार साहेबांनी ७१ हजार कोटींचे कर्ज माफ करून एक इतिहास रचला होता. पण या सरकारमध्ये तशी धमक नाही. हे सरकार नाकर्ते आहे. त्यामुळे या सरकारला उलथून टाकण्याची आता वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.
 
 
अंगणवाडी सेविकांवर मेस्मा लावण्याचा प्रयत्न सरकारने केला होता. आम्ही तो हाणून पाडला. सरकार आता ‘एस.टी.’चे खाजगीकरण करत आहे. हा डावही आम्ही हाणून पाडू, याची आम्हाला खात्री आहे. २०१९ ला परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही. पण त्यासाठी पक्षानी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पाहिजे. तसेच, जनतेनेही निर्धार केला पाहिजे. तसे झाल्यास येथील आमदार राष्ट्रवादीचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
आम्ही १५ वर्षे सत्तेत काम केले. आपल्या भागासाठी काही तरी द्यायचे ही पवार साहेबांची शिकवण आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासाठी पक्षातर्फे आम्हाला खूप काही करता आले. या भागांना पाणी मिळत नाही म्हणून टेंभू, ताकारी, म्हैसाळ हे प्रकल्प चालू करण्याचा निर्माण आम्ही घेतला. पण प्रकल्पांना आज निधी मिळत नाही. हे सरकार आल्यापासून सर्वात जास्त अन्याय पश्चिम महाराष्ट्रावर झाला आहे, असा आरोप विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला.
 
  
आम्ही या भागात वीज दिली. शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर दिले. दुष्काळात चारा छावण्या उभारल्या. मात्र हे सरकार असे काहीही करताना दिसत नाही. सरकारच्या निणर्यामुळे गरिबांच्या पोटाला चिमटा बसतो आहे. श्रीमंतांच्या हिताचे निर्णय हे सरकार घेत आहे. भाजप शिवसेनेने राज्याची दुरवस्था केली आहे. सहकार मंत्र्यांनी ३२ रुपये किलोने साखर घेणार, असे आश्वासन दिले होते. त्याबाबत विचारणा केली तर म्हणतात की ती म्हणायची गोष्ट असते. सरकार म्हणजे गंमत सुरू आहे का?, असा सवाल त्यांनी केला.
 
 
एटीएमच्या रांगांमध्ये लोकांचा जीव गेला. याबाबत सरकारला काहीच वाटत नाही. नोटाबंदी झाल्यापासून व्यापार थंड झाला. बचत गटांना किंमत राहिली नाही. या भागात चिमुरडीवर अत्याचार झाला. पण त्याबाबत अजूनही तपास लागला नाही. सरकारवर कुणाचा दबाव आहे का? एसीपींना तपास लवकर करण्याचे आदेश का दिले जात नाहीत? सरकारने धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. फक्त महादेव जानकर आणि विनायक मेटे यांना मंत्रीपद दिले आणि जनतेला गप्प केले. रामदास आठवलेंनाही मंत्रीपद दिले. पण लोकांचे काय? त्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. लोकांच्या भावनांशी खेळण्याचे काम हे सरकार करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@