आकोटचे डीवायएसपी रायटरसह जाळ्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |

 
 
पंधरा हजार रुपयांची लाच घेताना अमरावती एसीबीची कारवाई

आकोट, 
पोलिस दलातील भ्रष्टाचार मंगळवार, 3 एप्रिल रोजी उघड झाला. नियमित हप्ता घेताना थेट आकोट येथील उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस शिपाई यांना अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या सर्व कारवाईमुळे पोलिस दलात चांगलीच खळबळ माजली असून, अकोला पोलिस दलातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.
सर्वत्र मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी शहरात व जिल्ह्यात वाढली असून, त्यामागे हप्ता हेच मुख्य कारण असल्याचे उघड होत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मवाळ भूमिकेमुळे हे सर्व फोफावल्याची चर्चा पोलिस कर्मचार्‍यांमध्ये आहे.
 
आकोट उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी छगन इंगळे व त्यांचा रायटर पोलिस शिपाई मोहसीन अन्सारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी मंगळवार, 3 एप्रिल रोजी पंधरा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केल्यामुळे अकोला जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
 
 
आकोट येथील एका ऑनलाईन लॉटरी सेंटर चालविणार्‍याकडून 25 हजार रुपयांची लाच उपविभागीय अधिकारी यांनी रायटरमार्फत मागितली होती. यातील दहा हजार रुपये लाचेची रक्कम याआधीच देण्यात आली होती, तर उर्वरित रक्कम मागण्यासाठी या अधिकार्‍याचा तगादा सुरूच होता. संबंधित तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्यामुळे त्याने अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदविली होती. त्यावर अमरावती एसीबीच्या अधिकार्‍यांनी पडताळणी करून सापळा रचला व मोहसीनोद्दीन शेख याला 3 एप्रिल रोजी 6.30 वाजतादरम्यान पंधरा हजार रुपयांची लाच घेत असताना रंगेहाथ अटक केली.
 
 
मोहसीनोद्दीन शेखला अटक केल्यानंतर या प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी छगन इंगळे यालादेखील त्याच्या राहत्या घरून, पोपटखेड रस्त्यावरील पुष्पचितवन अपार्टमेंटमधून ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई अमरावतीचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक जयंत राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रवींद्र जेधे, डी. एन. उराडे, प्रमोद धानोरकर, युवराज राठोड, पंकज बोरसे, शैलेश कडू यांनी केली.
@@AUTHORINFO_V1@@