यूट्यूबच्या मुख्यालयावर हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |

सुंदर पिचाई यांचे गूगल कर्मचाऱ्यांना साद घालणारे पत्र

 
सॅन ब्रूनो : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन ब्रुनो येथील यूट्यूब मुख्यालयावर एका महिलेने अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत यूट्यूबचे ४ कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आले आहे. हल्लेखोर महिलेने त्यानंतर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.
 
 
 
या हल्ल्यानंतर एकूणच गूगल टीम हादरून गेली असून, त्याने संपूर्ण माहिती तंत्रज्ञान उद्योगाला धक्का बसला आहे. गूगलचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी या नंतर त्वरित कर्मचाऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण गूगलच्या कर्मचाऱ्यांना साद घालणारे पत्र त्यांनी जरी केले आहे.
 
 
सुंदंर पिचाई यांचे भावपूर्ण पत्र -

मंगळवारी दुपारच्या भोजनाच्या वेळी अचानक यूट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार होत असल्याचे कळले, त्यानंतर कर्मचार्यांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित सुरक्षा रक्षकांनी पाचारण केले. यातील सर्वात मोठी आणि सकारात्मक बाब अशी की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. आम्ही सर्वोत्तम रुग्णालयीन व्यवस्था मिळवत आहोत, जखमी कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळावी याकडे सतत लक्ष लावून आहोत. या भयानक हिंसाचाराच्या कृत्यामुळे ४ लोकांना आपला जीव धोक्यात घालावा लागला आहे, त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण गूगल कुटुंबीय उभे आहेत. त्यांच्या मदतीसाठी आम्ही तत्पर आहोत, सर्व मिळून या परिस्थितीवर मात करूया. यूट्यूब टीमच्या पाठीशी याप्रसंगी खंबीर पाने उभे राहूया, अशी साद सुंदर पिचाई यांनी संपूर्ण गूगल परिवाराला घातली आहे.

 
याबरोबरच अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची देखील त्वरित प्रतिक्रिया आली आहे. कॅलीफोर्निया, येथील सॅन ब्रुनोच्या यूट्यूब मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याबद्दल कळले. हल्ल्यात जखमी झालेल्यांचे आरोग्य लवकरच ठिक होण्यासाठी मी प्रार्थना करतो. त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेसाठी त्वरित पाचारण केलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांचे देखील खूप आभार त्यांनी मानले आहेत.  
 
 
@@AUTHORINFO_V1@@