इको ड्राईव यंगस्टर्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |

चिऊताईच्या अस्तित्वासाठी मानवी जिव्हाळा

 
 
 
 
 
उठा उठा चिऊताई’..‘चिऊताई चिऊताई दार उघड’..‘अब ये चिडियॉं कहॉं रहेगी’.. अशा एकाहून एक सरस कविता, आपण आपल्या बालपणी ऐकल्या आहेत, पण वाढत्या प्रदूषणामुळे आता फक्त कवितेतच चिमण्या उरल्या. या प्रश्नाने कल्याणमधील महेश बनकर या युवकाला बैचेन केलं आणि आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो याचे भान ठेवत तो चिऊताई वाचवायला सरसावला. त्यातूनच स्थापन झाली ’इको ड्राइव्ह यंगस्टर संस्था.’ ही संस्था पक्षी, वृक्ष आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम करते.
 
 
लहान मुलांची ज्या पक्षाशी पहिली ओळख होते तो पक्षी म्हणजे चिऊताई. वाढत्या शहरीकरणामुळे शहरी भागात गेल्या वर्षांत चिमण्यांचे प्रमाण कमी झाले. या चिमण्यांना वाचविण्यासाठी विस्तृत चळवळ उभी राहावी यासाठी २०१० पासून २० मार्च हा दिवस ’वर्ल्ड स्पॅरो डे’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून महेश बनकर यांनी ’इको ड्राइव्ह यंगस्टर्स’ च्या माध्यमातून ’चिमणी वाचवा’ ही चळवळ सुरू केली. हॉटेल मॅनेजमेंट कंपनीत काम करणार्‍या बनकर यांनी रोहन तेली, निखिल जावळे, राहुल माने, प्रसाद धनावले, स्वप्नील कुंभार या मित्रांच्या मदतीने पक्षीप्रेमापोटी हा उपक्रम हाती घेतला. २००९ पासून या संस्थेने काम सुरू केले व नंतर २०१३ साली संस्थेची नोंदणी करण्यात आली.
 
या संस्थेचा पहिला उपक्रम कल्याण पश्चिमेतील सरस्वती मंदिरात पार पडला. या ग्रुपच्या वतीने शाळकरी मुलांना पक्ष्यांच्या आवाजाची ओळख करून देण्यात आली तसेच दरवर्षी हिंदू नववर्ष दिवस म्हणजे गुढीपाडव्याला कल्याण शहरात निघणार्‍या स्वागतयात्रेत कृत्रिम घरटी उपलब्ध करून देण्याचे कामही त्यांनी केले. शहर परिसरात वाढणारे तापमान तसेच वृक्षांची मोठ्या प्रमाणात होणारी तोड यामुळे पक्ष्यांच्या अस्तित्वावर मोठा परिणाम झाला आहे. त्याची संख्या झपाट्याने घटत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी कल्याणातील ’इको ड्राइव्ह यंगस्टर्स’ संघटनेने उद्याने, तलाव तसेच शहरातील चौकात जनजागृती मोहीम सुरू केली. ऐतिहासिक शहर असलेल्या कल्याण शहरात एकेकाळी वाडा संस्कृती होती पण सद्यस्थितीला ही संस्कृती लोप पावली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी झाडांची कत्तल यामुळे शहरामधे तापमानातही वाढ झाली आहे. नागरिकांना तर याचा त्रास होतोच पण पशू-पक्षांनाही याचा सामना करावा लागतो असल्याने ’इको ड्राइव्ह यंगस्टर्स’ नी ओंजळभर पाण्याचे दान हा उपक्रम राबविला.
 
आधुनिक काळातही आपट्याच्या पानाचे महत्त्व कायम राहिले. मात्र, काळाच्या ओघात या पानांसाठी थेट झाडांची कत्तल करायची, झाडांमधून ती ओरबाडायची वृत्तीही वाढीस लागली आहे. ज्या दिवशी आपट्याच्या पानाचा मान असतो त्याच दिवशी त्याची अपरिमित हानी केली जाते. हा प्रकार कल्याणमधील तरुणाईला खटकू लागला आहे. याविषयीच्या अस्वस्थतेतून कल्याणच्या ’इको ड्राइव्ह यंगस्टर्स’ या तरुणांच्या समूहाने पर्यावरणस्नेही दसरा साजरा करण्यासाठी जागृती मोहीम आखली असून पाने तोडून उत्सव साजरा करू नका, असा संदेश देत दसर्‍याच्या दिवशी आपट्यांच्या झाडांचे वृक्षारोपण करत हे तरुण सण साजरा करणार आहेत. सण-उत्सवातील पर्यावरणाचा विचार करत पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करण्यासाठी कल्याणची संस्था गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील आहे.
 
६० जणांच्या या चमूने आतापर्यंत जागतिक चिमणी दिवस, वटपौर्णिमा उत्सव, जागतिक पर्यावरण दिन असे पर्यावरणाची काळजी वाहणारे दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरण जागृती हा या मंडळींचा मुख्य उद्देश आहे. संस्थेचा महेश बनकर याने या निमित्ताने आपट्याच्या झाडांची माहिती करून घेतली असता आपट्याच्या एका झाडाची वाढ होण्यासाठी चिंचेच्या झाडापेक्षाही अधिक कालावधी लागत असतो. मुंबई, उपनगरामध्ये विक्रीसाठी येणार्‍या आपट्याच्या पानांसाठी झाडांची अक्षरश: कत्तल केली जाते. कशाही पद्धतीने पाने ओरबाडल्याने झाडाची वाढ कमी होऊन ती झाडे खुरटी बनतात, तर काही झाडे मरून जातात. ही बाब समोर आल्यानंतर या मंडळींनी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. संस्थेच्या वतीने आपट्याची पाने तोडून दसरा साजरा करू नका, अशी जागृती करण्यास सुरुवात करण्यात आली असून सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून हा संदेश देण्यास त्यांनी सुरुवात केली व कल्याण शहरातील ३० वेगवेगळ्या ठिकाणी ते आपट्याच्या झाडांचे रोपण करणारा उपक्रम राबवून त्याची वाढविण्याचीदेखील जबाबदारी त्यांनी घेतली.
 
प्रत्येक उन्हाळ्यात ‘पक्ष्यांसाठी बाहेर पाणी ठेवा,’ असा संदेश सोशल मीडियावर फिरत असतो पण प्रत्यक्षात तसं करणारे फार कमी असतात. हा ग्रुप निरनिराळ्या बागांमध्ये जाऊन असे पाण्याचे पसरट घट भरून ठेवतो. शिवाय, समाजातही जनजागृती करतो. दरवर्षी चिमण्यांच्या घरट्यांची स्पर्धाही ही संस्था घेत असते. सगळ्या शाळांमध्ये जाऊन मुलांना याबाबत माहिती देण्यात येते. ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या विचाराने प्रत्येकाने घरून चिमण्यांची घरटी बनवून आणायची आणि मग स्पर्धेनंतर ती घरटी आपापल्या घरी खिडक्यांमधून लावायची असतात. यातून चिमण्यांनाही घरटी मिळतात. दर स्पर्धेतून १५० घरटी तयार होतात. याबाबत बोलताना या स्वयंसेवी संस्थेचे अधिकारी महेश बनकर म्हणाले, ’’घरट्यांची स्पर्धा घेतल्याने लहानपणापासूनच मुलांमध्ये याबाबत सजगता निर्माण होईल, या विचाराने आम्ही ही स्पर्धा घेतो आणि प्रत्येकाने दिवसातून थोडंसं पाणी पक्ष्यांसाठी खिडकीत ठेवायला हवं. आमच्या या मोहिमेला लोकांचा प्रतिसादही चांगला आहे. पक्ष्यांचं महत्त्व पटवून दिल्यावर गोष्टी लोकांच्या लक्षात येतात. कल्याणमध्ये जे जखमी पक्षी पकडले जातात, त्यांना वैद्यकीय उपचारासाठी डॉ. धर्मराज यांच्याकडे नेण्यात येते.’’ संस्थेतील काही लोकांच्या मदतीने यासाठी लागणारा निधी उभारण्यात येतो.
 
या संस्थेची रीतसर नोंदणी केली असून, कल्याणमध्येच नाही तर मुंबई, पुणे, नाशिक इथले लोकही या संस्थेचे कृतिशील सदस्य आहेत. सिमेंट कॉंक्रीटच्या वाढत्या इमारतींमुळे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास क्षेत्र कमी होत चालले आहे. जलाशय, ओहोळ, छोटी डबकी आदी पाण्याचे नैसर्गिक स्रोतही आटत चालले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात अनेक पक्षी पाण्यावाचून मृत्युमुखी पडतात. हे रोखण्यासाठी गॅलरीत, अंगणात, दुकानावर किंवा मिळेल त्या ठिकाणी पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी ठेवण्याचे आवाहन महेश करतात. महेश बनकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ’वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ चा मंत्र आयुष्यात जागवला आहे. खरे म्हणजे ’इको ड्राइव्ह यंगस्टर्स’ या संस्थेचे काम हे त्या संस्थेच्या सदस्यांचेच काम नाही तर समाज आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ही माणुसकीची साद आहे. ती वेळीच ऐकायला हवी. कारण पर्यावरण वाचले तर आपण वाचू आणि आमचे सहजीवी पशुपक्षी, वृक्षलता तगल्या तर आम्ही जगू. त्यामुळे ’इको ड्राइव्ह यंगस्टर्स’ च्या कामात सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. चला तर आपल्यापासून सुरुवात करू.
 
 
 
 
- रोशनी खोत
@@AUTHORINFO_V1@@