थेरीगाथा - सुबुद्ध स्त्रियांची गाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018   
Total Views |

 
 
आज बुद्ध पौर्णिमा. असे म्हणतात की तथागत भगवान बुद्धांचा जन्म याच दिवशी झाला, त्याना बोधी देखील ह्याच दिवशी प्राप्त झाली आणि त्यांचे महापरिनिर्वाण देखील ह्याच तिथीला झाले. जगभरातल्या बौद्ध धर्मीय लोकांसाठी बुद्ध पौर्णिमा किंवा वैशाख पौर्णिमा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. भगवान बुद्धांचा संदेश सामान्य जनतेला स्वीकारार्ह वाटला कारण त्यांच्या जीवनातल्या दुः खांचा निचरा करण्याचे सामर्थ्य तथागताच्या शब्दांमध्ये होते. भगवान बुद्धांच्या उपदेशामुळे सांसारिक तापत्रयांनी पिडलेल्या कितीतरी स्त्री-पुरुषांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून भिक्षू व भिक्षुणी होऊन त्यांनी आपले जीवन संघाला आणि धम्माला वाहिले. त्यातल्या काही अनुभवी व ज्ञानी भिक्षू आणि भिक्षुणींनी लिहिलेल्या गाथा थेरगाथा आणि थेरीगाथा ह्या नावाने आपल्याला आज उपलब्ध आहेत.

थेर आणि थेरी हे शब्द संस्कृतमधल्या स्थविर आणि स्थविरा ह्या शब्दांची पाली भाषेमधली रूपे आहेत. थेर म्हणजे वयाने जाणता, अनुभवी, ज्ञानसंपन्न असा भिक्षू ज्याने प्रवज्या घेऊन स्वप्रयत्नाने अर्हतपद मिळविले, आणि थेरी म्हणजे अनुभवी व ज्ञानी भिक्षुणी जी प्रवज्या घेऊन स्वतः च्या साधनेच्या बळावर अर्हत बनलेली आहे. अश्या अनुभवसंपन्न भिक्षू व भिक्षुणींनी लिहिलेल्या कविता म्हणजे थेरगाथा व थेरीगाथा. खुद्दक निकाय ह्या महान बौद्ध ग्रंथाच्या १५ भागांपैकी थेरीगाथा आणि थेरगाथा हे दोन महत्वाचे भाग आहेत. त्यातला थेरीगाथा हा ग्रंथ विशेष महत्वाचा आहे कारण २००० वर्षांपूर्वीच्या स्त्रीजीवनाचे उत्कट चित्रण त्या ग्रंथातून झालेले आहे, तेसुद्धा तत्कालीन थेरी भिक्षुणींच्या स्वतः च्या शब्दात!

पाली भाषेत लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे स्त्रियांनी लिहिलेला इतिहासातला पहिला ज्ञात काव्यग्रंथ. थेरीगाथेमध्ये ७३ अनुभवी भिक्षुणींनी लिहिलेल्या एकूण ५२२ कविता आहेत, ज्या १६ भागात विभागलेल्या आहेत. ह्या कविता लिहीणाऱ्या थेरी ह्या बहुतेक बुद्धाच्या समकालीन भिक्षुणी होत्या. त्यातल्या बऱ्याच जणींना खुद्द भगवान बुद्धांच्या हातून प्रवज्या घेण्याचे भाग्य प्राप्त झाले होते. संसाराचे सर्व पाश तोडून ह्या स्त्रिया संघात सामील झाल्या होत्या. भिक्षुणींसाठी सांगितलेल्या धम्माच्या आठ कठोर नियमांचे पालन करून किमान दहा वर्षावास पार पाडून त्यांनी अर्हतपद प्राप्त केले होते. ह्या भिक्षुणींच्या कवितांमध्ये त्यांच्या पूर्वायुष्याचे वर्णन बरेचदा आढळते. ज्या प्रसंगामुळे त्या स्त्रिया धम्माकडे वळल्या त्या प्रसंगाचे किंवा ज्या अतीव दुःखाचे निवारण करण्यासाठी त्यांना तथागताच्या शब्दांनी मदत केली त्या दुःखाचे अत्यंत प्रत्ययकारी वर्णन त्यांनी आपल्या शब्दांमधून केले आहे.

थेरीगाथेमध्ये ज्यांच्या कविता आहेत त्या भिक्षुणींमध्ये भगवान बुद्धांचे लालन-पालन करणारी त्यांची मावशी आणि सावत्र आई महाप्रजापती गौतमी आहे, लिच्छवी गणराज्यातील प्रसिद्ध गणिका आम्रपाली आहे, आपल्या पुत्राच्या मृत्यूमुळे सैरभैर होऊन वेड्यासारखी फिरणारी किसागोथमी आहे आणि चापा नावाची एक सामान्य पारध्याची मुलगीही आहे. सुरवातीला भगवान बुद्धांनी आपल्या संघात स्त्रियांना प्रवेश दिला नव्हता, पण त्यांच्या शिष्यांनी रदबदली केल्यानंतर बुद्धांनी आपल्या वडिलांच्या म्हणजे महाराज शुद्धोदनाच्या मृत्यूनंतर आपली सावत्र आई महाप्रजापती गौतमी हिला प्रवज्या दिली. तिच्याबरोबर शाक्य कुळातल्या ५०० स्त्रियांनी संघात प्रवेश केला. काही काळाने भिक्षुणींची संख्या वाढत जाऊन त्यांचा वेगळा संघ तयार झाला. समाजाच्या सर्व स्तरातून, सर्व वयांच्या, सर्व जातींच्या, सर्व स्वभावाच्या स्त्रिया भगवान बुद्धांच्या शब्दांनी प्रेरित होऊन संघाकडे आकर्षित झाल्या. थेरीगाथेतून त्यांनी आपले जीवनानुभव फार समर्थपणे कथन केलेले आहेत.

थेरीगाथेमध्ये भिक्षुणींच्या अध्यात्मिक प्रवासाची तर माहिती मिळतेच पण ह्या गाथांमधून तत्कालीन स्त्री-जीवनाचे वर्णनही आपल्याला वाचायला मिळते. बऱ्याच थेरींनी आपल्या पूर्वायुष्यातील कडू-गोड आठवणींचे मोठ्या सुंदर शब्दात अंकन केले आहे. नात्यांचे पाश, धन, संपत्ती, सुखलोलुपता, विषयविकार इत्यादी सर्व गोष्टी सोडून देऊन ह्या स्त्रिया स्वखुशीने निर्वाणपंथावरून चालायला लागल्या होत्या, त्यांच्या भावनांचे वर्णन मोठे मनोज्ञपणे त्यांनी केले आहे. थेरीगाथेचे इंग्रजीमध्ये अनेक अनुवाद प्रसिद्ध झालेले आहेत. मराठीमध्येही शेषराव मेश्राम यांनी केलेला अनुवाद मी वाचला आहे. त्यात त्यांनी खुद्दक निकायामधल्याच अपदान ह्या ग्रंथामधून आलेल्या ह्या भिक्षुणींच्या पूर्वायुष्यातल्या कथाही देऊन ह्या स्त्रिया कुठल्या परिस्थितीत, कुठल्या उद्देशाने प्रेरित होऊन संघाला शरण गेल्या त्याचेही वर्णन दिलेले आहे. पण ह्या लेखात मी ज्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळी म्हणजे थेनिसारो भीक्खू ह्यांनी मूळ पाली भाषेतून केलेल्या इंग्रजी अनुवादाचे मी केलेला स्वैर भावानुवाद आहे.

वैदिक काळात भारतात स्त्रियांना वेदाध्ययनाचे अधिकार होते, त्यांना सन्मान दिला जात होता. त्यांच्या मताला किंमत होती. त्यांना धर्मकार्याचा अधिकार होता. ब्रह्मवादिनी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने तात्विक चर्चा करू शकत असत. पण पुढे काळाच्या ओघात समाजाने पुरुषप्रधान व्यवस्था स्वीकारली. स्त्रियांचे स्थान दुय्यम झाले. त्यांचे काम फक्त घर सांभाळणे आणि मुलांना वाढवणे असेच मानले जाऊ लागले. स्त्रियांचे धर्मकार्याचे अधिकार नाकारले जाऊ लागले. अश्या काळात बुद्धांनी स्त्रियांसाठी संघाचे दरवाजे खुले करून समतेचे एक मोठे पाऊल उचलले. ह्या सर्व सामाजिक बदलांचे आणि स्त्रियांच्या मनातल्या भाव-भावनांचे प्रतिबिंब आपल्याला थेरीगाथेतल्या शब्दा-शब्दातून दिसून येते. ह्या गाथा वाचताना आपल्याला दिसून येते की गाथा रचणाऱ्या थेरीनी निर्वाणाचे वर्णन करताना अगदी सांसारिक तरीही फार सुंदर आणि चपखल उपमा वापरल्या आहेत. उदाहरणार्थ, क्षत्रिय कुळात जन्मलेल्या एका स्त्रीला विस्तव जास्त झाल्यामुळे भांड्यात करपलेली भाजी बघून जीवन अनित्य आहे ह्या बुद्धवचनाचा साक्षात्कार झाला. आपल्या गाथेत स्वतः लाच उद्देशून ती म्हणते, 'हे थेरी, तू आपल्या हाताने तयार केलेले चीवर पांघरून शांत झोप, कारण आगीच्या धगीवर आटलेल्या भाजीप्रमाणे तुझ्या वासनाही आटून गेलेल्या आहेत'.

मुक्ता किंवा मुत्ता हिचे लग्न झालेले होते पण तिचा कुरूप नवरा तिला आवडत नव्हता. सांसारिक गोष्टीत तिला फारसा रस नसावा असे दिसते कारण आपल्या गाथेत ती म्हणते, 'मी मुक्त झाले आहे. मी पूर्णपणे मुक्त झाले आहे. मुसळ, उखळ आणि कुबडा नवरा ह्या तीन वाकड्या गोष्टींपासून मी पूर्णपणे मुक्त झाले आहे. तृष्णेचे गवत मी मुळापासून उपटून काढले आहे. म्हातारपण आणि मृत्यू ह्या दोन भयांपासून मी आता कायमची मुक्त झालेले आहे'.

उब्बीरी ही श्रावस्ती नगरीत जन्माला आलेली एक सुंदर मुलगी. तिच्या सौंदर्यावर भाळून कोशल राज्याच्या राजाने तिच्याशी विवाह केला. तिला एक सुंदर मुलगी देखील झाली, जिचे नाव तिने ठेवले जीवन्ति. पण दुर्दैवाने जीवन्ति लहानपणीच मरण पावली. उब्बीरी लेकीच्या मृत्यूच्या दुः खाने वेडीपिशी झाली. दिवसभर ती मुलीचा अंत्यसंस्कार जिथे झाला त्या स्मशानात जाऊन रडत बसायची. तिने स्वतः कडे लक्ष द्यायचे सोडून दिले म्हणून राजाचे तिच्यावरचे प्रेमही आटले. उब्बीरी दिवसरात्र आपल्या मुलीच्या मृत्यूच्या दुः खात चूर असताना भगवान तथागतांनी तिला विचारले की 'जीवा, जीवा म्हणून तू विलाप करते आहेस तो नेमक्या कुठल्या जीवासाठी ? ८४,००० जीवांचा अंत्यसंस्कार ह्याच स्मशानात झालेला आहे'. हे बुद्धवचन ऐकून उब्बीरीला मानवी आयुष्याची क्षणभंगुरता कळली आणि ती संघाला शरण गेली. पुढे अर्हतपद प्राप्त झाल्यावर ती म्हणते, 'माझ्या हृदयात खोलवर रुतलेला शोकाचा बाण तथागताने उपटून फेकून दिला. आज मी मुक्त आहे. माझ्या जीवनातले शल्य निघालेले आहे. आता मी शांत, तृप्त आहे. तृष्णा सोडून मी बुद्ध, धम्म आणि संघाला शरण जात आहे'.

आम्रपाली ही वैशाली नगरीतली एक प्रसिद्ध गणिका. आंब्याच्या झाडाखाली ती सापडल्यामुळे तिला आम्रपाली हे नाव देण्यात आले. वयात आल्यानंतर ती इतकी सुंदर दिसू लागली की तिच्याशी लग्न करण्यासाठी आसपासच्या पंचक्रोशीतल्या राजकुमार आणि सरदारांमध्ये भांडणे सुरु झाली. तेव्हा वैशालीच्या नगर महाजनांनी निर्णय घेतला की आम्रपाली कुणा एका पुरुषाशी लग्न न करता नगरवधू म्हणून राहील. काही अटींवर आम्रपालीने गणिका होण्याचे मान्य केले. पुढे भगवान बुद्ध जेव्हा वैशालीत आले तेव्हा आम्रपालीने त्यांना आपल्या घरी भोजनाला आमंत्रित केले. ती एक वेश्या असूनही बुद्धांनी तिचे आमंत्रण स्वीकारले. बुद्धांच्या उपदेशाने प्रेरित होऊन आम्रपालीने आपली सर्व जमीन संघाला दान केली, आणि आपल्या मुलासकट प्रवज्या घेऊन ती भिक्षुणी झाली. मानवी देहाच्या अनित्यतेचे, क्षणभंगुरतेचे फार प्रत्ययकारी वर्णन आम्रपालीने आपल्या गाथेत केले आहे. वृद्धावस्थेत आपल्या एकेकाळच्या सुंदर शरीराचे झालेले परिवर्तन ती फार सुंदर शब्दात व्यक्त करते. आपल्या गाथेत ती तारुण्याच्या ऐन भरात असलेल्या आपल्या देहाचे वर्णन करून वृद्धापकाळी त्याची काय जर्जर स्थिती झाली आहे हे सांगते आणि म्हणते की जरी मानवी देह अनित्य असला तरी सत्य सांगणाऱ्याचे (बुद्धाचे) वचन मात्र कधीच बदलत नाही.




'माझा केशसंभार भुंग्यासारखा काळा-कुरळा होता, ते माझे केस आता वृद्धापकाळामुळे सुंभासारखे चरचरीत झाले आहेत पण सत्य सांगणाऱ्याचे (बुद्धाचे) वचन मात्र कधीच बदलत नाही.'

'सुगंधी फुले रचलेल्या सुंदर परडीप्रमाणे एकेकाळी माझा केशकलाप दरवळत होता, आता तेच केस जनावराच्या केसाळ कातड्यासारखे वास मारत आहेत. पण सत्य सांगणाऱ्याचे (बुद्धाचे) वचन मात्र कधीच बदलत नाही.'

'पर्वताच्या उन्नत कड्याप्रमाणे एकेकाळी माझे नाक सरळ आणि टोकदार होते, आता तेच नाक वाकड्या मिरचीसारखे बेढब झाले आहे, पण सत्य सांगणाऱ्याचे (बुद्धाचे) वचन मात्र कधीच बदलत नाही.'


'केळफुलांमधल्या शुभ्र कळ्यांसारखे माझे दात नाजूक आणि एका ओळीत होते, आता तेच दात जवाप्रमाणे पिवळे आणि खंडित झाले आहेत पण सत्य सांगणाऱ्याचे (बुद्धाचे) वचन मात्र कधीच बदलत नाही.'

'एके काळी हे शरीर सौंदर्याची खाण होते, पण आता म्हातारपणामुळे यातनांचे घर झाले आहे. पोपडे पडलेल्या भिंतीप्रमाणे हा देह जीर्ण आणि कुरूप झाला आहे, पण सत्य सांगणाऱ्याचे (बुद्धाचे) वचन मात्र कधीच बदलत नाही.'

थेरीगाथेतल्या ह्या कविता वाचताना त्यातल्या भाषेचे सौंदर्य तर आपल्याला जाणवतेच, पण त्या गाथा रचणाऱ्या थेरी विचारांनी किती प्रगल्भ होत्या, त्यांचे निरीक्षण किती सूक्ष्म आहे, जीवनातल्या दुः खांची त्यांना किती जाण होती हे आपल्याला कळून येते. थेरीगाथांमध्ये उपमांचा वापर फार चपखलपणे केलेला दिसतो. एखाद्या दगडावर पाय धुतले असता पाणी खाली वाहून निमिषार्धात जमिनीत जिरून जाते ही साधी गोष्ट एखाद्या थेरीला मानवी जीवनाची क्षणभंगुरता जाणवून देते आणि एखाद्या नाठाळ घोड्याप्रमाणे असलेल्या आपल्या मनाला ती निग्रहाने वठणीवर आणते आणि दिव्याची ज्योत मालवल्यानंतर जसा क्षणात अंधार पसरतो तशी तिला निर्वाणाची सहजप्राप्ती होते.

भारतीय साहित्यामध्ये थेरीगाथा ह्या ग्रंथाचे अनन्यसाधारण महत्व आहे. ह्या गाथांमध्ये तत्कालीन परिस्थितीचे, समाजाचे, निसर्गाचे वर्णन तर आढळतेच, पण आत्मशांतीचा उद्घोषही आढळतो, स्वातंत्र्याची ओढ आढळते आणि सर्व दुःखाचे मूळ जी तृष्णा तिला मुळापासून उखडून काढण्याचा ह्या सुबुद्ध स्त्रियांचा निर्धारही आढळतो. दोन हजार वर्षांपूर्वीच्या भारतीय समाजामध्ये स्त्रियांची सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती काय होती हे जाणून घ्यायची उत्सुकता असणाऱ्याने थेरीगाथा हा ग्रंथ आवर्जून वाचला पाहिजे.


- शेफाली वैद्य
@@AUTHORINFO_V1@@