सत्तेच्या शितांसाठी जमली मतलबी राजकारण्यांची भुते !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018   
Total Views |
 
 
यशवंत सिन्हा, अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी यांना हटविण्यासाठी विरोधकांशी हातमिळवणी केली आहे. ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन आपला मोदीविरोध त्यांनी प्रकट केला आहे. मुंबईत झालेल्या एका बैठकीत बंडखोर भाजप नेते आणि विरोधक यांनी मोदी सरकारविरुद्ध लढण्यासाठी ‘राष्ट्र मंच’ या अराजकीय मंचाची स्थापना केली. पण, या मंचाच्या स्थापनेसाठी उपस्थित असलेले कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आम आदमी पक्षाचे नेते पाहता यास कोण ‘अराजकीय मंच’ म्हणेल?
 
कर्नाटकमध्ये येत्या १२ मे रोजी विधानसभा निवडणुका घेण्याचे जाहीर झाल्यानंतर तेथे राजकीय धामधूम मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे दिसते. तसेच विविध नेते राजकारणावर आपल्या पक्षाचा वरचष्मा राहिला पाहिजे, हे गृहीत धरून समीकरणे आखू लागले आहेत. या सर्व नेते आणि पक्ष यांच्यापुढे जनतेसाठी कुठलाही ठोस कार्यक्रम नाही. फक्त त्यांच्यापुढे आहे भाजपला पुन्हा सत्तेवर येऊ न देणे हा आणि हाच एककलमी कार्यक्रम. त्यामुळे भाजपला पराभूत कसे करायचे, या दृष्टीने आतापासूनच व्यूहरचना सुरू झाली आहे. सदैव एकमेकांना पाण्यात पाहणारे, अही-नकुलासारखे वैर असलेले राजकीय नेते भाजपला खाली खेचण्यासाठी गळ्यात गळे घालू लागल्याचे चित्र देशाच्या राजकीय पटलावर दिसू लागले आहे. पण, या भाजपविरोधी आघाडीस आकार कधी आणि कसा येणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहेच. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीत सामील व्हायचे की, ममता बॅनर्जी यांच्या आघाडीत सामील व्हायचे की, या दोन्हींचा विचार न करता तिसरी आघाडी निर्माण करायची, यावर नेतेमंडळी खल करताना दिसत आहेत.
 
कॉंग्रेसला राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावेत, असे वाटते, तर तृणमूल कॉंग्रेसला ममता बॅनर्जी या देशाचे नेतृत्व करण्यास योग्य असल्याचे वाटू लागले आहे. ममतादीदी यांनी त्या दिशेने हालचालही चालू केली आहे. विरोधी ऐक्यासाठी ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच सोनिया गांधी यांचीही भेट घेतली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेही भाजप विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही आपली तत्त्वे गुंडाळून भाजपला नामोहरम करण्यासाठी कॉंग्रेससमवेत जाण्यास तयार झाला आहे. मायावती, अखिलेश यादव, शरद यादव, चंद्राबाबू नायडू, के. चंद्रशेखर राव, फारूख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आदी नेते भाजप विरोधात एकवटू लागले आहेत. या सर्वांचे ध्येय एकच आहे आणि ते म्हणजे भाजपला पुन्हा सत्तेवर येऊ द्यायचे नाही. कर्नाटकमधील निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. भाजपने सिद्धरामय्या यांच्या राजवटीविरुद्ध आघाडी उघडली आहे. कर्नाटकची राजवट म्हणजे कॉंग्रेस पक्षासाठी भ्रष्टाचाराचे एटीएम असल्याची टीका भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. कर्नाटकमध्ये विजय प्राप्त झाला की, दक्षिणेकडील राज्यांसाठीचे प्रवेशद्वार खुले होणार आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. ते पाहता भाजपला कर्नाटकमध्ये विजय मिळविणे का आवश्यक आहे, ते कळून येते. २०१९ मधील लोकसभा निवडणुका लक्षात घेता, हे राज्य जिंकणे गरजेचे आहे. पण, भाजपला कर्नाटक जिंकता येऊ नये यासाठी कॉंग्रेसने समाजातील विविध घटकांना चुचकारण्याचे वा त्यांच्यात फूट पाडण्याचे उद्योग सुरू केले आहेत.
 
लिंगायत, वीरशैव लिंगायत समाजास धार्मिक अल्पसंख्य दर्जा देण्याचा जो प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला आहे, तो या खेळीचाच एक भाग आहे. कर्नाटकमध्ये तेथील जनमानसावर विविध मठांचा प्रभाव असल्याचे लक्षात घेऊन त्यांना आपल्या बाजूने कसे वळविता येईल, हे कॉंग्रेसकडून पाहिले जात आहे. मंदिरांना, मठांना भेटी दिल्या जात आहेत. मठाधिपतीचे आशीर्वाद घेतले जात आहेत. टिपू सुलतानाची जयंती सरकारी पातळीवर साजरी करून या आधीच सिद्धरामय्या सरकारने मुस्लीम समाजास गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटक हातचे जाऊ नये यासाठी कॉंग्रेसचा आटापिटा चालला आहे. राहुल गांधी यांच्यापासून कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपची बदनामी करीत सुटले आहेत. पण, समाजात फूट पाडण्याचे कॉंग्रेसचे उद्योग भाजपकडून जनतेसमोर उघडे पडले जात आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका आमदाराने कॉंग्रेसला रामराम ठोकून आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कॉंगेसच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचेच हे चिन्ह मानावे लागेल. कर्नाटकप्रमाणे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या राज्यातील भाजप सरकारविरुद्ध कॉंग्रेसने आघाडी उघडली आहे.
 
नेते अशोक गेहलोत, ज्योतिरादित्य शिंदे आदी नेतेमंडळी आपण भाजपला नामोहरम करू, भाजपची उलटी मोजणी सुरू झाली आहे, असे म्हणत आहेत. अलीकडील पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा जो पराभव झाला, त्यावरून त्यांना असे वाटणे चुकीचे नाही. पण, या पराभवातून भाजपनेही काही बोध घेतला असेल हे त्यांच्या लक्षात कसे येत नाही? केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या चांगल्या गोष्टी विरोधकांच्या कशा लक्षात येत नाहीत? उठसूठ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केल्याने जनमत आपल्या बाजूने वळेल असे त्यांना वाटते काय? सत्तेसाठी हपापलेल्या या नेते आणि पक्षांना भारतीय जनता पक्षातील काही असंतुष्ट नेते साथ देत आहेत, हे दुर्दैव म्हणावे लागेल. यशवंत सिन्हा, अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी यांना हटविण्यासाठी विरोधकांशी हातमिळवणी केली आहे. ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन आपला मोदीविरोध त्यांनी प्रकट केला आहे. मुंबईत झालेल्या एका बैठकीत बंडखोर भाजप नेते आणि विरोधक यांनी मोदी सरकारविरुद्ध लढण्यासाठी ‘राष्ट्र मंच’ या अराजकीय मंचाची स्थापना केली. पण, या मंचाच्या स्थापनेसाठी उपस्थित असलेले कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आमआदमी पक्षाचे नेते पाहता यास कोण ‘अराजकीय मंच’ म्हणेल? १ मेपासून हा मंच मोदी सरकारविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी मोहीम हाती घेणार आहे म्हणे! नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून दूर सारण्यासाठी आपली तत्त्वे गुंडाळून ठेवणार्‍या यशवंत सिन्हा, अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारख्या नेत्यांना काय म्हणायचे! पक्षात आपल्याला कोणी विचारत नाही, हे लक्षात आल्याने या कथित महारथींनी या मार्गाने जाणे पसंत केल्याचे दिसून येत आहे.
 
केंद्रातील भाजप सरकार अनेक चांगल्या योजना घेऊन येत असले तरी विरोधक त्याबद्दल अपप्रचार करताना दिसत आहेत. रामनवमी, हनुमान जयंतीच्या निमित्ताने प. बंगाल, बिहार, राजस्थान या ठिकाणी ज्या दंगली उसळल्या त्याचे निमित्त साधून भाजप, संघ परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दंगलीचे निमित्त साधून बिहारमध्ये भाजप आणि नितीशकुमार यांच्यात दरी निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भाजपचे काही मित्रपक्षही लोकसभा निवडणुकीसंदर्भात आताच अंदाज व्यक्त करून मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करीत आहेत. केवळ सत्तेसाठी हपापलेल्या विरोधकांचे मनसुबे उधळून सध्या जे निराशाजनक चित्र विरोधकांकडून रंगविले जात आहे, त्याचा पर्दाफाश करणे आवश्यक आहे. विरोधकांकडून होत असलेला अपप्रचार लक्षात घेऊन त्यांचेच दात त्यांच्या घशात घालण्याची कृती करणे गरजेचे आहे. विरोधक चहूबाजूंनी अपप्रचार करीत सुटले आहेत. त्या सर्व गदारोळात, केवळ भाजप सरकारच ’अच्छे दिन’ आणत असल्याचे जनतेला खात्रीने पटले तर सत्तेच्या शितांसाठी जमलेल्या या मतलबी भुतांची डाळ कधीच शिजणार नाही!
 
 
 
- दत्ता पंचवाघ 
 
@@AUTHORINFO_V1@@