रेल्वेच्या एक लाख पदांसाठी अडीच कोटी बेरोजगारांचे अर्ज!

    03-Apr-2018
Total Views |

बेरोजगारांची प्रचंड संख्या: परीक्षा घेणे हे रेल्वेसमोरील आव्हान
बेरोजगारी संदर्भात केंद्र सरकारचा उद्योगांसाठी नवा प्रस्ताव
 

 
प्रस्तावात सहा ‘आर’चा समावेश
ज्वेलरी खरेदी केलेल्या विदेशी नागरिकांची कोंडी
 
देशातील बेरोजगारीचे प्रमाण किती आहे हे पुढील गोष्टीवरुन दिसून येईल. भारतीय रेल्वेने आपल्या १ लाख १० हजार जागा भरण्यासाठी दिलेल्या जाहिरातीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला असून तब्बल अडीच कोटी पेक्षा जास्त बेरोजगारांचे अर्ज ऑनलाईनद्वारे रेल्वेकडे आलेले आहेत. म्हणजेच एका पदासाठी सरासरी २३० पेक्षाही जास्त उमेदवार आहेत! कितीतरी प्रदीर्घ काळापासून ही सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. पण तिचा लाभ कोणा भाग्यवंतांना मिळणार ते आता पाहावे लागेल.
ही भरती रेल्वे ड्रायव्हर व टेक्निशियन यांच्यासाठीची आहे. लवकरच कार्पेंटर व सुरक्षा विभागासाठीही नव्याने भरती केली जाणार आहे. असे असले तरीही बेरोजगारांची प्रचंड संख्या ध्यानात घेतात काही जणांचा या भरतीत नंबर लागणार आहे. उर्वरित बेरोजगार नोकरीची वाट पाहतच राहणार आहेत. एवढेच नव्हे तर इतक्या मोठ्या संख्येने अर्ज केलेल्या कोट्यावधी उमेदवारांची परीक्षा घेणे हे रेल्वेसमोरील एक आव्हानच ठरणार आहे.
 
 
बेरोजगारीवरुन टीका सहन करावे लागणारे सरकार आता लवकरच नवे औद्योगिक धोरण आणणार आहे. सुत्रांनी म्हटल्यानुसार या आशयाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आलेला आहे. त्यात उद्योगांना सहजगत्या जमीन मिळण्याचा व लघु-मध्यम उद्योगांना आधुनिक बनविण्यावर भर देण्यात आला आहे. देशाच्या नव्या गरजा लक्षात घेऊन हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचा उद्देश भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य, प्रमाण व तंत्रविज्ञान(स्कील, स्केल व टेक्नॉलॉजी) यात अव्वल बनविणे हा होय.
 
 
प्रस्तावात रिड्युस (घटवा), रियुझ(पुनर्वापर) रिकव्हर (सुधार), रिडिझाईन (पुनर्डिझाईन)व रिमॅन्युफॅक्चर (पुनर्निर्मिती) या सहा ‘आर’वर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रस्तावात तीन नव्या थीम तयार करण्यात आल्या आहेत.
 
 
पहिली थीम म्हणजे उगवत्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताला जगात अव्वल बनविणे असून सध्याचे उद्योग व पायाभूत सुविधांना आधुनिक बनविणे ही दुसरी तर व्यापार व निर्मितीच्या संदर्भात मजबूत जोडणी व भविष्यकाळातील गरजांनुसार कौशल्य विकास (स्कील डेव्हलपमेंट) ही तिसरी थिम होय.
 
 
आज (दि. २ एप्रिल)पासून एच१बी व्हिसासाठी अर्जांची प्रक्रिया सुरु होत आहे. या पार्श्‍वभूमिवर अमेरिकेच्या मध्यवर्ती यंत्रणेने विदेशी कर्मचार्‍यांना इशारा दिला आहे की, अमेरिकेत काम करण्यासाठी लागणार्‍या एच१बी व्हिसाविषयक एकाच व्यक्तिचे अनेक अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अशा अर्जांची छाटणी केली जाणार आहे.
 
 
अमेरिकेत तात्पुरत्या काळासाठी राहू इच्छिणार्‍या माहिती तंत्रज्ञान (आयटी)क्षेत्रातील कर्मचार्‍यां मध्ये एच१बी व्हिसा खूपच लोकप्रिय आहेत. अमेरिकन नागरिकत्व व अप्रवासी सेवा(युएससीआयएस)च्या म्हणण्यानुसार एखादी वैध व्यापारविषयक आवश्यकता असली तरच असे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. केवळ रोजगार उपलब्ध होतील या अपेक्षेवर एच१बी व्हिसासाठीचे अर्ज करणयाची परवानगी नव्या व्हिसा नियमां(अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रंप आरुढ झाल्यानंतर तयार करण्यात आलेल्या)नुसार दिली जात नाही.
 
 
मात्र विशिष्ट परिस्थितीत विदेशी कर्मचार्‍याला एकापेक्षा अधिक जागांसाठी अर्ज करण्याची मुभा दिली जात असते.
विदेशी पर्यटक व अनिवासी भारतीयांनी भारतात खरेदी केलेली ज्वेलरी (दागिने व सोन्यासह) परवडेनाशी झाली आहे. याचे कारण म्हणजे या ज्वेलरीवर आकारण्यात आलेल्या वस्तू व सेवा कराचा परतावा (जीएसटी रिफंड)त्यांना मिळत नाही. याचा फटका स्थानिक ज्वेलर्सना बसत आहे.
 
 
भारतीय ज्वेलरी व कलाकुसरी विदेशात प्रसिद्ध असल्याने भारताला भेट देणारे अनेक विदेशी पर्यटक ती खरेदी करण्यासाठी येत असतात. ही पारंपारिक ज्वेलरी मोठ्या आस्थेने खरेदी केल्यानंतर ते आपल्या देशात परत जातात. पण त्यांना आयजीएसटी ऍक्ट अंतर्गत क्लेम केलेला जीएसटी रिफंड मिळतच नाही. याचे कारण रिफंड प्रक्रिया लागू करण्याचे दृष्टिने अजूनपर्यंत सरकारने नियमच तयार केलेलेच नसल्यामुळे विदेशी नाग रिकांना देशात ज्वेलरी खरेदी करणे महाग पडत आहे.
 
 
शेअर बाजारात वाढ, सेन्सेक्स पुन्हा ३३००० बिंदूंवर
नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या व्यवहार दिनी आज सोमवारी दोन एप्रिल रोजी शेअर बाजारात वाढ होऊन संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स पुन्हा ३३ हजार बिंदूंवर आला. दिवसभरातील व्यवहारात तो ३३ हजार २८९ बिंदूंच्या उंचीवर जाऊन ३३ हजार २५५ बिंदूंवर बंद झाला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी देखील बुधवार(२८मार्च)च्या बंद १० हजार ११३ बिंदूंवर आज सकाळी १० हजार १५ १ बिंदूंवर उघडत १० हजार २२० बिदूंच्या उच्च पातळीवर जात दिवसअखेरीस १० हजार २११ बिंदूंवर बंद झाला.