
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेद निर्मुलन आंदोलक आणि माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला यांच्या पूर्व पत्नी विनी मंडेला यांचे ८१ व्या वर्षी दीर्घआजारामुळे निधन झाले आहे. गेल्या वर्षभरापासून त्याच्यावर औषधोपचार सुरु होता. विनी मंडेला या दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद निर्मुलन आंदोलनातील अग्रणी नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या.
विनी मंडेला यांनी आपले संपूर्ण आयुष्य वर्णभेद चळवळीसाठी वेचले होते. दक्षिण आफ्रिकेतून वर्णभेद हद्दपार व्हावा म्हणून त्या सतत कार्यशील होत्या. त्याचबरोबर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळीत देखील मोठे योगदान दिले आहे.
वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्याशी विवाह केला होता. केपटाऊन येथे नेल्सन मंडेला यांना २७ वर्षे तुरुंगवास असताना देखील त्या त्यांच्या सोबत होत्या. १९९४ साली नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनले. १९९६ साली विनी मंडेला यांचा घटस्फोट झाला.
विनी मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेतील अल्पसंख्यांक सत्ताधारी गौरवर्णांविरोधात कडवा संघर्ष केला आहे. त्यांनी तेथील कृष्णवर्णीय नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य दिले असल्यामुळेच, त्यांना 'मदर ऑफ नेशन' म्हणून ओळखले जाते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण दक्षिण आफ्रिकेत शोककळा पसरली आहे.