उदासिनता भोवली... राजकीय, नपा वर्तुळात खळबळ
जळगाव, ३ एप्रिल :
अमळनेर नगरपालिकेतील मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुटे यांना आज प्रशासनाने तातडीने निलंबित केले. यामुळे शहरातील राजकीय, नपा वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
मुख्याधिकारीपदाचा प्रभारी कार्यभार भुसावळचे मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांच्याकडे देण्यात आला आहे. ते मंगळवारी दुपारी ३ वाजता पदभार घेणार असल्याचे समजते.
डॉ. उत्कर्ष गुटे यांचे जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या शहर पाणी पुरवठा नियोजन बैठकीला अनुपस्थित राहणे तसेच मुंबई येथे भुयारी गटार प्रकरणी सचिव मनिषा म्हैसकर यांनी आयोजित केलेल्या बैठकीला कुठलेही कारण न देता अनुपस्थित राहाणे व आमदार शिरिष चौधरी यांनी आमदार निधीतून २कोटी रु. ची कामे मंजूर केली, त्या कामांना एन. सी. देणेस केलेली टाळाटाळ ... यामुळे झालेल्या तक्रारींची दखल घेत नगरविकास विभागाने त्यांना आज तातडीने निलंबित केल्याची ऑर्डर काढली. पालिकेत ती दुपारी १२वाजता प्राप्त झाली आहे.
मुख्याधिकारी गुटे हे मुंबईला गेले असल्याने निलंबनाची ऑर्डर त्यांच्यावर बजावता आली नाही. ते आल्यावर काय पावित्रा घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.