मैत्रीची कुंडली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



संवाद १ :


“ मावशी, आईचे तुझे इतक्यात काही बोलणे झाले का गं ?”


“ हो, दोन दिवसांपूर्वी आली होती घरी. सहजच आली होती.”


“ तरीच ! “


“ का गं ? काय झालं ? “


“ विशेष काही नाही, इतके दिवस माळ्यावर पडून राहिलेला microwave खाली आलाय किचनमध्ये. मी आणि ताई सांगून सांगून थकलो होतो. काकांनी प्रेझेंट दिलेला होता. पण ही तयारच नव्हती वापरायला. तब्येतीला वाईट असतो असं कुठेतरी वाचलं होतं तिनं. “


“ मला म्हणाली तसं ती ! पण इतका काही धोकादायक नाहीये तो. शिवाय आपण कसा वापरतो यावर पण अवलंबून आहे ना! “


“ हेच आम्ही सांगत होतो तर अजिबात पटत नव्हतं ! बरं झालं बोललीस तिच्याशी, नाहीतर धूळ खात पडून राहिला असता तो microwave. तू सांगितलस की पटतं तिला. मैत्रीण आहेस ना लाडकी ! “

संवाद २ :

“ किती वर्षांनी भेटलो ना आपण ! निरोप समारंभाला भेटलो होतो कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच्या. नंतर दोघी दोन टोकांना गेलो. किती छान वाटलं गप्पा मारून ? “


“ तू तेंव्हा काय म्हणाली होतीस आठवतंय कां ? “


“ आठवतंय ना ! आपली मैत्री अशीच राहील कां, एकमेकींना भेटू नाही शकलो तरी? असं विचारलं होतं मी तुला “


“ मी म्हटलं होतं की, काहीच फरक पडायचा नाही. कितीही वर्षांच्या gap नंतर भेटलो तरी, आपण पहिल्याप्रमाणेच छान गप्पा मारू. आपला संवाद जिथे सुटला आहे तिथूनच पुढे तो सुरु होईल “


“ खरंच झालं गं तसं. मधली वर्षं उडूनच गेली मधून. पूर्वीच्याच मनमोकळेपणाने बोललो एकमेकींशी. किती हलकं वाटतंय. “


“ खरं तर एकच वर्षं एकत्र होतो आपण. नंतर वर्ग बदलले आपले, पण भेटत राहिलो एकमेकींना. चार चार वर्षं ज्यांच्या बरोबर एकाच वर्गात घालवली त्या सर्वांची नावं पण आता लक्षात राहिली नाहीत. “


“ मैत्री होण्यासाठी किती काळ एकत्र होतो ते कुठे matter करतं ? “
ही दोन्ही उदाहरणं मैत्रीच्या अनेक रूपांपैकी आहेत. निखळ – निरपेक्ष मैत्री देवाचं वरदान आहे. कारण सर्वांनाच लाभत नाही ते ! कोणाशी कोणाची मैत्री व्हावी याचं काहीच समीकरण नाही मांडता येत. समान आर्थिक स्तर, समान सामाजिक स्तर, बौद्धिक स्तर, इतकेच कशाला समान वयोगट, असा कोणताच निकष लावता येत नाही मैत्रीला. एखाद्याशी मैत्री करायची असं ठरवून नाही करता येत मैत्री. कारण तो एक – दिशा मार्ग ( one way ) नाहीये. सादाला प्रतिसाद मिळणं अपेक्षित असतं मैत्रीत. समान आवड असणाऱ्या व्यक्तींमध्येच मैत्री होऊ शकते असेही नाही म्हणता येत. कदाचित आवडीचा common विषय हा संवादाचे एक अधिकचे कारण होऊ शकते.

कोणत्याही कारणाने ही मैत्री आपल्या आयुष्यात प्रवेश करू शकते. कधी एकाच मार्गावरचे प्रवासी, कधी एखाद्या कार्यक्रमात झालेली भेट, कधी वाचनालयाचे निमित्त, कधी मैत्रिणीची/ मित्राची, मैत्रीण/ मित्र!

सोशल मिडिया मुळे मैत्रीचा असा अनुभव मिळण्याची शक्यता वाढली आहे. प्रत्यक्ष न भेटताही संवाद साधता येण्याच्या शक्यता, ही एक अनोखी किमया घडू शकते. भिन्न लिंगी व्यक्तीबरोबर मैत्री करण्यासाठी प्रत्यक्ष भेटणे आवश्यक राहिलेले नाही. पूर्वी सामाजिक बंधनामुळे त्यात एक प्रकारचे अवघडलेपण असायचे. अर्थात हे सर्वसामान्य लोकांसाठी होते. समाजाची पर्वा न करता, आरोप – प्रत्यारोप, प्रवाद झेलून सुद्धा अशी मैत्री निभावली जात असे. अशी उदाहरणे कमी नाहीत. आता काळ बदलला आहे. घरी आलेला, आपल्या आईच्या/ वडिलांच्या ऑफिसातील कलिग आईचा/ वडिलांचा मित्र/ मैत्रीण आहे हे आताची पिढी समजून घेऊ शकते. मामा किंवा आत्या अशी ओळख करून देण्याची पद्धत मागे पडत चालली आहे. तरीही समाजमन अजून तितके प्रगल्भ झालेले नाही. सोशल मिडिया असा एक विस्तृत platform आता उपलब्ध झाल्यामुळे निरपेक्ष मैत्रीच्या शक्यता वाढल्या आहेत. इथे सोशल मिडियाचा दुरुपयोग वगैरे मुद्दे बाजूला ठेवले आहेत. कारण सोशल मिडिया नसतांना सुद्धा मैत्रीच्या आवरणाखाली फसवणुकीच्या घटना घडतच असत. कधी अजाणतेपणी तर कधी समजून उमजून! माणसांचा दोष ‘ मैत्री ‘ च्या पवित्र भावनेला का द्यावा ?

विवाह जमवताना कुंडली जुळवण्याची पद्धत आहे. मैत्रीसाठी पण अशीच दोन माणसांची कुंडली जमावी लागते. नाहीतर असे कां व्हावे की एकत्र सहवास असूनही मैत्री नाही होऊ शकत आणि कधी कधी एका भेटीतच खूप जुनी ओळख असल्यासारखं वाटतं! सहवासानं उत्पन्न होते ती मैत्री पेक्षा ‘ सवय ‘ जास्त असते. नेहमीच्या कुंडलीच्या जुळण्यासाठी आवश्यक ३६ गुण पाहता येतात. मैत्रीच्या कुंडलीतले गुण फक्त अनुभवण्याची गोष्ट आहे आणि काही वेळा आकलनाच्या पलीकडची गोष्ट आहे. अशी कुंडली जमते का हे सांगणारा, वेळ पडली तर जमवून देणारा तिसरा माणूस पण असू शकत नाही.

मैत्रीची कुंडली जमली तर स्थळ, काळ आणि वेळेचं बंधन रहात नाही. आपल्या मनातलं सर्व काही सांगावं, साचलेलं, खुपलेलं, रुतलेलं, भावलेलं, मैत्रीच्या कुपीमध्ये ते बंदिस्त करावं, आणि त्या कुपीची किल्ली पण आपल्याकडेच असावी. आपल्याला गरज लागेल तेंव्हाच ती कुपी उघडली जाईल याची खात्री देणारी ही मैत्री! सर्वांना नाही लाभत ही. कारण ‘ उपरवालेने हर किसीके लिये कोई न कोई बनाया है ‘ असं मैत्रीच्या बाबतीत नाही म्हणता येत.


- शुभांगी पुरोहित
@@AUTHORINFO_V1@@