तापमान ४४ अंशांवर!

    25-Apr-2018
Total Views | 34

यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद; ‘स्कायमेट’ची माहिती

 
जळगाव :
राज्यातील अनेक शहरांच्या तापमानाने चाळिशी पार केली आहे. विदर्भातील अकोला, वर्धा व चंद्रपूर भागात उष्णतेची सर्वाधिक लाट आहे. दरम्यान मंगळवारी (दि. २४) जळगाव शहरात तापमानाच्या पार्‍यानेदेखील ४४ अंशांवर झेप घेतल्याची नोंद हवामानाच्या ‘स्कायमेट’ या संकेतस्थळावर नोंदवण्यात आली आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान असल्याची माहिती मिळाली.
 
 
स्कायमेटच्या नोंदीनुसार चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे आतापर्यंत हवामान खूप उष्ण होते. कमाल तापमान ४४.५ अंश सेल्सिअस आणि ४४.३ अंश सेल्सिअस इतके होते. विदर्भातील इतर भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा येत आहेत. त्यात अकोला आणि वर्धा जिल्ह्याचा देखील समावेश आहे. तेथील कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
 
 
हॉट सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव शहरात देखील मंगळवारी पारा ४४ अंशांवर पोहचला आहे. सोमवारचे तापमान ४३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. स्कायमेटच्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील बहुतांश भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात आली आहे. जळगाव शहराचे तापमान येत्या काही दिवसात अजून दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागरिक कासावीस
जळगाव शहरात तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसवर पोहचल्याने जळगावकरांची चांगलीच होरपळ होत आहे. सकाळी १० वाजेपासून उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना कासावीस करीत आहेत. रात्री देखील असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अबालवृद्धांचे उन्हामुळे हाल होत आहेत. जळगाव शहरात दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने मध्यवर्ती बाजारपेठा देखील ओस पडू लागल्या आहेत.
 

टोप्या, रुमाल व गॉगल्सला मागणी - अंगाची लाही लाही करणार्‍या उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी जळगावकरांच्या डोक्यावर टोप्या, रुमाल व डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल्स देखील डोळ्यावर चढले आहेत. महिला तरुणी सन कोट, हँडग्लोज वापरताना दिसायला लागले आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात टरबूज, डांगर, मोसंबी, संत्री अशा मनासह शरीराला गारवा देणार्‍या फळांची आवक झाली आहे. या फळांना मोठी मागणी होत आहे. यासह उसाचा रस, जलजिरा तसेच फळांच्या ज्यूसचे स्टॉल्सवर नागरिकांची गर्दी होत आहे.

 
कुलर मार्केटमध्ये मोठी उलाढाल
शहरात गेल्या आठ दिवसात कुलर मार्केट चांगलेच बहरले आहे. लहान-मोठ्या अशा विविध प्रकारच्या कुलरची विक्री सुरू झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी कुलर विक्रेत्यांनी दुकाने सुरू केली आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121