अक्षरस्नेह जपणारी सोयरी पुस्तके...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018   
Total Views |
परवा जागतिक ग्रंथ दिन साजरा करण्यात आला. आजकाल सारेकाही समाजमाध्यमांवरच साजरे होत असते. ग्रंथ दिन असल्याने अनेक पोस्टस्‌ त्या अर्थाने पडत राहिल्या. अर्थात, आलेल्या पोस्ट फॉरवर्ड करीत आपण किती ग्रंथस्नेही आहोत, हे दाखविण्याची संधी साधत राहिलेत लोक. त्यांच्या घरी कपाटात त्यांची वाट बघत बसलेली पोरकी पुस्तके उसासे टाकत असताना हे वांझोटे पुस्तकप्रेम समाजमाध्यमांवर दाखविण्यात येत होते. वाचनसंस्कृती लोप पावत असल्याबद्दल तावातावाने बोलणार्‍यांना हळूच एकच सवाल करावा, ‘‘गेल्या वर्षभरात तुम्ही वाचलेले पुस्तक कुठले?’’ मग तो गप्प होतो. सगळ्या चांगल्या गोष्टी या इतरांनीच करायच्या असतात आणि आज जे काय वाईट घडते आहे, त्यालाही मी सोडून इतरच कसे जबाबदार आहेत, हे सांगण्यात पांढरपेशा सुशिक्षितांचा हात कुणी धरणार नाही! असला काही प्रश्न केला की मग अल्पविराम घेऊन, ‘‘त्या वयात खूप वाचन केले आहे हो आम्ही...’’ असे उत्तर दिले जाते. ते ठेवणीतले आणि परीटघडीचेच असते. त्या वयात म्हणजे कुठल्या आणि खूप वाचन केले म्हणजे नेमके काय, असा सवाल केला की मग, ‘‘तुम्ही माझा अपमान करत आहात... तुम्हाला हे सारे विचारण्याचा अधिकारच काय?’’ असा प्रतिप्रश्न केला जातो.
आम्ही आमचा अपराधभाव फार काही न करता मनाच्या समाधानासाठी मिटविण्यासाठी काही गमती करत असतो. त्याचाच एक भाग म्हणजे आम्ही असे दिन साजरे करत असतो. हे म्हणजे आपल्या मुलाच्या पंचतारांकित शाळेत वंचितांच्या मुलांना प्रवेश देऊ नये, यासाठी पोटतिडकीने भांडायचे आणि मग ‘आमचे एनर्जी ड्रिंक घ्याल तर त्यावर पन्नास पैसे अनाथ मुलांच्या शिक्षणावर दिले जातील’ अशी जाहिरात असलेलेच ऊर्जा पेय आम्ही आमच्या मुलांसाठी कसे घेतो, हे अहमहमिकेने सांगत सुटण्यासारखे आहे. जे आपल्या आई-वडिलांची सेवा करतात त्यांनी मदर आणि फादर डे साजरे करायचेच नसतात. पुस्तकांचेही हे असेच.
वाचनसंस्कृती लोप पावली म्हणून सुतक पाळणार्‍यांनी त्यांच्या आयुष्यात क्रमिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त किती पुस्तके वाचलेली असतात? काही काळ आधी किमान दिवाणखाना सजविण्यासाठी आणि आपली अभिजात आवड दाखविण्यासाठी पुस्तकांच्या रॅक्स असायच्या घरात. आता नव्या गृहसजावटीच्या नियमात पुस्तके सजावटीसाठीही बसत नाहीत. मुळात आम्हाला आमची भाषाच राहिलेली नाही. मातृभाषा असते, असे म्हणतात. आता ‘माता’ची मदर झालेली आहे. मम्मी झालेली आहे. मुलांना शाळेत इंग्रजीतच बोलले पाहिजे, असा दंडक असतो आणि तो आमच्या कौतुकाचा विषय असतो. आम्ही अगदी नाक वर करून सांगतो, ‘‘आमच्या सनच्या शाळेत मराठीत बोलले तरीही दंड करतात!’’ फारच फार हिंदीत बोलता येते. आजकाल तर शाळांमध्ये (स्कूल्स बरं!) मराठी मुलांना फारच डाऊन मार्केट वाटत असतं. त्यामुळे त्यांना त्यांच्या ‘फर्स्ट नेम’नेच टीचर्सनी हाक मारावी, असे वाटते. गौरव दाबके, पांडे, राऊत... असे काही अडनाव असेल तर केवळ ‘गौरव’ अशीच हाक मारावी, अशी मुलांची इच्छा असते. टीचर मग मम्मीलाही सांगतात, ‘‘इसके साथ ना आप घरमेभी अंग्रेजीमे बात करो...’’ त्याच्यावर इंग्रजीचेच संस्कार व्हावेत म्हणून घरात इंग्रजीच दैनिक घेण्यात येते. त्याची ममीदेखील मग, ‘‘मैं तुझा इन्सल्ट नाही केला...’’ अशी बोलते. त्यामुळे आमची भाषा कुठली, हाही सवाल आहे. त्यामुळे मग वाचन करायचे तर नेमके कुठल्या भाषेतील पुस्तकांचे, असा प्रश्न निर्माण होतोच. तशा खर्‍या भाषा दोनच, एक अध्यात्म आणि दुसरी विज्ञान. अध्यात्म म्हणजे धर्म अशी गल्लत आम्ही कधीचीच केली असल्याने अध्यात्माची भाषा कधीचीच सुटली आणि सोयीसाठी धर्म आपला बरा असतो, त्यामुळे विज्ञान आम्ही स्वीकारतच नाही. त्यामुळे या दोन्ही भाषा आम्हाला अवगत नाही. मग आम्ही वाचायचं तर नेमकं काय, असा सवाल निर्माण होतो. आम्हाला लिपीही नाही माहिती अन्‌ भाषाही.
बरे असो. तुम्हाला जी काय भाषा येते, त्यातले तर वाचा. मुलांना इंग्रजी वाचायला लावा. हिंदी, मराठी अन्‌ तुमची जी काय भाषा असेल ते वाचा. पुस्तकांची हार्ड कॉपी हातात घेऊन नसेल वाचायचे अन्‌ त्या निमित्ताने मोबाईल, टॅब यांचा विरह सहन नसेलच करायचा तर ऑनलाईन वाचा. किमान त्यानिमित्ताने वाचनाची लाईन सोडणार नाही तुम्ही... पण वाचा ना! कधी काळी मुलांना त्यांचे आई-वडील सांगायचे, हे अत्रे, फडके, खांडेकर काय वाचतोस? ज्ञानेश्वरी वाच, तुकारामाची गाथा, दासबोध वाच... ही मुलं मोठी होऊन बाप झाली तर ती त्यांच्या मुलांना सांगत, ‘‘अरे हे काय वाचतोस... वि. आ. बुवा, पुल, वपु, अत्रे, खांडेकर वाच...’’ आता हे सांगण्याची वेळ आली आहे की जे काय वाचायचे ते वाच, पण वाच बाबा!
नव्या पिढीने काय वाचावे, हे सांगण्यासाठी पालकांच्या पिढीने किमान काही वाचलेले असायला हवे. नवे कुठले लेखक आहेत, ते काय लिहीत आहेत, कुठल्या भाषेत काय लिहिले जात आहे... याचे ज्ञान असायला हवे. रात्री न्यूयॉर्क स्ट्रीटवर जन्माला आलेली नवी फॅशन, ट्रेंड सकाळी गावेखड्यात पोहोचलेली असते! नवा आलेला चित्रपट यू ट्युबवर आलेला असतो. पुस्तके मात्र इतक्या झपाट्याने नाही पोहोचत. सुदूर पश्मिमेतल्या ब्रँडेड कंपनीचा पिझ्झा, पाश्ता एका क्लिकवर आमच्या घरात दाखल होतो. विदेशातील ब्रँडेड कंपन्यांचे आऊटलेटस्‌ आमच्या शहरात असतात... अगदी पाण्याचे एटीएम्सदेखील आलेत. भारतातील काही शहरांत तर प्राणवायूचे स्टेशन्स आलेले आहेत. एवढंच काय, कंडोम्स सहज मिळावेत यासाठी व्हेंडिंग मशिन्स ठेवल्या गेल्या रस्त्याच्या कडेने... बीयर अन्‌ मद्यही सहज मिळते. पुस्तके सहज मिळावीत यासाठी आम्हाला काही करावे असे वाटलेले नाही. आमच्या भाषेतील जुने असू द्या; पण वर्तमानातले महत्त्वाचे लेखक कोण, हेदेखील आम्हाला माहिती नसते. गेल्या काही वर्षांत आम्ही कुठले पुस्तक वाचले, या प्रश्नाचेच उत्तर आमच्याकडे नाही, त्यामुळे पुस्तक विकत घेतले का एखादे किंवा महिन्याचे सोडा, किमान वर्षाचे पुस्तक विकत घेण्याचे सुशिक्षित कुटुंबाचे बजेट काय, हे प्रश्नही विचारण्यात काही हशील नाही.
आम्ही सुसंस्कृत आहोत म्हणजे आम्ही घरी गणपती मांडतो, आमच्या धर्माचे सणवार आम्ही निष्ठेने साजरे करतो. सुसंस्कृतपणाचा भाषेशी, वाचनाशी, ग्रंथस्नेहाशी काहीही संबंध नाही. काय वाचू, असे विचारणार्‍याला सांगावेसे वाटते, चातुर्मासात परिवारासह ज्ञानेश्वरी वाच, गाथा वाच... अगदी सहज म्हणून दासबोध वाच... आता घरोघरी ज्ञानेश्वरीही नाही. आधी किमान असायची तरी. अर्थाचे सोडा, मराठी भाषा नीट करायची असेल तर ज्ञानेश्वरीच्या अक्षरांवरून नजर तर फिरवा. थोडे स्वत:बद्दल सांगण्याचा दोष पत्करून सांगतो. आजोबा रेल्वेस्टेशन मास्तर होते. वेळेच्या बाबत पक्के. एक दिवस पूजा करत असताना वेळ झाला म्हणून सोवळे नेसलेल्या अवस्थेतच स्टेशनवर गेले. तिथल्या इंग्रज अधिकार्‍याने विचारले, ‘‘महादेवराव, व्हॉटस्‌ धीस?’’ तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपण सोवळ्यावरच उघड्या अंगाने आलोय्‌. मग त्यांनी, ‘पूजा... वर्शिप...’ असे सांगताच त्या इंग्रज अधिकार्‍याने त्याच्या सरकारी बंगल्यात जाऊन, तो वाचत असलेली ज्ञानेश्वरीची प्रत आजोबांना आणून दिली- कर्तव्यपालनाचे बक्षीस म्हणून!
परके शासकही त्या काळातील लोकांच्या संगतीने असे ग्रंथोपजीविये झाले होते... पुस्तकांच्या अक्षरस्नेहाची अशी आमची काही परंपरा आहे?
@@AUTHORINFO_V1@@