प्रवीणजी, तुम्हीदेखील?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2018   
Total Views |


व्यक्ती कितीही मोठी असली तरी संघटन तिच्यापेक्षाही मोठे, हा संदेश संघटनेला द्यावा लागतो. काही संघ कार्यकर्ते प्रवीण तोगडियांप्रमाणे बंड करतात. स्वतः ला संघटनेपेक्षा मोठे मानायला लागतात आणि मग त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी लागते.

’विश्व हिंदू परिषद’ हे संघ विचारधारेतील भाजप खालोखालचे सर्वात मोठे संघटन आहे. या संघटनेला आजचे विशाल रूप देण्यात अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचे रान केलेले आहे. दिवंगत अशोकजी सिंघल यांच्याकडे जेव्हा विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी आली, तेव्हा विश्व हिंदू परिषदेने व्यापक स्वरूप प्राप्त केले. विश्व हिंदू परिषदेला व्यापक रूप देण्यात डॉ. प्रवीण तोगडिया यांचा वाटादेखील मोठा आहे. १९८३ सालापासून ते विश्व हिंदू परिषदेच्या कामात गुंतले आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या कामाला त्यांनी स्वतः ला समर्पित केले. १९८६ सालापासून विश्व हिंदू परिषदेने रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा एक चेहरा प्रवीण तोगडिया झाले. प्रवीण तोगडिया आणि विश्र्व हिंदू परिषद असे समीकरण आपोआपच झाले.

यामुळे प्रवीण तोगडिया यांनी विश्व हिंदू परिषद सोडली. आंतरराष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनी सोडले, या बातम्या वाचायला आणि ऐकायलाही कठीण जातात. विश्व हिंदू परिषदेत असे वादळ निर्माण झाले नसते तर बरे झाले असते, अशी सर्वांची भावना आहे. डॉ. प्रवीण तोगडिया यांनी संयम ठेवायला हवा होता आणि तसेच संघ विचारधारेचा कुळाचार नीट समजून घेऊन, त्याचे पालन करायला पाहिजे होते. या दोहोंबाबत दुर्दैवाने ते कमी पडले आणि विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी उभे केलेल्या राघव रेड्डींचा पराभव झाला आणि व्ही. एस. कोकजे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांनी कार्यकारी अध्यक्षपदावर अलोक कुमार यांची नियुक्ती केली. डॉ. प्रवीण तोगडिया यांनी विश्र्व हिंदू परिषद सोडली.

गेल्या काही वर्षांतील घटनाक्रम पाहता, परिस्थिती या स्तराला जाईल, याचा अंदाज येऊ लागला होता. जानेवारी महिन्यात प्रवीण तोगडिया आपल्या घरातून निघून गेले आणि त्यांचे असे एकाएकी जाणे सनसनाटी बातमीचा विषय ठरले. त्यानंतर ते एका उद्यानात बेशुद्ध अवस्थेत सापडले. नंतर ते म्हणाले की, ‘‘पोलीस माझ्या मागावर आहेत आणि माझा एन्काउंटर करण्याचा त्यांचा कट आहे. हे त्यांचे वक्तव्यदेखील फार मोठ्या बातमीचा विषय झाले. प्रवीण तोगडिया ही कुणी सामान्य व्यक्ती नव्हे. विश्व हिंदू परिषदेचे ते आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होते. एन्काउंटरमध्ये सामान्यतः गुन्हेगाराला ठार केले जाते. एखाद्या संघटनेच्या नेत्याला कुणी असे मारत नाही. प्रवीण तोगडिया यांना हे सुचवायचे होते की, ‘‘गुजरातचे भाजप सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी नको असल्यामुळे माझ्या जीवाचे काहीही बरे-वाईट होऊ शकते. माझ्या विषयीदेखील बनावट सीडीज तयार केल्या जाऊ शकतात.’’ प्रवीण तोगडियांचे असे सुचविणे हा माध्यमांसाठी चर्चेसाठी चांगला विषय झाला. अशी वक्तव्ये करून आपण विश्व हिंदू परिषदेची प्रतिष्ठा कमी करत आहोत, त्याचप्रमाणे आपल्यावर प्रेम करणार्‍या हजारो कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहोत, हे प्रवीण तोगडिया यांच्या लक्षात आले नाही.

संघ विचारधारेतील कार्यकर्ता केव्हाही व्यक्तिनिष्ठ कार्य करीत नाही. तो व्यक्तीला आपल्या निष्ठा वाहत नाही. व्यक्तीपेक्षा काम मोठे आणि कामामागचा विचार मोठा, याचा खोलवरचा संस्कार त्याच्यावर झालेला असतो. डॉ. प्रवीण तोगडिया यांना हे माहीत नाही असे नाही. या विषयावर त्यांनी अनेकवेळा भाषणेही दिली असतील. विश्व हिंदू परिषद म्हणजे हिंदू हित, हिंदू संघटन, समरस हिंदू समाजनिर्मिती यांसाठी काम करणारी संघटना. कुण्याही व्यक्तीच्या जयजयकारासाठी ती नाही. डॉ. प्रवीण तोगडिया विश्व हिंदू परिषदेच्या या वैचारिक आशयाशी एकरूप झालेले होते, तोपर्यंत ठीक होते. त्यांची सभा असेल तर कार्यकर्ते जीवापाड मेहनत करून, लाखो लोकांना एकत्र करीत. प्रवीणजी उत्तम वक्ते असल्यामुळे आणि समर्पित असल्यामुळे त्यांच्या बोलण्याला एक धार येई. ते प्रचितीचे बोलणे वाटे.

लाखांच्या सभा घ्यायची सवय लागली की, कळत - नकळत त्याची हवा डोक्यात जाते. ‘माझ्यामुळेच लोक गोळा होतात. मी जननेता आहे,’ असे वाटू लागते. संघ विचारधारेतील संघटना लाखा - लाखांच्या सभा घेतात. संघाचे मेळावेदेखील काही लाखांचे होतात, परंतु ते कुणाही व्यक्तीच्या आकर्षणाने होत नाहीत, अगदी सरसंघचालकांच्या आकर्षणानेही होत नाहीत. त्यामागे गंभीर विचार असतो. विचार सुटला आणि प्रवीण तोगडिया यांच्यातला ‘मी’पणा जागृत झाला. मग संघटनेपुढे प्रश्न उभा राहिला की, संघटन चालवायचे की प्रवीण तोगडिया यांच्या ’मी’पणाला खतपाणी घालत राहायचे. अशा वेळी संघटन एकच निर्णय करते आणि तो संघटनेला टिक वून ठेवण्याचा असतो. व्यक्ती कितीही मोठी असली तरी संघटन तिच्यापेक्षाही मोठे, हा संदेश संघटनेला द्यावा लागतो. काही संघकार्यकर्ते प्रवीण तोगडियांप्रमाणे बंड करतात. स्वतः ला संघटनेपेक्षा मोठे मानायला लागतात आणि मग त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी लागते. जनसंघातदेखील अशा कारवाया केल्या गेल्या. राष्ट्रीय नेते बलराज मधोक यांना पक्षातून दूर करण्याचा कठोर निर्णय करावा लागला. अन्य विचारधारांच्या संघटनांत काय होते, हेही आपल्याला माहीत आहे. राजकीय पक्षात लोकनेत्याला बाहेर काढण्याची त्या पक्षातील कुणी हिंमत करीत नाही. तेथे माणूस मोठा आणि विचार छोटा, या सिद्धांतावर काम चालते.
संघ विचारधारेचे काम माणूस मोठा खरा, परंतु त्यापेक्षा विचार मोठा या सिद्धांतांवर चालते. प्रवीण तोगडिया यांनी उपोषण करण्याची घोषणा केली, भाजप सरकार राम मंदिरासाठी काही करीत नाही, मोदींच्या काळात कोणताही विकास झालेला नाही, मोदी सरकार हिंदू हिताची काळजी घेत नाही, असे आरोप त्यांनी केले आहेत. हे आरोप, ज्या हिंदू समाजाच्या वतीने त्यांनी केले आहेत, त्या हिंदू समाजाला ते खरे वाटत नाहीत. हिंदू समाजाच्या भावना दुखविल्या जाव्यात, असे नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत काहीही केलेले नाही, या उलट हिंदू माणसाला अभिमान वाटेल अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेेल्या आहेत. पाकिस्तानच्या गोळीबाराला तोफगोळ्यांनी उत्तर दिले जाते, चीनच्या दादागिरीला कवडीची किंमत दिली जात नाही, अमेरिकेसारख्या बलाढ्य सत्तेला बरोबरीच्या नात्याने वागण्यास मोदींनी भाग पाडलेले आहे.

प्रवीण तोगडिया म्हणतात, त्याच्या उलट स्थिती आज आहे. ज्या पद्धतीने कॉंग्रेस आणि त्यांचे डावे मित्र मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत, तो प्रयत्न आपल्या मुळावर येणार आहे, असे हिंदू माणसाला वाटते. सत्तर एक वर्षांनंतर आपल्या हिताची चिंता करणारा पंतप्रधान लाभलेला आहे, तो हिंदू शत्रूंच्या मनाला खुपतो, हे सामान्य हिंदू माणसला समजते, म्हणून तो जागरूक आहे आणि योग्य संधी येताच तो या सर्वांना चांगला धडा शिकवेल. राम जन्मभूमीचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. खटल्याची सुनावणी सुरू होईल. त्याचा निकालही लागेल आणि बहुदा राम जन्मभूमीवर मंदिर बांधण्याचा मार्ग खुला होईल. ते बांधण्याच्या कामात नरेंद्र मोदी किंवा भाजप कसल्याही प्रकारचा गतिरोध निर्माण करू शकत नाहीत. गतिरोध निर्माण करण्याचे त्यांना काही कारण नाही. मुसलमानांची मते मिळावीत म्हणून त्यांचे तुष्टीकरण करण्याचे धोरण या सरकारचे नाही. हे सरकार आपण सर्व भारतीय आहोत आणि सर्वांचा विकास करायचा आहे, या भावनेतून काम करते. हिंदू माणसाची देखील तीच अपेक्षा आहे. सर्वांना सारखा न्याय द्या, कुणालाही डोक्यावर बसवू नका, एवढी माफक अपेक्षा हिंदू माणसाची आहे. आपले सरकार ती पूर्ण करीत आहे. प्रवीण तोगडिया म्हणतात ती वस्तुस्थिती नाही. नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची व्यक्तिगत स्पर्धा राहू शकते, तो मनुष्य स्वभाव आहे. परंतु, व्यक्तिगत स्पर्धा म्हणजे हिंदू हिताची लढाई नाही, हे प्रवीण तोगडियांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. राजकीय क्षेत्र आणि देशकारणाची इतर क्षेत्रे याच्यामध्ये जबरदस्त अंतर असते.

राजकारण सत्तेसाठी चालते. सत्तेचे मुख्य काम समाजाचे नियंत्रण करणे असते. हे नियंत्रण सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, परराष्ट्रीय व्यवहार, असे सर्वस्पर्शी असते. सत्तेत बसलेल्या माणसांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्यावे लागते. मागे बसून, ड्रायव्हरला सूचना देऊन, गाडी चालत नसते. ड्रायव्हरला गाडी कशी चालवायची हे समजत असते. प्रसंगी सूचना देणे, सावध करणे एवढे काम समर्थनीय ठरू शकते, परंतु ‘मी सांगतो तेच केले पाहिजे, ते न करण्याची हिंमत तुम्ही कशी करता, तुम्ही आमच्यामुळे सत्तेवर आले आहात, आम्ही किंग मेकर आहोत,’ ही भाषा स्वतःविषयी अफाट गैरसमज निर्माण करणारी असते. शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग आहे. चिंचवड देवस्थानाच्या प्रमुखांनी एक न्यायाचा निवाडा केला. शिवाजी महाराज आपल्याला खूप मानतात. आपण त्यांच्या गुरूस्थानी आहोत, या भ्रमात ते राहिले. महाराजांनी त्यांना पत्र लिहिले - ‘‘तुमची बिरूदे आम्हास द्या आणि आमची तुम्ही घ्या. म्हणजे आमचा राजदंड तुम्ही घ्या आणि तुमचा धर्मदंड आम्हाला द्या.’’ चिंचवडच्या महाराजांनी नको त्या ठिकाणी नाक खुपसण्याचे पुन्हा कधी धाडस केले नाही. नरेंद्र मोदी आणि भाजपचे काम जनकल्याणाची सत्ता राबविण्याचे आहे, आपले काम त्यांना समर्थ करण्याचे आहे. काल जेवढे समर्थ केले, त्याहीपेक्षा अधिक समर्थ करण्याचे आहे. हिंदुस्थानात हिंदूंना ताठ मानेने जगायचे असेल, तर केंद्रात हिंदू हिताची चिंता करणारा पक्षच हवा. वटवट करणारे, बेफाम आणि बेताल बडबड करणारे, एक ‘मुक्याची’ भाषा करतो, तर दुसरा आपटी खाऊनही फुसके बार सोडतो, त्यांच्या नादी लागू नये, त्यात आपले हित नाही. प्रवीण तोगडिया यांची साथ देऊ नये, पण कळत नकळत समसमा संगम झाला आहे. म्हणून म्हणावेसे वाटते की, ‘प्रवीणजी तुम्हीदेखील?’


- रमेश पतंगे
 
@@AUTHORINFO_V1@@