प्रतिमा - निरास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


त्या सद्गृहस्थांबद्दल खूप चांगलं बोलायचे सर्व जण त्या सोसायटीतले. इतके दिवस क्वचितच कुठे बाहेर पडायचे ते. घरात अंथरुणाला खिळलेली आई होती. तिची खूप सेवा करायचे ते. सर्वांना खूप आदर वाटायचा त्यांच्या बद्दल. आता त्यांची आई नव्हती या जगात. त्यामुळे बाहेर पडायला लागले होते ते. पण आता असं ऐकू येत होतं की, त्यांच्याकडे कोणी गडी माणूस काम करायलाच तयार नव्हतं. ते फार कटकट तर करतातच, उत्तम आर्थिक परिस्थिती असूनही पगाराचे पैसे पण वेळेवर देत नाहीत आणि खूपच संशयी आहेत असेही सर्वांचे म्हणणे होते. खूपच आश्चर्य वाटलं सर्वांना. ‘अतिशय मातृभक्त‘ असा त्यांचा जो लौकिक होता त्यामुळे तो अतिशय ‘चांगला माणूस‘ पण असणारच अशा अपेक्षेला तडा गेला होता. खरं म्हणजे या दोन्ही गोष्टी भिन्न नाहीत का ?

एक अतिशय उत्तम लेखक होते. हळुवार प्रेमकथा लिहाव्यात तर त्यांनीच. पती पत्नी मधील प्रगाढ प्रेम, त्यागाची भावना, एकनिष्ठता इत्यादी गुणांचे दर्शन उत्कटतेने घडवणाऱ्या अनेक पौराणिक, ऐतिहासिक आणि काल्पनिक कथा कादंबऱ्यांची भुरळ वाचकांना पडली होती. वैयक्तिक जीवनात त्यांचा घटस्फोट झालेला समजल्यावर म्हणूनच काही जणांना धक्काच बसला. त्यांचे लेखन आणि त्यांच्या जीवनातील वास्तव यातील विरोधाभास सर्वांच्या पचनी पडला नाही.

अनेक अभिनेत्यांच्या बाबतीतही असेच घडते. चित्रपटांमधून दाखवली गेलेली, वारंवार ठसवलेली, अतिशय देशप्रेमी, गरीबांचा कैवारी, जीवावर उदार होऊन मानवतेसाठी कितीही कष्ट सहन करणारा, कनवाळू इत्यादी सद्गुणांनी संपन्न अशी त्याची प्रतिमा सर्वसामान्यांना, तो वास्तव जीवनातही असाच असेल अशा भ्रामक समजुतीत ठेवते. काही वेळा तो वेगळ्या अंतस्थ हेतूसाठी लोककल्याणाची पण भरपूर कामं सुरु करतो. त्याला ‘मसीहा‘ किंवा ‘देवाचा‘ दर्जा मिळतो. वास्तव फार जळजळीत असतं. पण लोकं त्याला कायद्याच्याही वरचे मानायला लागलेले असतात. तो असं काही करणारच नाही आणि केलं असेल तरी त्याला सर्व माफ असावं अशी काहीशी त्यांची अपेक्षा असते. या अभिनेत्यांची, स्वतःची अशी प्रतिमा मुद्दाम घडवण्याची ही ‘साजिश‘ १००% यशस्वी होतांना दिसते. काही जणांचे मात्र डोळे उघडतात. पडद्यावर दिसणारी किंवा दाखवली जाणारी प्रतिमा आणि प्रत्यक्ष वास्तव यातील दरी लक्षात येते त्यांच्या! काहीवेळा पडद्यावर खलनायकाची भूमिका करणारा कलाकार प्रत्यक्षात खूपच सहृदय आणि सज्जन असू शकतो. हा एक सुखद भ्रमनिरास असतो.

कोणीच माणूस सद्गुणांचा पुतळा नसतो. पण काहीवेळा आपण एखादा चांगला गुण अनुभवून त्यावरून त्याची एक आदर्श प्रतिमा तयार करतो मनात. एखाद्या घटनेमुळे या समजुतीला धक्का बसला की ‘प्रतिमा निरास‘ होतो. चांगला गायक, कीर्तनकार, चित्रकार, लेखक, अभिनेता, अभिनेत्री हे सर्व त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात दिग्गज असूनही ‘चांगल्या माणूस‘ या कसोटीला खरे उतरतीलच याची शाश्वती नसते. परिचय करून देतांना, ते एक उत्तम xxx आहेतच पण प्रथम एक ‘चांगला माणूस‘ आहेत असा परिचय फारच कमी जणांचा करून देता येतो.

समाजात खूप चांगली माणसं असतात. पण त्यांच्याकडे लोकांच्या नजरेत भरण्याजोगं विशेष असं काहीच कर्तुत्त्व नसतं. खरं म्हणजे या सर्वसामान्य चांगल्या लोकांमुळेच समाजाचं आणि पर्यायाने देशाचं थोडंफार का होईना बरं चाललेलं असतं.

आपल्या मनात निर्माण झालेली प्रतिमा, त्या माणसाच्या त्या कौशल्यापुरतीच मर्यादित ठेवायला हवी. तसे नसते तर असे सेलेब्रिटी फसवणुकीच्या, अपघाताच्या, विनयभंगाच्या, सदोष मनुष्य वधाच्या, देशद्रोहाच्या अशा अनेक गुन्ह्यांच्या आरोपाखाली का पकडले गेले असते? दोषी ठरून का तुरुंगात गेले असते ?

प्रतिमा आणि वास्तव यातील फरक नाही करता आला तर ‘प्रतिमा निरास ‘ अटळ आहे. चांगुलपणावरचा विश्वास उडता कामा नये हे महत्त्वाचं. या विश्वासावरच तर दुनिया कायम आहे.

- शुभांगी पुरोहित
@@AUTHORINFO_V1@@