मोर्णा स्वच्छता अभियानाला बहुमान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2018
Total Views |

 गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डस्‌चे प्रमाणपत्र स्वीकारताना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय. सोबत महापौर विजय अग्रवाल,आमदार हरीश पिंपळे, आयुक्त जितेंद्र वाघ व इतर
 
 
-गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌मध्ये नोंद

अकोला,
 
येथील मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत चाळीस हजार लोकांचा प्रत्यक्ष सहभाग आणि 140 संस्थांनी घेतलेला पुढाकार पाहता अकोला शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणार्‍या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला रविवार, 15 रोजी गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड हे प्रमाणपत्र प्राप्त झाले. मिळालेल्या या प्रमाणपत्रामुळे जिल्हा प्रशासनासह सर्वांचा एकप्रकारे गौरव झाला आहे.
मोर्णा नदी स्वच्छतेसाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी दिलेल्या योगदानाची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌ने दखल घेतली. रविवारी स्वत: या उपक्रमाचे भारतातील प्रमुख अलोककुमार आणि त्यांच्या टीमने मोर्णा स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. जगात अशा प्रकारे नदी स्वच्छतेसाठी हजारो लोक एकत्र येण्याची ही पहिलीच घटना असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. याची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌ने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
याबद्दल त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना प्रमाणपत्र बहाल केले. तसेच महत्त्वाचे म्हणजे मोहिमेत महिलांचा सर्वाधिक सहभाग असल्याबाबतची नोंदही गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌ने घेतली. त्याबाबतचे प्रमाणपत्रही त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले.
नदीच्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छतेअंतर्गत करावयाच्या बाबींचे नियोजन जिल्हा, मनपा व पोलिस प्रशासनाने केले होते. मोर्णा स्वच्छ झालीच पाहिजे या भावनेतून सर्वजण काम करताना दिसत होते.
दरम्यान, मोर्णा स्वच्छता मोहिमेच्या यशस्वितेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचा दिल्ली येथे सत्कार व्हावा, याकरिता अकोलेकरांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवण्याचे आवाहन दिल्लीचे आयएएस अधिकारी जगदीश पाण्डेय यांनी केले.
यावेळी पालकमंत्री डॉ.रणजित पाटील, महापौर विजय अग्रवाल, आमदार हरीश पिंपळे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, योगेश पाटील, डॉ. मनीष शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार रामेश्र्वर पुरी यांनी मोहीम कशा पद्धतीने राबविली याबाबतची माहिती यावेळी दिली.
यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेचा लोगो महापौरांना बहाल केला. नेहरू युवा केंद्राच्या नाजिया खान यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना सन्मानपत्र बहाल केले. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अंधारे यांनी केले.
---
@@AUTHORINFO_V1@@