पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप खासदारांचे एक दिवसीय उपोषण

    12-Apr-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली :  संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज न झाल्याच्या कारणाने भाजपतर्फे आज उपोषण करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी हे उपोषण सर्व स्तरांवर केले. पंतप्रधान मोदी आज चेन्नई दौऱ्यावर असून त्यांनी या दौऱ्यादरम्यान आपले उपोषण कायम ठेवले.
 
पंतप्रधानांनी भाजपच्या सर्व खासदारांना आपापल्या मतदारसंघात एक दिवसाचे उपोषण करण्याचे आवाहन केले होते. संसदेचे कामकाज बंद करून लोकसभेची थट्टा करणाऱ्यांविरोधात उपोषण करायला हवे असे म्हणत त्यांनी खासदारांना उपोषण करण्याचे आवाहन केले होते.
 
दरम्यान संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन चेन्नई दौऱ्यावर आहेत. त्यांनी देखील या दौऱ्यादरम्यान आपले उपोषण कायम ठेवले. तसेच दिल्लीतील सहाही खासदार उपोषण कार्यक्रमात सहभागी झाले. नागरी वाहतूक मंत्री सुरेश प्रभू त्यांच्यासोबत यांनी देखील दिल्ली येथे उपोषण कायम ठेवले.
 
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे कर्नाटक दौऱ्यावर असून त्यांनी या दौऱ्यादरम्यान उपोषण कायम ठेवले. "काँग्रेस देशामध्ये द्वेष पसरवत आहे आणि देशात विभाजनाचे राजकारण करत आहे परंतु देशाच्या जनतेने त्यांची ही रणनीती अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून घेतली आहे. कॉंग्रेसने २०१४ पासून देशातील सर्व प्रमुख निवडणुका गमावल्या आहेत आणि तेच कर्नाटकमध्येही लवकरच होणार आहे." असे वक्तव्य त्यांनी या उपोषणादरम्यान केले.