रोजावा क्रांतीचा प्रेरणास्रोत- अब्दुल्ला ओकलान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2018   
Total Views |

अब्दुल्ला ओकलान हा रोजावा क्रांतीचा प्रेरणास्रोत आहे. त्याची पार्श्वभूमी, वैचारिक बैठक, सद्यस्थिती व अब्दुल्ला ओकलानने कोणाकडून स्फूर्ती घेतली हे जाणून घेणे आवश्यक आहे.

अब्दुल्ला ओकलान
 
 
कोण आहे हा अब्दुल्ला ओकलान?


अब्दुल्ला ओकलानचा जन्म १९४८ ला तुर्कस्तानात झाला. अंकारा विद्यापीठात त्याने राज्यशास्त्र शिकण्यासाठी प्रवेश घेतला, येथेच त्याच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव पडून त्याने डाव्या व विद्यार्थी चळवळीत सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. डाव्या चळवळीशी संबंधित पत्रक वाटल्यामुळे त्याला कारावासही भोगावा लागला होता. नंतर त्याने अंकारा विद्यापीठातील शिक्षण अर्धवट सोडले व तुर्कीमधील कूर्दांच्या अधिकारांसाठी व स्वतंत्र कूर्दिस्तानच्या मागणीसाठी १९७८ ला ‘कूर्दिस्तान कामगार पक्षा’ची (PKK- Partiya Karkeren Kurdistan- Kurdistan Workers’ Party) स्थापना केली. स्वतः शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या व मार्क्सवादाचा पगडा बसलेल्या ओकलानने 'पिकेके' साठी शेतकऱ्यांचा विद्रोह ही माओची विचारसरणी अंगीकारली. त्यामुळे युरोपातील काही डाव्या पक्षांकडून त्याला पाठिंबा मिळाला.

ओकलान हा 'अपो' ह्या टोपणनावाने ओळखला जातो. कूर्दिश शब्द 'अपो'चा अर्थ 'काका'. तुर्कस्तानचा स्वतंत्र किंवा स्वायत्त कूर्द प्रदेशाला किंवा एकंदरितच कूर्दिस्तानला प्रखर विरोध होता. त्यामुळे तुर्कस्तानातील एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेऊन ओकलान व त्याच्या साथीदारांनी १९७९ ला सिरियामध्ये पलायन केले. सिरियाच्या हाफेझ-अल-असाद राजवटीने त्याला आश्रय दिला. मार्क्सवादी काय किंवा माओवादी काय, कोणालाच हिंसेचे वावड नव्हते; त्यामुळे १९८४ पासून 'पिकेके'ने स्वतंत्र कूर्दिस्तानची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशी पर्यटकांचे अपहरण तसेच तुर्कांच्या सैनिकांवर व नागरिकांवर हिंसक हल्ले करून रक्तपात घडवून आणला, ह्यात अंदाजे ४० हजार नागरिक मारले गेले व हजारोंना विस्थापित व्हावे लागले. परिणामतः तुर्कस्तान, अमेरिका, युरोप, नाटोसह बऱ्याच देशांनी 'पिकेके'ला दहशतवादी संघटना घोषित केले. पण रशिया व चीन पिकेकेला पाठिंबा देत नसले तरी त्यांनी पिकेकेला अतिरेकी संघटना घोषित करण्यास नकार दिला. पिकेकेला पॅलेस्टाईन मुक्ती संघटना (PLO), इराण कम्युनिस्ट लीग, मार्क्सवादी अर्मेनियन गनिमी गट- ASALA ह्यासारख्या इतर मूलतत्ववादी मार्क्सवादी गटांच्या रुपात भागिदार गवसले. आंतरराष्ट्रीय व विशेषतः तुर्कस्तानच्या दबावामुळे सिरियाने १९९८ ला ओकलानला देशातून हुसकावून लावले. ओकलानला १९९९ ला नैरोबीमध्ये सीआयएच्या सहाय्याने अटक करून तुर्कस्तानात पाठवण्यात आले व देहान्त शासनाची शिक्षा सुनावण्यात आली पण युरोपीय महासंघाच्या सदस्यतेसाठी आवश्यक म्हणून तुर्कस्तानने ‘देहान्त शासन’ ही शिक्षाच रद्द करून टाकल्यावर ओकलानची शिक्षा २००२ मध्ये जन्मठेपेत रुपांतरीत करून त्याला इस्तंबूलच्या बाहेर मारमरा सागराजवळ इम्राली बेटावर स्थानबद्ध करून एकांतवासात ठेण्यात आले. आजही ओकलान तेथेच स्थानबद्ध आहे. १२ मार्च २००३ ला युरोप मानवाधिकार न्यायालय, स्ट्रॅसबर्ग, फ्रांसने स्वतंत्र व नि: पक्ष न्यायासनाद्वारे ओकलानचा खटला चालवला गेला नाही, खटला न्याय नव्हता व बचाव पक्षाचे अधिकार प्रतिबंधित केले असा निकाल दिला.  पण ह्यावर तुर्कस्तानने दाद मागितली पण, १२ मे २००५ ला युरोप मानवाधिकार न्यायालयाने आधीच्याच निकालाला पुष्टी देऊन पुन्हा खटला चालवण्याची शिफारस केली.

ओकलानला देहान्त शासनाची शिक्षा सुनावल्यावर तुर्कस्तान व इतर युरोपातील देशात दंगे व निदर्शन सुरू झाली. ओकलानने शिक्षेविरोधात दाद मागून युद्धबंदीची घोषणा केली पण २००४ ला पुन्हा पिकेकेने हल्ले सुरू केले. २०११ ला तुर्कीश अधिकाऱ्यांनी ओकलानसोबत गुप्त वाटाघाटी सुरू केल्या व २०१३ ला त्यात यश येऊन ओकलानने तुर्की शासनाविरुद्धचा सशस्त्र लढा मागे घेऊन शस्त्र संन्यासाची घोषणा केली. एकांतवासाची शिक्षा असली तरी ओकलानला पुस्तक वाचन, लेखन व वकीलाला भेटण्याची अनुमती होती. आपल्या वकीलामार्फतच तो आपल्या साथीदारांना संदेश देत असे.



मुरे बुकचीन (१४ जानेवारी १९२१ ते ३० जुलै २००६)

एकांतवासाची शिक्षा भोगत असताना ओकलानने इम्मा गोल्डमन, वॉलरस्टेन, ब्रुडेल इत्यादींचे ग्रंथ विशेषतः मायकेल फोकॉल्टचा ‘Society Must Be Defended’, बेनेडिक्ट अँडरसनचा ‘Imagined Communities’ व मुरे बुकचिनचा ‘The Ecology of Freedom’ व ‘Urbanization Without Cities’ हे ग्रंथ वाचले. त्यांपैकी अमेरिकन तत्वज्ञ व विचारवंत मुरे बुकचिनचे ‘The Ecology of Freedom’ (१९८५) हे पुस्तक तर पिकेकेच्या सर्व सदस्यांनी वाचावे असे ओकलानने सांगितले होते. बुकचिनच्या ''उदारमतवादी नगरपालिका'' (‘‘libertarian municipalism’’) ह्या संकल्पनेने ओकलान भारावून गेला. २००६ ला बुकचिनच्या मृत्युनंतर पिकेकेने ‘२०व्या शतकातील सर्वश्रेष्ठ समाजशास्त्रज्ञांपैकी एक’ असा त्याचा गौरव केला होता.

इम्राली बेटावर स्थानबद्ध असलेल्या ओकलानने वाचन-चिंतनासोबत लेखनही केले.

अब्दुला ओकलानने लिहिलेली पुस्तके/पुस्तिका


Prison Writings I: The Roots of Civilisation (2007)
Prison Writings II: The PKK and the Kurdish Question in the 21st Century (2011)
Prison Writings III: The Road Map to Negotiations (2012)
War and Peace in Kurdistan, Cologne, 2009, PDF
Declaration on the Democratic Solution of the Kurdish Question (1999)
Brochures
War and Peace in Kurdistan (2008)
Democratic Confederalism (2011)


आयुष्यातील बहुतांश काळ मार्क्सवाद, डावा विचार, माओवाद, स्टॅलिनवाद, लेनिनवादाचा पुरस्कार करून त्या वाटेवर चालणाऱ्या ओकलानला आता ह्यातील फोलपणा लक्षात यायला लागला. ओकलानने अतिश्रेणीबद्ध (hierarchical) व पुरेसा लोकशाहीवादी नाही म्हणून मार्क्स-लेनिनवाद नाकारण्यास सुरुवात केली. मार्क्सवाद हा हुकूमशाहीवादी, दुराग्रही आहे व कूर्दांच्या प्रश्नावर उपाय म्हणून असमर्थ आहे असे स्पष्टपणे म्हणायला लागला. मार्क्सवादामुळे झालेल्या भ्रमनिरासाने निर्माण झालेली पोकळी मुरे बुकचिनच्या ''उदारमतवादी नगरपालिका'' ह्या संकल्पनेने भरून काढली. पण ही संकल्पना जशीच्या तशी स्वीकारून कूर्दांच्या व मध्य आशियातील प्रश्नावर लागू करण्याऐवजी ओकलानाने ती ‘Democratic Confederalism- लोकशाही संघवाद’ ह्या स्वरूपात सादर केली. आज रोजावामध्ये क्रांती होऊन जी व्यवस्था कार्यरत आहे ती ह्याच लोकशाही संघवादावर आधारित आहे.

काय आहे लोकशाही संघवाद ? सिरियामध्ये रोजावा क्रांती होऊन लोकशाही संघवाद राबवण्याची संधी कशी मिळाली? जाणून घेऊया पुढील लेखात.

संदर्भ : 


१. Mountain river has many bends: an introduction to the Rojava revolution excerpted from A Small Key Can Open A Large Door: The Rojava revolution, पृष्ठ १०


२. Case of Ocalan v. Turkey, First Section, 12 March 2003, Application no. 46221/99, European Court of Human Rights


३. Case of Ocalan v. Turkey, Grand Chamber, 12 May 2005, Application no. 46221/99, European Court of Human Rights, Published in Reports of Judgments and Decisions 2005-IV


४. Sabio, Oso. Rojava: An Alternative to Imperialism, Nationalism, and Islamism in the Middle East (An Introduction), पृष्ठ ३२


५. उपरोक्त, पृष्ठ १६


- अक्षय जोग
@@AUTHORINFO_V1@@