आडनावात काय ठेवलंय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2018   
Total Views |

 
 
 
आपल्या देशात माणसाच्या ओळखीसाठी त्याचे नाव खूप महत्वाचे असते. मात्र त्याहून महत्वाचे असते आडनाव. त्याचे कारण? कदाचित जात, धर्म किंवा बरच काही महत्वाचं असल्यानं हे आडनाव खूप महत्वाचं असतं. आपल्या येथे अनेक असे दिग्गज कलाकार आहेत ज्यांची ओळख त्यांच्या कतृत्वामुळेच इतकी अधिक समृद्ध आहे की, त्यांना आडनावाची गरज भासली नाही.
 
हा विषय आत्ता चर्चेला घेण्याचे कारण म्हणजे नुकतेच या बाबतीत अमृता सुभाष या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. आडनाव लावल्याने लोक लगेच आपल्या जातीविषयी मत बनवतात. "गरज संपली तेव्हा माणसाची शेपटी गळून पडली, तशीच ‘जात’ गळून पडायची वेळ केव्हाच आलेली आहे. ही काही एका दिवसात होणारी गोष्ट नाही. पण ती हळूहळू व्हायला हवी." अशा भावना तिने आपल्या या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत. तसेच तिने तिच्या आयुष्यात आडनावामुळे आलेले अनेक अनुभव यामधून सांगितले आहे. आपले आडनाव न लावल्याने व्यक्तिच्या नावाने, त्याच्या कामाने लोक त्याला ओळखतात तसेच त्याबद्दल कुठलेही "जजमेंट" करत नाही हे मात्र खरे.
 
 
 
 
 
आपल्या सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे आपल्या नावात आडनावाच्या प्रयोग करत नाहीत. त्यामागे कारणे वेगवेगळी आहेत. कुणी काही वैयक्तिक कारणांमुळे तर कुणी ज्योतिषाने सांगितले म्हणून हे आडनाव लावत नसेल. मात्र आडनाव प्रसिद्ध नसल्याने त्यांच्या कतृत्वाला कुठल्याही प्रकारच्या जातीची, धर्माची, पंथाची, संप्रदायाची किनार उरत नाही.
 
धर्मेंद्र, जीतेंद्र, रेखा, श्रीदेवी, काजोल, गोविंदा, तब्बू, रजनीकांत, व्ही. शांताराम, अजय - अतुल, ललित प्रभाकर, प्राण अशी कितीतरी नावे आहेत ज्यांनी कधीच आपले आडनाव लावले नाही. मात्र त्यांचे कतृत्वच काय ते बोलून गेले. आपल्या सिनेसृष्टीतही "काम मिळावं" आणि आडनावावरुन कोणी आपल्याला काम नाकारू नये यासाठी आपली नावं बदलणारी लोकं देखील आहेत. अक्षय कुमार, दिलीप कुमार हे कलाकार याचीच ठळक उदाहरणे आहेत. अक्षय कुमारचे खरे नाव राजीव भाटिया आहे, तर दिलीप कुमारचे खरे नाव युसुफ खान आहे.
 
या सर्वांच्या यादीत जरी नाव बदलण्याचं किवा आडनाव गाळण्याचं कारण स्पष्ट नसले तरी त्यांच्या कतृत्वासाठी त्यांना त्यांच्या आडनावाची गरज कधीच भासली नाही. रजनीकांतचे खरे नाव शिवाजी राव गायकवाड आहे, मात्र त्याचे नाव रजनीकांत हेच अजरामर झाले आहे.

कास्टिंग काऊच सारखंच कास्ट काऊच :

काही महिन्यांपूर्वी भाऊ कदम या प्रसिद्ध मराठी कलाकाराच्या घरी गणपती बसवण्यात आले आणि अचानक समजले की भाऊ कदम बौद्ध धर्माचे आहेत. बौद्ध धर्मातील काही लोकांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले. त्यांनी घरी गणपती बसवले याविरोधात त्यांनी निषेध व्यक्त केला. खरं तर कलावंत हा कलावंत असतो, त्याची कला कुठल्याही धर्म, जाती यांच्याशी निगडित नसते. त्यामुळे आडनावावरुन जरी कळत नसले तरी एखाद्या घटनेवरुन एखाद्या कलाकाराचा धर्म, त्याची जात उघड होते, आणि मग कास्टिंग काऊच प्रमाणे या "कास्ट काऊच"ला त्याला सामोरे जावे लागते.




 

अमृता सुभाषची पोस्ट खूप बोलकी आहे. आपल्या समाजात प्रसिद्ध कलाकारांच्या दिग्गजांच्या नावावरुन तो अमुक एका समाजाचा आहे असे ठरवून त्या त्या समाजातील लोक त्यांच्या नावावर आपापली पोळी भाजून घेतात. " हा आमच्यातला आहे." किंवा " हा सिनेमा बघितला का आपल्या हीरोने काय काम केलंय." असे संवाद आपल्याला हमखास ऐकायला मिळतात. त्यांच्या नावावरुन सिनेसृष्टीतही राजकारण खेळलं जातं.
 
आपल्याला "मी शिवाजी राजे भोसले बोलतोय" हा चित्रपट आठवतो का? त्यात प्रिया बापट शशिकलाच्या भूमिकेत आहे. तिचा एक संवाद असतो "भोसले आडनावाच्या मुलीला फिल्म इंडस्ट्रीत काम मिळणार का? मला नको ते नाव मी बी. शशिकला असं नाव लावणार." तिचा हा संवाद खूप काही बोलून जातो. चित्रपट सृष्टीत अमुक एका आडनावाचा व्यक्ती म्हणून काम मिळाले नाही, असे देखील अनेकांसोबत होते. फक्त प्रत्येक वेळीच ही बाब समोर येते असे नाही.
 

नाण्याची दुसरी बाजू :

असे म्हणतात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. सिनेसृष्टीतील या नाण्याला देखील दोन बाजू आहेत. सिने सृष्टीतील अनेक कलाकार असेही आहेत ज्यांच्यात जात, धर्म, संप्रदाय, परिवार हे काहीच आड येत नाही. आता "महेश कोठारे, सचिन पिळगांवकर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे" या धम्माल गटालाच बघा. या चौघांनी अजरामर असे चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीला दिले आहेत. आजही प्रेक्षकांना यांच्या जात, धर्माबद्दल उत्सुकता नाही, तसेच कुणाला याविषयी काही माहिती असायचे कारणही नाही. प्रिया बापट, सई ताम्हणकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, स्वप्निल जोशी, नागराज मंजुळे, सोनाली कुलकर्णी नाहीतर उमेश कामत. सिने सृष्टीतील आजच्या या कलाकारांना बघितलं तर त्यांची जात आणि धर्म यांच्याशी कुणालाच घेणे देणे नाही. त्यांनी आडनाव लावले जरी असले तरी देखील त्यांच्या कामावरुनच सगळे त्यांना ओळखतात. एकत्र, एकमेकांच्या कलेची कदर करत नांदणारी चित्रपट सृष्टी देखील रसिक प्रेक्षकांनी बघितलीच आहे.






 
प्रसिद्ध आडनाव पाठीशी घेवून  जन्माला आलेल्यांनी आपलं कतृत्व गाजवंल, तसंच आपलं कतृत्व सिद्ध करत आपलं आडनाव प्रसिद्ध करणारे कलाकार देखील याच सिनेसृष्टीत आहेत. 
 
नावात काय ठेवलंय? असे म्हणतात पण खरा प्रश्न हा आहे आडनावात काय ठेवलंय? आडनाव आपल्या हातात नसतं, मात्र कतृत्व.. ते आपल्याच हातात असतं. सामान्य माणसाच्या आयुष्यात समाजातील काही घटकांमुळे जात, धर्म, संप्रदायाची पाळं मुळं खूप घट्ट झाली आहेत. ती हळू हळू सैल करणंही आवश्यक आहे. मात्र ज्या सिनेसृष्टीतील कलाकारंकडे समाजातील प्रत्येक घटकातील लोक बघतात, ज्यांचा प्रभाव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांवर असतो त्या सिनेसृष्टीतील कलाकारांना या जात, धर्माच्या कचाट्यात अडकावं लागणं हीच मोठी शोकांतिका आहे. त्यांना समाज माध्यमांवरुन याविषयी आपलं मत व्यक्त करावं लागणं दुर्दैवी आहे. कलाकार हा कलेने मोठा असतो, त्यामुळे त्याच्या कलेची टीका ही कलेच्या दृष्टीकोनातून व्हावी, जात धर्माच्या नाही. कलाकाराला खऱ्या अर्थाने कलाकाराचा दर्जा दिला तरच समाजात घट्ट रोवलेली ही जात धर्माची पाळंमुळं सैल होतील.
 
 
 - निहारिका पोळ 
 
 
@@AUTHORINFO_V1@@