अंजनेरीची पर्यावरणपूरक जत्रा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2018
Total Views |
 
 
अलीकडे आपल्याकडचे सार्वजनिक उत्सव हे प्रदूषणाची केंद्रं झालेले दिसतात. मात्र नाशिकजवळच्या अंजनेरी पर्वतावर यंदा झालेल्या जत्रेत प्रदूषण आणि निसर्गाची हानी टाळण्यासाठी खूप चांगले प्रयत्न झाले. या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभागी असलेल्या पर्यावरणाभ्यासक जुई पेठे-टिल्लू यांचा हा अनुभव.......
 
समुद्रसपाटीपासून सुमारे १३०० मीटर उंचीवरचे विस्तृत पठार, त्यावर विखुरलेले उघडे काळभोर कातळ आणि काही भागांत पुरुषभर उंच गवत, यामध्ये उठून दिसणारे काळ्या पाषाणातील टुमदार पुरातन मंदिर, हनुमानाच्या पावलाच्या आकाराचे तळे आणि त्याच्या भोवती पसरलेले दाट जंगल... हे वर्णन ऐकले की नाशिककरांना अंजनेरीच्या पर्वताची आठवण होतेच. हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळख असलेला अंजनेरी ऐतिहासिक आणि जैवविविधतेच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. समृद्ध जैवविविधतेसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या पश्चिम घाट/ सह्याद्रीमधील हा एक अजस्त्र पर्वत. नाशिक शहरापासून केवळ २० किलोमीटर अंतरावर असल्या कारणाने या भागात पर्यटन दिवसागणिक वाढते आहे. मात्र अनिर्बंध आणि निष्काळजीपणाने होणार्‍या पर्यटनाला वेळीच आळा घातला नाही, तर त्यापासून निर्माण होणार्‍या समस्यांची तीव्रता वाढत जाऊन मोठे नुकसान होऊ शकते. वाढत्या पर्यटनाचे योग्य नियोजन, नियंत्रण करणे काही सोपे नाही. त्यासाठी सर्व सहभागीदारांनी एकत्र येऊन, पूरक नियोजन करून, अंमलबजावणी करणे आवश्यक असते. ही प्रक्रिया किचकट, वेळखाऊ व अतिशय अवघड असते. म्हणूनच अशा उपक्रमांची योग्य दखल घेऊन, त्यांची अंमलबजावणी व्हायला हवी. हा लेख लिहिण्यामागेदेखील हेच उद्दिष्ट आहे.
 
 
अंजनेरी हे गाव लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे व वैविध्यपूर्ण आहे. येथे अनेक जातींची, व्यवसायांची, आर्थिक परिस्थितीची, राजकीय विचारसरणींची, सामाजिक स्तराची माणसे एकत्र राहतात. त्यामुळे गाव एकमताला येणे अवघड असते. त्यात शहराच्या जवळ असल्याकारणाने रोजगारासाठी, उपजीविकेसाठी फारसे कोणी परिसरातील जंगलांवर अवलंबून नाही. शेती विकून, अनेकांचे हात आता रिते झालेले. शेतकर्‍यांनी गावठी गुरे विकून टाकलेली, त्यामुळे गुरे चरण्यासाठीसुद्धा आता जंगलावर अवलंबून नाही. थोडक्यात अंजनेरी गडाशी, तेथील जंगलाशी स्थानिकांचे असणारे बंध आता फारसे शिल्लक राहिलेले नाहीत. स्थानिक जनतेचे आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीकडे दुर्लक्ष झाले की बाहेरचे लोक त्याचे शोषण करू लागतात आणि एक दिवस सर्वच नाहीसे होऊन जाते. अंजनेरीचे भवितव्य यापेक्षा वेगळे असावे यासाठी आम्ही अंजनेरी गावात मागील दोन-चार वर्षांपासून जातोय व या कामामध्ये ‘वर्ल्ड वाईल्डलाईफ फोरम’ यांनी सहाय्य केलेले आहे. शालेय विद्यार्थी, तरुण मुलांचे गट यांच्या माध्यमातून अंजनेरी गडाशी स्थानिकांची सुटत चाललेली गाठ परत बांधायचा प्रयत्न करत आहोत. थोडेफार बदल हळू हळू होत आहेत.
 
 
अंजनेरीवर हनुमान जयंतीला मोठी यात्रा भरते. सुमारे लाखभर भाविक पौर्णिमेच्या आदल्या रात्री गड चढून जातात. हनुमान जयंतीला सकाळच्या आरतीसाठी लोक रात्रभर वाट पाहत बसून राहतात. संपूर्ण डोंगर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघतो. अनेक भाविकांचे गट येथून ज्योती पेटवून, स्वतःच्या गावातील देवळात दिवा लावायला घेऊन जातात. हे गट त्यांच्या गावातून अखंड पायी अंजनेरी गडावर येतात. गडावरच्या अंजनीमातेच्या मंदिरातून एक मशाल पेटवतात. ही मशाल अतिशय सांभाळून, विझू न देता, खाली न ठेवता, अनवाणी चालत परत आपल्या गावी घेऊन जातात. ज्योत नेणारी गावे फक्त परिसरातीलच असतात असे नाही. अनेक गट लांबलांबच्या गावांमधूनसुद्धा येतात. परंपरा कशा काही गावांना किंवा भौगोलिक क्षेत्रांना जोडत असतात हे बघणे अतिशय मनोरंजक असते.
 
 

 
 
उंचावरील मोकळ्या पठारांवरून, तापलेल्या कातळावरून, भन्नाट वार्‍यातून, गरम होत जाणार्‍या मशाली नेणे कर्मकठीण असते. या ज्योतीची झळ कधी कधी परिसरालासुद्धा पोहोचते. वार्‍यावर ज्योत हेलकावे खात असते. ज्वाळा वाटेल तशा नाचत असतात. ठिणग्या उडत असतात. आडोसा म्हणून धरलेले पुठ्ठेच कधी कधी पेटतात, चटके बसतात आणि या सगळ्यामुळे एखादी ठिणगी वाटेवरच्या गवतात पडते. गवत पेट घेते. ज्योतीची ज्वाळा होते, ज्वाळेची आग होते आणि आगीचा वणवा होतो. बघता बघता या वणव्यात संपूर्ण माळ जळून खाक होऊन जातो. ना गुरांना चारा शिल्लक राहतो ना पुढच्या वर्षी उगवायला रानफुलांचे बियाणे!
गावातून आणि बाहेरून दुकानदार येतात. रात्रभर खाद्यपदार्थ, पूजेचे साहित्य, खेळणी विकायला दुकाने मांडतात. या दुकानांमुळे गडावर कचर्‍याचे ढीग जमतात. या दरम्यान अनेक लोक अन्नदान करण्यासाठी पुढे सरसावतात. अन्नदानासारखे पुण्याचे काम करत असताना प्लास्टिकच्या डिश, पाण्याचे ग्लास, यांमुळे गड अस्वच्छ होतो. उरलेले अन्न गडावरच फेकले जाते. ते तेथेच कुजते. चरणार्‍या गुरांना, शेळ्यांना यातून विषबाधा होते. गावकर्‍यांचे मोठे नुकसान होते. संवेदनशील ठिकाणी कचरा साचणे, वणवे पेटणे, वनस्पतींची अवैध तोड आणि वन्यजीवांना खायला घालणे या यात्रेच्या वेळी उद्भवणार्‍या समस्या आहेत. आणि या सर्व समस्यांमागचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिकांची गडाच्या परिस्थितीबाबतची अनास्था. या वर्षी प्रथमच ग्रामपंचायत वनव्यवस्थापन समिती अंजनेरी, वन खाते (नाशिक-पश्चिम) व स्थानिक युवक यांनी एकत्रितपणे यात्रेचे नियोजन केले व यातील बर्‍याच समस्यांना आटोक्यात आणण्याचा थोड्या प्रमाणात प्रयत्न झाला. दुकानांची नोंदणी करून घेतली. प्रत्येक दुकानदाराकडून अनामत रक्कम घेण्यात आली व ती रक्कम दुकानदाराने दुकान आवरल्यावर व दुकानामुळे तयार झालेले प्लास्टिक गोळा केल्यावरच परत मिळेल अशी सूचना त्यांना देण्यात आली.
 
 
 
 
याचा फायदा म्हणजे यात्रेनंतर प्लास्टिकच्या कचर्‍याचे प्रमाण खूप कमी झाले. अन्नदान करणार्‍यांना पानांच्या पत्रावळ्या वापरण्याची सूचना देण्यात आली. त्यांच्याकडूनदेखील कचरा व्यवस्थापनासाठी अनामत जमा करण्यात आली. जनार्दनस्वामींची गादी पुढे चालवणार्‍या शांतिगिरी महाराजांच्या अनुयायांनीदेखील या उपक्रमाला चांगला हातभार लावला.
 
 
वनखात्याने जागोजागी फलक उभे केले. तीन पाळ्यांमध्ये कर्मचारी विभागून, एका पाळीमध्ये १०-१२ वन कर्मचारी गडावर थांबतील अशी व्यवस्था केली गेली. संपूर्ण वेळ गस्त घालून, त्यांनी ज्वलनशील पदार्थांच्या वापरावर नियंत्रण आणले. यामधून वणव्यांचे प्रमाण आटोक्यात राहिले. गावातील विद्यार्थी व तरुणांनी एकत्र येऊन, वनखात्याला परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत केली. त्यांनी पाच-सहा गटांमध्ये राहून, जनजागृतीचे व भाविकांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्याचे काम केले. ‘‘प्लास्टिक वापरू नका; कचरा केवळ कचराकुंडीतच टाका; ज्वलनशील पदार्थ वापरू नका; माकडांना खायला घालू नका; वाटा सोडून गवतात शिरू नका,’’ अशा सूचना त्यांनी भाविकांना दिल्या. दुकानदारांनीदेखील सहकार्य केले व गडावर कचरा व वणव्याचे प्रमाण कमी राहिले.
 
 
सर्वांनी एकत्र केलेल्या नियोजनाला चांगले फळ मिळाले. सर्व सहभागीदारांचा उत्साह व आत्मविश्वास वाढला. पुढच्या वर्षी, या नियोजनात अधिक सुधारणा होईल व गडाचे नुकसान कमी होईल अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास हनुमानाचे खर्‍या अर्थी पूजन होईल, असे म्हणता येईल.
 
 
 
- जुई पेठे-टिल्लू
 
@@AUTHORINFO_V1@@