त्रिपुरातील विजयाचा अन्वयार्थ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
ईशान्य भारतात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅण्डमध्ये सत्तापालट झाला आहे. त्रिपुरामध्ये आतापर्यंत डाव्या पक्षांची म्हणजे माकपाची सत्ता होती, माकपाचा 25 वर्षापासूनचा ‘लाल’किल्ला भाजपाच्या ‘भगव्या’गडाने उद्‌ध्वस्त केला. भाजपाच्या ‘हिर्‍या’ने माकपाच्या ‘माणिक’वर मात केली . त्यामुळे त्रिपुरातील विजय हा ऐतिहासिक आणि नव्या मन्वतंराची सुरुवात करणारा आहे.
 
मेघालयात कॉंग्रेसची सत्ता होती, तेथेही सत्ताबदल होत भाजपाच्या पाठिंब्याने नॅशनल पीपल्स पार्टीची सत्ता आली. नागालॅण्डमध्येही नागा पीपल्स फ्रंटची सत्ता जाऊन भाजपाच्या पुढाकाराने नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला. ईशान्य भारतातील या तीन राज्यात कोणत्याच पक्षाला आपली सत्ता कायम ठेवता आली नाही. मात्र त्रिपुरातील भाजपाच्या विजयाचे महत्व वेगळेच आहे.
त्रिपुरामध्ये तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा धक्कादायक पराभव झाला, अशा पराभवाची कल्पना माकपाने स्वप्नातही केली नसावी. मावळते मुख्यमंत्री माणिक सरकार यांची स्वच्छ प्रतिमाही माकपला या पराभवापासून वाचवू शकली नाही. पश्चिम बंगाल नंतर त्रिपुराच्या रुपात आणखी एक राज्य माकपाने गमावले आहे. माकपाकडे आता फक्त केरळहे एकमेव राज्य उरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत येताक्षणीच कॉंग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती, भारताला कॉंग्रेसमुक्त करताकरता देश डावेमुक्त होण्याच्या दिशेने निघाला आहे. तीनपैक़ी दोन राज्यातील सत्ता डाव्या पक्षांनी गमावली आहे. आता केरळही त्यांच्या हातातून निसटल्यात जमा आहे. म्हणजे कॉंग्रेसपाठोपाठ देश माकपामुक्त होत आहे.
 
ईशान्य भारतातील या निवडणुकांनी माकपलाच नाही तर कॉंग्रेसलाही जबर धक्का दिला आहे. मेघालय कॉंग्रेसला आपल्याकडे कायम ठेवता आले नाही. मेघालयमध्ये सर्वाधिक म्हणजे 21 जागा जिंकून कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तरीही तो राज्यात सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरला. आधी गोवा आणि मणिपूरमध्ये जे झाले, त्याच इतिहासाची मेघालयमध्ये पुनरावृत्ती झाली.
त्रिपुरात माकपाच्या पराभवाची अनेक कारणे आहेत. माणिक सरकारला यांना राज्यात अॅण्टिइन्कमबन्सीचा सामना करावा लागला. 25 वर्षापासून त्रिपुरात माकपाची सत्ता असतांना राज्याचा कोणताही विकास होऊ शकला नाही. विकासासाठी आवश्यक असलेल्या रस्ते, रेल्वे, विमान आणि दूरसंचार या पायाभूत सुविधापासून त्रिपुरा वंचित राहिले. देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री अशी माणिक सरकार यांची प्रतिमा होती, ती प्रतिमा त्यांच्या मुळावर आली. माणिक सरकार यांचे स्वत:चे घरही नव्हते, गाडीही नव्हती. मुख्यमंत्री म्हणून मिळणारे पगार आणि भत्ते पक्षाल देऊन पक्षाकडून मिळणार्‍या पाच हजार रुपयांच्या मानधनात ते आपला उदरनिर्वाह करत होते, याचे गोडवे गाण्यात आले.
माणिक सरकार यांची पत्नी सरकारमध्ये प्रथमश्रेणीची अधिकारी होती, हा भाग वेगळा. पक्षाची भूमिका म्हणून मणिक सरकार यांनी गरिबी पत्करली होती, याचा अर्थ असा नाही की, त्यांनी राज्यातील जनतेलाही 25 वर्षापासून गरीबच ठेवावे. आपली गरिबी दूर करण्यासाठी राज्यातील जनतेने 25 वर्षापासून माकपाला आणि 20 वर्षापासून स्वत: माणिक सरकार यांना प्रचंड बहुमताने विजयी केले होते, पण या बहुमताचा उपयोग माणिक सरकार यांना राज्यातील जनतेच्या विकासासाठी, त्यांची गरिबी दूर करण्यासाठी करता आला नाही.
 
राज्यातील आदिवासी जनतेने विमान आणि हेलिकॉप्टर कधीच पाहिले नाही. त्यामुळे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी त्रिपुरात प्रचारासाठी हेलिकॉप्टरने गेले तेव्हा राज्यातील जनता त्यांचे भाषण ऐकण्याऐवजी पूर्ण वेळ हेलिकॉप्टरच पाहात बसली होती.
मुळात कम्युनिस्टविचारधारा आपल्या देशातील मातीत कधी रुजूच शकली नाही. कारण, ही विचारधाराच या देशातील नव्हती. कम्युनिस्ट विचारधारा ही मुळची रशियाची. रशियातील कम्युनिस्ट पक्षांचा आचारविचार घेऊन आपल्या देशात कम्युनिस्ट पक्ष आले. त्यांना या देशाच्या मातीशी काहीच देणेघेणे नव्हते. सूर्यफूल ज्याप्रमाणे सूर्याच्या दिशेने वळत असते, त्याप्रमाणे भारतातील कम्युनिस्टही रशियाच्या इशार्‍यावर काम करत होते. ज्या रशियाच्या इशार्‍यावर कम्युनिस्ट नाचत होते, त्या रशियातील कम्युनिझम कधीच संपला होता, पण भारतात मात्र तो काही प्रमाणात तग धरुन होता. त्रिपुरातील निकालाने आता तो संपत आला आहे.
भारतात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1925 मध्ये झाली. त्यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष होता. पुढेही 1964 मध्ये वैचारिक मतभेदांमुळे या पक्षात फूट पडून माकपची स्थापना झाली. पुढे कम्युनिस्ट पक्षात आणखी फुट पडत त्याचे वेगवेगळे गट तयार झाले. मात्र कम्युनिस्टांच्या वागणुकीत कधी फरक पडला नाही. त्यांची गुर्मी आणि गुंडागर्दी कायमच राहिली. मुळात लोकशाहीवर कम्युनिस्टांचा कधीच विश्वासच नव्हता. सहिष्णूता कशशाशी खातात हे त्यांना माहीत नव्हते.
देशात सर्वात असहिष्णू कोणी असतील तर ते कम्युनिस्ट. त्रिपुरा आणि केरळमध्ये कम्यनिस्टांच्या हिंसाचारात आतापर्यंत शेकडो संघ स्वयंसेवकांचा बळी गेला. देशात आणि जगात आपल्याशिवाय दुसरीही विचारधारा राहू शकते, आणि ती विचारधारा आपल्याला मान्य नसेल तरी त्याचा आदर केला पाहिजे, हे कम्युनिस्टांना कधी मान्य झालेच नाही. त्यामुळे राष्ट्रवादी विचारधारा घेऊन काम करणारे संघ कार्यकर्ते हे नेमहीच कम्युनिस्टांना खूपत आले.
मानवता आणि माणुसकी याचा आणि कम्युनिस्टांचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. कम्युनिस्टांची हीच पाशवी वागणूक राज्यातील जनतेला मान्य नव्हती. विचारधारेचा मुकाबला विचारधारेनेच करायचा असतो, शस्त्राने नाही, हे तत्व कम्युनिस्टाने कधी पटलेच नाही. त्यामुळे राजकीय विरोधकांना आपल्या वागणुकीने जिंकण्याएवजी कायमचे संपवण्याकडे त्यांचा नेहमीच कल राहिला. याच विचारधारेने कम्युनिस्टांचा घात केला. कारण काळानुसार कधी कम्युनिस्टांना बदलता आले नाही. राज्यातील जनतेला कम्युनिस्टांची विचारधारा कधीच मान्य नव्हती. कम्युनिस्टांच्या शंभर पापाचा घडा भरला होता, त्यामुळे मतदाररुपी श्रीकृष्णाने आपल्या मतपेटीरुपी सुदर्शनाने कम्युनिस्टांच्या पाशवी बहुमताचा शिरच्छेद करत त्याला त्याची जागा दाखवून दिली. राज्यात भाजपाच्या कमळाला दोनतृतियांश बहुमताने विजयी केले.
हा विजय भाजपाचा असला तरी या विजयाची पाळंमुळं संघपरिवारातील वनवासी कल्याण आश्रम, सेवाभारती, विद्याभारती यांच्यासह अनेक संघटनांनी वर्षानुवर्ष निस्वार्थ भावनेने केलेल्या कामामुळे रुजली होती. ‘असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभवणे हेच आमची शील’, या वृत्तीने केलेल्या कामामुळे राज्यातील जनतेचा विश्वास आणि मनं संघपरिवारातील शेकडो कार्यकर्त्यांनी जिंकले होते. मात्र हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. यासाठी शेकडो कार्यकर्त्यांना आपल्या प्राणाचे आणि सर्वस्वाचे बलिदान करावे लागले. त्यांच्या बलिदानावरच भाजपाच्या या विजयाची ही इमारत उभी आहे. त्यामुळेच त्रिपुरातील विजय हा साधा नाही तर संघपरिवाराच्या विचारसरणीचा, सहिष्णूतेचा माणसुकीचा आणि मानवतेचा विजय आहे. त्यामुळे या विजयाचे महत्व अनन्यसाधारण आहे. या विजयाने देशात एका नव्या सुवर्णयुगाचा प्रारंभ होणार आहे, यात शंका नाही. फक्त एका राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील विजय एवढाच याचा मर्यादित अर्थ नाही. तर या विजयात खूप काही सामावले आहे.
 
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@