एकटीला आधार, एक सवाष्ण पुढाकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018   
Total Views |

 
- ‘हॉटेल स्टेडियम’मध्ये फक्त विधवा भगिनींनाच नोकरी
 
- संचालिका श्यामल वनकर यांच्या तळमळीतून साकारली योजना
स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वयंभू नसेल तर तिचे जगणे हे सत्त्वपरीक्षाच असते... हा विचार एका स्त्रीनेच केला अन्‌ गरजू विधवा भगिनींनाच आपल्या हॉटेलमध्ये नोकरी देण्याचा सवाष्ण निर्णय घेतला!
श्यामल अमोल वनकर यांनी पतीच्या पाठिंब्याने वर्ध्यातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात ‘हॉटेल स्टेडियम’ सुरू केले. या हॉटेलमध्ये फक्त आणि फक्त विधवा आणि गरजू महिलांनाच त्या नोकरी देतात.
 

 
 
श्यामल यांनी एमबीए केले. त्या मेडिकल रीप्रेझेंटेटिव्ह होत्या. नंतर त्या पतीच्या हॉटेल व्यवसायात सहभागी झाल्या. नोकरीच्या निमित्ताने समाजात वावरताना एकट्या पडलेल्या महिलांवर होणार्‍या अन्याय आणि अत्याचाराच्या कहाण्या त्यांनी अनुभवल्या. तिची अवस्था ‘घरची ना घाटची’ अशीच असते. पती गेल्यावर तिची जबाबदारी आपली नाही, असे सासरच्यांना वाटते आणि माहेरही तिला परके झालेले असते... अशा वेळी समाजकंटक तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. आयुष्याला आधारच नसलेल्या अशा भगिनींसाठी काही करण्याची तळमळ श्यामला यांच्या मनांत निर्माण झाली. इच्छा असली की मार्ग निघतोच. अनघा बचत गटाची स्थापना करून समाजात ‘पांढर्‍या कपाळाची’ म्हणून हिणवले जाते अशा भगिनींना आर्थिक सौभाग्य देण्याचा मार्ग खुला झाला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनात येथील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात स्टेडियम हॉटेलची निर्मिती करून गरजू विधवांनाच नोकरीवर ठेवले.
 
आपल्याकडे विविध पदांवर जवळपास 10 महिला काम करीत आहेत. त्यांना काम करण्यात रूची वाढत चालली असून हॉटेल व्यवसातील नावीन्यही त्या शिकण्याच्या तयारीत आहेत, असे श्यामला म्हणाल्या.
हॉटेल स्टेडियममध्ये कविता नेहारे (व्यवस्थापक), निशा मुंजेवार, स्नेहल वैरागडे (रोखपाल), जयश्री लोहवे (सहाय्यक रोखपाल), दीपिका नाले (असिस्टंट शेफ), रूपाली डोंगरवार आणि तोषिका धानुगल (वेटर) तर जयनुब्बी शेख व शहनाज शेख या तेवढ्याच जिद्दीने हॉटेल सारख्या व्यवसायात काम करीत आहेत.
गजानन नवघरे
सेवाग्राम,
@@AUTHORINFO_V1@@