सज्जनशक्ती राष्ट्रशक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018   
Total Views |






राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घाटकोपर विभागातर्फे राष्ट्रोत्थान सेवा संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विवेकानंद एज्युकेशन सोसायटी, कुर्ला येथे ४ मार्च रोजी सकाळी ९ ते सायकांळी ५ वाजेपर्यंत मानखुर्द, माहुल, कुर्ला पूर्व ते मुलुंडपर्यंत काम करणार्‍या सेवाभावी संस्था आणि व्यक्तींचे एकदिवसीय स्नेहमिलन या सेवा संगममध्ये आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आणि सेवाकार्यांचे मार्गदर्शक सुहासराव हिरेमठजी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.



सज्जनशक्तीची ताकद आणि त्यांचे एकत्रिकरण असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, घाटकोपरतर्फे आयोजित केलेल्या ‘राष्ट्रोत्थान सेवा संगम’ कार्यक्रमातर्फे या सज्जनशक्तीची गणना झाली. एकत्रिकरण आणि मनोमिलन झाले आहे. ही सज्जनशक्ती तर एकत्रित झाली आहे, पण त्याचे प्रयोजन काय आहे तर आपल्या देशामध्ये २०११ साली आर्थिक सर्वेक्षण केले गेले, त्यामध्ये जे सत्य समोर आले ते फार विदारक आहे. आजही देशात ५१ टक्के लोक हातावरचे पोट असणारे मजूर आहेत. ग्रामीण भागातील ६० टक्के कुटुंबांचे मासिक उत्पन्न १००० रुपयांच्या आत आहे. ही ६० टक्के कुटुंबे अनुसूचित जाती आणि जमातीमधील आहेत. इतकेच नव्हे तर ६.५ लाख व्यक्ती भिकेवर जगतात, भिकारी आहेत. ५ लाख लोकांची उपजीविका कचरा वेचण्यावर निर्धारित आहे. एका मंत्र्याने मागेच सांगितले होते की, २५ कोटी लोकांना आजही एकवेळ उपाशी झोपावे लागत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, घाटकोपरतर्फे आयोजित केलेल्या ‘राष्ट्रोत्थान सेवा संगम’ कार्यक्रमात सुहासराव हिरेमठ बोलत होते आणि त्यांचा प्रत्येक शब्द सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येक सेवाभावीच्या हृदयाला पीळ पाडत होता. सुहासरावांनी उपस्थित समुदायाला आवाहन केले. ‘‘एक भारतीय माणूस म्हणून आपले कर्तव्य आहे की, ही परिस्थिती बदलायला हवी. हवी की नाही?’’ अर्थात सुहासरावांच्या प्रश्‍नाला शाब्दिक नव्हे, तर प्रत्यक्ष समस्येला भिडून ती समस्या सोडविण्यासाठी समस्त श्रोतृवर्ग प्रयत्नशील होणार होता यात काही शंका नाही.


मुंबईत पहिल्यांदाच रा.स्व. संघाच्या घाटकोपर विभागातर्फे सेवासंस्थांना समर्पित असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘राष्ट्रोत्थान सेवा संगम‘ कार्यक्रमाचे निमंत्रक होते ’दि फाईन आर्ट्स’ सोसायटीचे अध्यक्ष आणि अभंगरत्न गणेश कुमारजी, संयोजक होते निलेश पवार, रा.स्व. संघ घाटकोपर विभाग संघचालक किशोर मोघे, शामा शारदा, रवी कुलकर्णी, निशी सिंघला आणि संजय जैन. ४ मार्च शिवजयंती, तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. त्यातच रविवार म्हणजे सुट्टीचा वार. अशा विलक्षण दिवशी सेवाभावी वृत्तीच्या मानसिकतेचा जागर करण्यासाठी रा.स्व. संघाच्या रचनेतील घाटकोपर जिल्ह्यामधील सज्जनशक्ती एकत्रित येईल का? इतर लोकांसाठी कदाचित प्रश्‍नचिन्हच होते. पण, याबाबत रा. स्व. संघाचे घाटकोपर जिल्ह्याचे संघचालक किशोर मोघे आणि कार्यवाह संजय नगरकर निश्‍चिंत होते. असणारच, कारण त्यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तीन महिने आधीपासून तयारी सुरू केली होती.


घाटकोपर जिल्ह्यातील मानखुर्द, माहूल, चेंबूर कुर्ला पूर्व, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप ते मुलुंडपर्यंतचा भाग या सार्‍यांनी मिळून पिंजून काढला होता. परिसरातील माहिती असलेल्या सर्व सेवाभावी संस्था व्यक्तींना भेटी देऊन या कार्यक्रमाची माहिती देत होते. या संस्थांची नोंद आपल्याकडे असावी म्हणून विभागाने एक फॉर्मही तयार केला होता. सेवाभावी संस्थांनी या फॉर्ममध्ये आपल्या संस्थेची माहिती भरणे अपेक्षित होते. त्या संस्थांमधील किमान दोन सेवाभावी पदाधिकार्‍यांनी कार्यक्रमाला येणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे सर्वजण आवाहनही करत होते. तरीही प्रश्‍न होता प्रत्यक्ष कार्यक्रमाला किती जण येतील? कारण आपल्या खर्चाने कार्यक्रमाला यायचे होते. पूर्ण दिवस कार्यक्रमाला उपस्थित राहायचा आग्रह होता. या बदल्यात कार्यक्रमाला उपस्थित राहणार्‍यांना काही भेटवस्तू किंवा लाभाची आश्‍वासनेही मिळणार नव्हती तर कार्यक्रमाच्या रूपरेखेवरून स्पष्ट होते की, या कार्यक्रमामध्ये फक्त आणि फक्त वैचारिक आणि मानसिक सहृदयाची देवाणघेवाण होणार होती. या हृदयाचा सेवाभाव त्या हृदयाशी जुळून सेवाभावाची वैश्‍विकता वाढणार होती. तरीही, २६० सेवाभावी संस्थांनी आपला तपशीलवार फॉर्म भरून ‘राष्ट्रोत्थान सेवा संगम’ कार्यक्रमाला यायची ग्वाही दिली. एकूण २५० च्या वर सेवाभावी व्यक्ती या संस्था माध्यमातून या स्नेहमिलनासाठी उपस्थित होत्या.


प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी संघ कार्यक्रमात आढळणारी नेहमीची तप्तरता शिस्त आणि संस्कारशील सौजन्य होते. एखादी चित्रफित सुरू व्हावी आणि ती कुठेही न थांबता सुरळीत आणि सुस्वरूपपणे अविरत सुरू व्हावी तसा हा ‘राष्ट्रोत्थान सेवा संगम’ कार्यक्रम सुरू झाला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. संजय नगरकरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गणेशकुमारजी आपले मनोगत व्यक्त करू लागले. ते म्हणाले, ’’ प्रत्येक सकारात्मक गोष्टीमागे एक ऊर्जा असते. ती ऊर्जाच कोणत्याही सकारात्मक यशाला कारणीभूत ठरते. आज सज्जनशक्ती येथे विराजमान झाली आहे. त्या सज्जनशक्तीचा आंतरिक सेवाभाव इथे जमलेल्या संस्थांना, सेवाभावी व्यक्तींना प्रेरणात्मक ऊर्जा देणार आहे.’’ गणेशजींनी संस्थाना दिलासा दिला होता की, कोणतीही सेवाभावी संस्था, व्यक्ती एकटी नाही तर तिच्यासोबत ही इतकी मोठी सज्जनशक्ती आणि तिची ऊर्जा आहे.


त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुहासराव हिरेमठांनी आपल्या मनोगताला सुरुवात केली. संथ पण मनाला भिडणार्‍या लयीत सुहासजी बोलत होते. देशभर फिरताना पाहिलेल्या, अनुभवलेल्या सेवाभावी संस्थांची आपुलकीने ओंथबलेल्या शब्दांतून ते माहिती देऊ लागले. प्रत्येक घटना सांगताना त्या घटनेचा संदर्भ ‘सर्वेनसुखिन भवतू सर्वे सन्तू निरामया|’ या पवित्र संकल्पनेशी जोडला जात होता. अर्थात हा योगायोग नक्कीच नव्हता, तर सुहासरावांनी आयुष्यभर सेवाभावी संस्थांशी जपलेली जी बांधिलकी होती, ती बांधिलकी शब्दरूपात अव्यक्त सेवावैभव घेऊन प्रकट होत होती. सेवा करणार्‍या काही व्यक्ती जन्मजात सेवेकरी म्हणून जन्मतात, तर काही प्रसंगानुरूप सेवाव्रती होतात. असे जरी असले तरी सेवा आणि त्याग हा भारतीयांच्या अंतःकरणातला सर्वोच्च गुण आहे, असे नमूद करताना सुहासजींनी दक्षिण भारतामध्ये घडलेली एक घटना सांगितली. ते म्हणाले, ‘‘हातपाय नसलेला अंध विकलांग भीक मागत रस्त्यातून फिरत होता. पाय नाही, चालता येत नाही, कसाबसा सरकत तो दयनीय अवस्थेत रस्त्यातून भीक मागत होता. त्यावेळी दक्षिणेत त्सुनामीने कहर केला होता. गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली होती. संपत्तीची आणि मानवी जीवनाचीही अगणित हानी झाली होती. उन्मळून पडलेली गावे, समाज पुन्हा बांधणे गरजेचे होते. रा.स्व. संघाचे स्वयंसेवक त्यासाठी कामाला लागले. जे मदत करू शकतात त्यांच्याशी संपर्क सुरू झाला. अशावेळी स्वयंसेवकासमोर नेमका हा अतिविकलांग भिकारी आला. त्याचा तो लाचार विलक्षण अवतार, त्याचे बहुविकलांगित्व पाहून स्वयंसेवकाला त्याही परिस्थितीत दया आली. त्याने त्या भिकार्‍याला देण्यासाठी पैसे काढले पण काय आश्‍चर्य! भिकार्‍याने अंदाजाने स्वयंसेवकास थांबवले आणि तो म्हणाला, ’’मला काही देऊ नका. उलट मलाच तुम्हाला आजची दिवसभराची भीक द्यायची आहे. कारण तुम्ही त्सुनामीने बरबाद झालेल्यांना पुन्हा उभे करण्यासाठी मदत मागता आहात, मदत करता आहात. कृपया माझ्याकडून हे पैसे घ्या.’’ हे एकून स्वयंसेवकांसकट उपस्थित सारेच जण अवाक् झाले कारण त्या बहुविकलांग भिकार्‍याला वर्षोनुवर्षे लोकांनी भीक मागताना पाहिले होते. त्याने आज आपली पूर्ण दिवसाची भीक सेवेसाठी दान केली होती. ही सेवावृत्ती त्याच्यात कुठून आली होती? त्याच्या पार्श्‍वभूमीवरून स्पष्टच होते की, त्याला कोणतीही सधन किंवा संस्कारशील सामाजिक, कौटुंबिक पार्श्‍वभूमी नव्हती, तो कोणत्याही शाळेत गेला नव्हता, त्याने सेवाविषयक कोणतेही पुस्तक वाचले नव्हते किंवा त्याच्याशी कोणीही सेवाविषयक संवाद साधला नव्हता. तरीही त्याच्या मनात आपद्ग्रस्त परिस्थितीत असलेल्या व्यक्तींविषयी करुणा दाटून आली. त्याला वाटले की त्यांना मदत करावी? हे सारे कुठून आले तर? सेवा आणि त्याग हे भारतीयांचे सर्वोच्च गुण आहेत. ते सुप्तावस्थेत असतील, कधी दिसणारही नाहीत. पण वेळ येताच भारतीयांच्या मनातील ही सज्जन ऊर्जा जागृत होते. ती जात-पात-धर्म-वंश पाहून जागृत होत नाही, तर माणुसकीच्या शाश्‍वत मूल्यांसाठी जागृत होते.’’ सुहासजींनी भारतीय संस्कृतीच्या आत्म्याचा सारांशच या घटनेने सर्वांसमोर मांडला.


यानंतर काही सेवाभावी संस्थांचा परिचय त्या त्या संस्थेच्या प्रतिनिधींनी केला. सर्वात आधी जनकल्याण सेवा समितीची माहिती सहदेव सोनावणे यांनी दिली. त्यानंतर दिपाली देवळे यांनी सेवा सहयोग संस्थेच्या कार्याची माहिती दिली. आजमितीला सर्वोत्कृष्ट कार्य करणार्‍या समतोल फाऊंडेशनची माहिती संस्थेच्या विजय जाधव यांनी दिली, तर जोशी यांनी अनाथ बालकांच्या आयुष्यात आशेचा सूर्य उगवणार्‍या वात्सल्य ट्रस्टची माहिती दिली. त्यानंतर उपस्थिातांचे सेवाकार्यानुसार गटशः चर्चासत्र घेण्यात आले.


दुपारचे सत्र हे विशेषच मानावे लागेल. संघाचे पश्‍चिम क्षेत्राचे प्रचारक विजयराव पुराणिक या सत्राचे मार्गदर्शक होते. आपल्या वेधक आणि तितक्याच संवेदनात्मक शब्दांनी त्यांनी श्रोत्यांचे मन जिंकले. त्यांनी सुरुवातीलाच सांगितले की, ‘‘सेवाभाव आणि सेवाकार्य करण्यासाठी संसाधनांची आवश्यकता असतेच असे नाही. पण, त्यासाठी प्रेरणा मात्र आवश्यक असते. आपण ज्यांची सेवा करतो ते लाभार्थी नसतात, तर ते सेविकजन असतात. तसेच सेवाकार्यासाठी एक बिंदूही पुरेसा असतो. एक समस्या घेऊन त्याचे निरंतर निराकरण करताना ती समस्या समूळ कशी दूर होईल याची दूरगामी योजना सेवा करणार्‍यांकडे असायलाच हवी.’’ हे सांगताना विजयरावांनी मेळघाटमध्ये वनवासी बांधवांसाठी संपूर्ण बांबू योजना राबविणार्‍या सुनील देशपांडे यांची कर्तृत्वगाथा सांगितली. तसेच आपण सेवाकार्य करतो आहोत पण लोकांनी आपल्यावर का विश्‍वास ठेवावा? त्यासाठी आपण समाजापुढे आपले वागणे तितकेच पारदर्शक ठेवायला हवे. समाज आपल्याला आपले म्हणून केव्हा स्वीकारतो हे सांगताना विजयरावांनी बारीपाडा येथील चैतरामांच्या आयुष्याची घटना सांगितली. चैतरामानी बारीपाड्याच्या विकासासाठी गाववाल्यांना काही नियम करून दिलेले असतात. त्यापैकी एक ओली झाडे तोडू नका. तोडल्यास दंड ठोठावला जाईल. एके दिवशी चैतरामांचे वडीलच ओले झाड तोडतात. गाववाल्यांना वाटते, चैतराम आपल्या वडिलांना दंड देणार नाहीत किंवा गाववाल्यांना विनंती करून तो टाळतील. पण चैतराम तसे करत नाहीत ते वडिलांनाही दंड ठोठावतात. तिथूनच ते गावाचं मन आणि विश्‍वास जिंकतात. ही घटना विजयरावांनी सांगितली आणि उपस्थित श्रोत्यांना समजले की, समाजात कसे जावे? कसे वागावे? या चर्चासत्रात श्रोत्यांच्या प्रश्‍नांना विजयरावांनी उत्तरेही दिली.


या सत्रात आभारप्रदर्शनानंतर पुन्हा सुहासराव हिरेमठ यांनी समारोपाचे मार्गदर्शन केले. सेवाकार्यात वाहून घेतलेल्या सेवाकर्मींसाठी ‘राष्ट्रोत्थान सेवा संगम’ अनुभव म्हणजे सेवाकार्याचा दीपस्तंभच होता.

राष्ट्रोत्थान सेवा संगम कार्यक्रमाची स्वागत समिती


गणेशकुमारजी, कुसुमताई गोपले, चंद्रशेखर वझे, डॉ. मिलिंद शेजवळ, डॉ. मिलिंद प्रधान, राजेश ठक्कर, विजय जाधव, नागनाथ सराफ, पोपटराव कदम, स्वामीनाथन, नितीन मणीयार, महादेव गोपाळे, रतन शारदा, सुधीर वोरा, चेतनसिंग सोलकी, महेश तेजवानी.



- योगिता साळवी
@@AUTHORINFO_V1@@