लाल दहशतवादाचा बाप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018   
Total Views |
 

 
लेनिन. ‘सोव्हिएत क्रांतीचा जनक’ अशी जशी त्याची ओळख आहे, तशी त्याची दुसरी ओळख ‘लाल दहशतवादाचा बाप’ (रेड टेरेरिझम) अशीही आहे. आजच्या आपल्या पिढीला इस्लामी देशात चालणार्‍या दहशतवादाची माहिती असते. पाकिस्तानच्या दहशतवादाची माहिती असते. परंतु, लेनिनने सुरू केलेल्या लाल दहशतवादापुढे हे सर्व दहशतवादी बालवाडीतील मुले ठरतील.
 
त्रिपुरात सत्तांतर झाले आणि भारतात कुठेही नसलेला, पण त्रिपुरात असलेला कॉम्रेड लेनिनचा पुतळा लोकांनी जमीनदोस्त केला. एक तर त्रिपुरात सत्तांतर झाले, ते भाजप विरोधकांना पचविणे अतिशय कठीण! त्यात जनतेने कॉम्रेड लेनिनचा पुतळा हटविला. विरोधकांना झालेल्या जखमेवर एक किलोभर मीठ टाकण्यासारखी ही कृती झाली. त्यामुळे ममतांपासून डी. राजा, सीताराम येचुरी खवळले. ममता बॅनर्जी काय बोलतील? हे त्यांनाच माहीत असते. त्या म्हणाल्या, ‘‘लेनिन नंतर गांधी, बोस, टागोर, विवेकानंद यांच्या प्रतिमासुद्धा हटविल्या जातील.’’ सीपीआयचे डी. राजा म्हणाले, ‘‘ही कृती लोकशाहीत बसत नाही. लोकशाहीत अनेक पक्ष असतात, त्यातील एखादा विजयी होतो, अन्यांचा पराभव होतो. याचा अर्थ हिंसक कृती करून लेनिनचा पुतळा हटविणे असा होत नाही. या कृत्याबद्दल योग्य ती कारवाई केली जावी.’’ सीताराम येचुरी यांनी या घटनेचे दोषारोप भाजप बरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही केले आहेत. त्रिपुरातील जनता या दोघांना योग्य उत्तर देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. येचुरींना हे माहीत नाही का की, त्यांच्या पक्षाची सत्ता हटवून भाजपची सत्ता त्रिपुराच्या जनतेनेच आणली आहे. ती आणखी वेगळे काय उत्तर देणार? तिने उत्तर आधीच दिले आहे. २४ तास बातम्या चालविणार्‍या बातम्यांनी सुद्धा या घटनेत आपले हात धुवून घेतलेले आहे. म्हणजे तेच तेच चेहरे बोलावून त्यांची रटाळ वक्तव्ये ऐकायला लावलेली आहेत.
 
मी असे गृहीत धरतो की, सर्वसामान्य वाचकांना लेनिन कोण होता? हे माहीत नसावे. रशियात १९१७ साली कम्युनिस्ट क्रांती झाली. या क्रांतीचे नेतृत्व करणर्‍याचे नाव होते, व्लादिमिर इल्याइच उल्यानाव. तो क्रांतिकारक होता. त्याने आपले नाव बदलले आणि लेनिन असे ठेवले. तेच नाव इतिहासात प्रसिद्ध झाले. त्याचा जन्म २२ एप्रिल १८७० साली झाला आणि मृत्यू २१ जानेवारी १९२४ ला झाला. कार्ल मार्क्सने भविष्यवाणी केली होती की, श्रमिक वर्ग क्रांती करेल, भांडवलशाही समाप्त होईल आणि जगात समाजवादी समाजरचना निर्माण होईल. या क्रांतीची सुरुवात प्रथम भांडवलशाही देशात होईल. (म्हणजे इंग्लंड आणि अमेरिका) परंतु तसे काही झाले नाही. क्रांती झाली रशियात, जो औद्योगिकदृष्ट्या अत्यंत मागास होता. पहिले महायुद्ध चालू होते आणि त्यात रशिया सामील झाला होता. तेव्हा लेनिन लंडनमध्ये भूमिगत होता. तेथून त्याला जर्मनीमार्गे रशियात पाठविण्यात आले. कारण, रशियात जनतेने उठाव केला होता. या उठावाचे नेतृत्व लेनिनने केले.
 
राज्यसत्ता म्हणजे काय? राज्यसत्तेवर पक्कड कशी बसवायची? लोकांवर शासन कसे करायचे? राज्यसत्तेचा धाक कसा निर्माण करायचा? अशा सगळ्या बाबतीत लेनिन अत्यंत तरबेज (मास्टर्र माईंड) होता. ‘दया’, ‘क्षमा’, ‘शांती’, ‘समझोता’ इत्यादी शब्द त्याच्या कोशात नव्हते. ‘‘मी काय सांगतो ते ऐका आणि नसेल ऐकायचे तर, मरायला तयार व्हा,’’ ही त्याची राज्य करण्याची पद्धती होती. चर्चा, वादविवाद, मतमतांतरे, सहमती, सहिष्णुता याविषयावर आपल्या देशात लेनिनभक्त खूप पाणी घालत असतात. परंतु, त्यांचा बाप यापैकी कशावरही विश्वास ठेवत नव्हता. त्याचा विश्वास एकाच गोष्टीवर होता, तो म्हणजे राज्य करायचे असेल तर राज्याची भयानक दहशत निर्माण करा. लोकांना टाचेखाली दाबून ठेवा. त्यांना फक्त आज्ञापालन करण्याचेच शिकवा. ते जर विचार करू लागले तर, त्यांना पकडा, एकतर ठार करा किंवा छळछावण्यांत पाठवून द्या. तो तरुण आहे, आजारी आहे, आईचा एकुलता एक मुलगा आहे, नुकतचं लग्न झाले आहे, पत्नी तरुण आहे, घरात लहान मुलगा आहे, या कशाचाही विचार करायचा नाही. तो कम्युनिस्ट पार्टीला विरोध करतो, म्हणजे तो आपला शत्रू आहे, त्याला जगण्याचा अधिकारच नाही.
 
असा होता लेनिन. ‘सोव्हिएत क्रांतीचा जनक’ अशी जशी त्याची ओळख आहे, तशी त्याची दुसरी ओळख ‘लाल दहशतवादाचा बाप’ (रेड टेरेरिझम) अशीही आहे. आजच्या आपल्या पिढीला इस्लामी देशात चालणार्‍या दहशतवादाची माहिती असते. पाकिस्तानच्या दहशतवादाची माहिती असते. परंतु, लेनिनने सुरू केलेल्या लाल दहशतवादापुढे हे सर्व दहशतवादी बालवाडीतील मुले ठरतील. दहशतवादी संघटना विचाराने प्रेरित होऊन स्वतंत्रपणे कामकरतात. राजवटीशीच त्यांचा संघर्ष असतो. बॉम्बस्फोट करणे, गोळीबार करणे, विमान अपहरण करणे असली कृत्ये ते करतात. परंतु, जेव्हा राज्य करणारा पक्षच दहशतवादी बनून राज्य करू लागतो, तेव्हा त्या दहशतवादाविरुद्ध कोणाला काहीही बोलता येत नाही, करता येत नाही. कायद्याचे संरक्षण नाही, न्यायालयाचे संरक्षण नाही. लेनिनने राज्यदहशतवादाचे असेच तत्त्वज्ञान निर्माण केले. १९१८ साली फानया कापलान या युवतीने लेनिनवर तो कारखान्यात आला असताना दोन गोळ्या झाडल्या. सुदैवाने लेनिन त्यात वाचला. फानयाला अटक झाली. ती सोशल डेमोक्रॅट या पक्षाची सदस्य होती आणि हा पक्ष कम्युनिस्टांच्या विरोधातील पक्ष होता. या पक्षाला संविधान सभेच्या निवडणुकीत बहुमत मिळाले होते. लेनिनने या खुनी हल्ल्याचा उपयोग करून पुढील दोन वर्षांत सगळा सोशल डेमोक्रॅट पक्ष संपवून टाकला. म्हणजे, त्या पक्षाचे सापडतील तेवढे कार्यकर्ते, समर्थक ठार केले किंवा छळछावण्यांत पाठवून दिले. लाल दहशतवाद निर्माण करण्यासाठी लेनिनने ‘चेका’ नावाची गुप्तहेर संघटना निर्माण केली. पहिल्या काही वर्षांत या संघटनेत शेकड्याने गुप्तचर होते. पुढील चार वर्षांत त्यांची संख्या दोन लाख झाली. लेनिनवर हल्ला झाला ऑक्टोबरमध्ये आणि एका महिन्यात या ‘चेका’ने दहा हजार नागरिकांना ठार केले. लेनिनच्या काळात ‘चेका’चे नाव घेतले की कापरे भरत असत. तिथूनच शब्दप्रयोग आला ‘मध्यरात्रीचा ठोका.’ म्हणजे मध्यरात्री तुमच्या दरवाज्यावर कोणी बेल वाजवली की यमराजाचे निमंत्रण आले, असा त्याचा अर्थ होई. इतिहासकार असे सांगतात की, लेनिनच्या काळात या ‘चेका’ने, दोन लाख माणसे ठार केली. त्यातल्या अनेकांचे रेकॉर्ड देखील नाहीत. अशा लेनिनचा पुतळा त्रिपुरात राज्य करणार्‍या कम्युनिस्टांनी मोठ्या दिमाखात रस्त्यावर उभा केला आणि तो का हटविला म्हणून कोलकात्यात ममता अश्रूपात करीत बसल्या आहेत.
 
लेनिन दहशतवादासंबंधी काय म्हणतो, या विषयी त्याचेच बोल आपण पाहूया. तो म्हणतो, ‘‘सत्तेचा उगम हा बळावरच असतो आणि त्या बळाला कोणत्याही कायद्याचे कसलेही बंधन नसते.’’ (म्हणजे ‘कायद्याचे राज्य’ ही संकल्पना लेनिनला मान्य नाही.) क्रांतीच्या पहिल्या वर्धापनदिनी ‘चेका’च्या कर्मचार्‍यांपुढे लेनिन म्हणाला, ‘‘सामान्य लोकांना मुक्त करण्यााचा एकमेव मार्ग म्हणजे जबरदस्तीने शोषकांना चिरडून टाकणे होय. हे काम‘चेका’ फारच चांगल्या प्रकारे करीत आहे.’’ फार मोठ्या प्रमाणात देहदंड देत राहिले पाहिजे, असा लेनिनचा आग्रह असे. पेट्रोग्रड येथे काही गडबड झाली आणि ती क्षमविण्यासाठी मोठ्या प्रमाणात देहदंडाचा प्रयोग करायला पाहिजे होता, तो केला गेला नाही. त्याबद्दल नाराजी व्यक्त करताना लेनिन म्हणतो, ‘‘कॉम्रेड झिनोविवेव तुम्ही मोठ्या प्रमाणात दहशतीचा अवलंब केला नाहीत, त्याऐवजी संयम बाळगलात, याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. असे झाले तर आपले विरोधक आपल्याला डरपोक समजतील.’’ आणखी एका आदेशात लेनिन म्हणतो, ‘‘तुम्ही जबरदस्त प्रयत्न करून आणि तयारी करून सार्वत्रिक दहशतीचा अवलंब करा. एकतर गोळ्या घाला किंवा शेकडोंच्या संख्येत वेश्यांना पकडून त्यांना हद्दपार करा. जलद कृती करा.... कुठलाही विरोध निर्दयपणे मोडून काढा.’’ आणखी एका आदेशात लेनिन म्हणतो, ‘‘कॉम्रेड! जमीनदारांनी तुमच्या पाच जिल्ह्यांत जो उठाव केला आहे, तो दयामाया न दाखविता मोडून काढा. एकतर त्यांना तुम्ही जाहीरपणे फासावर लटकवा, एकावेळेला कमीत कमी शंभर लोकांना लटकवा. त्यांची नावे जाहीर करा आणि त्यांचा सर्व शेतमाल जप्त करून टाका. मैलोनमैल लोकांना हे कळू द्या की, त्यांचे शोषण करणार्‍या जमीनदाराची अशी अवस्था होते.’’
 
दहशतीचे अनेक प्रकार ‘चेका’ने शोधून काढले. मुसलमानी राजवटीत कातडी सोलून काढण्याची शिक्षा आपण वाचली असेल, ते प्रयोग ‘चेका’ने विरोधकांच्या बाबतीत रशियन तुरुंगात केले. भुकेलेले उंदीर सोडणे, उकळत्या पाण्यात बुडवून मारणे, बर्फ पडत असलेल्या थंडीत विवस्त्र करून अंगावर पाणी ओतत राहाणे, असले एकापेक्षा एकेक अघोरी प्रकार लेनिनच्या काळात झालेले आहेत. पहिल्या महायुद्धात अनेक रशियन सैनिक पळून जात. १९१९ सालापर्यंत त्यांची संख्या २० लाखांपर्यंत झाली होती. त्यातील आठ लाख भगोडे सैनिकांना ‘चेका’ने पकडले. त्यातील अनेकांना ठार केले आणि बाकीच्यांना छळछावणीत पाठवून देण्यात आले. ‘कम्युनिझम’ म्हणजे ‘रेड टेरर’ आणि ‘रेड टेरर म्हणजे राज्य दहशतवाद’ आणि या सर्वाचा जनक आहे लेनिन. तो कम्युनिस्टांना देवता समान असतो. म्हणजे ज्याला ‘देवता’ मानले जाते, त्याचे अनुयायी कशाची पूजा करतात, हे आपल्या लक्षात यावे. अशा लेनिनचा पुतळा भारतासारख्या मानवतावादी देशात बसविणे हेच केवढे लाजिरवाणे आणि शरमेचे आहे. हे पाप धुवून निघाले हे फारच बरे झाले.
 
 
 
 
- रमेश पतंगे 
@@AUTHORINFO_V1@@