जनतेचे कल्याण हे माझे ध्येय, ईश्वर माझ्या पाठीशी
चेन्नई : जयललिता यांच्या निधननंतर तामिळनाडूमध्ये एक राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही राजकीय अस्थिरता दूर करण्यासाठी तामिळनाडूला एका योग्य आणि खऱ्या नेतृत्वाची गरज आहे' असे वक्तव्य प्रसिद्ध दाक्षिणात्य सिनेअभिनेते रजनीकांत यांनी केले आहे. चेन्नईमधील डॉ.एमजीआर एज्युकेशनअल अॅण्ड रीसर्च इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
'जयललिता यांच्या जाण्याने तामिळनाडूच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे, जी भरून काढण्याचे काम एम. करुणानिधीच करू शकतात. परंतु ते देखील आजारी असल्यामुळे सध्या राज्यामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. राज्यातील राजकर्ते आपली कर्तव्य योग्यपणे पार पाडत नाहीत. त्यामुळे आता जनतेच्या सेवेसाठी पुढे यावे लागत आहे. जनतेची सेवा हे माझे अंतिम ध्येय असून या कार्यात ईश्वर देखील माझ्यासोबत आहे' असे रजनीकांत यांनी यावेळी म्हटले.
याचबरोबर राजकीय प्रवास हा आपल्यासाठी अत्यंत खडतर असल्याचे देखील त्यांनी मान्य केले. राजकारणामध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, परंतु आपण या सर्व अडचणी पार करून जनतेचे कल्याण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आपल्या राजकारणातील प्रवेशामुळे आज अनेकांच्या कपाळावर आठ्या पडत आहेत, यावरूनच राज्यातील राजकारण्यांची मनोवृत्ती दिसून येत आहे, अशी टीका ही त्यांनी यावेळी आपल्या विरोधकांवर केली.