ध्येयपथ पर निरंतर चलता चल...

    06-Mar-2018
Total Views |
 

 
 
डेरेदार शिक्षण वटवृक्षाचे संस्थापक आहेत बाळासाहेब म्हात्रे. शिक्षणक्षेत्रात ठसा उमटविणार्‍या बाळासाहेबांचे जीवन म्हणजे कष्टाची गाथाच आहे.
 
‘‘उरण तालुक्यातील आवरे हे माझं गाव. त्यावेळी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू होते. माझे वडील महादेव आणि आई आनंदी दोघेही अशिक्षित. भातशेती हीच उपजीविका. अशिक्षित आणि अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही वडिलांचे शिक्षणावर अतिशय प्रेम. त्यामुळे दिवसभर शेतात राबराब राबून वडील शाळेच्या नूतनीकरणाच्या कामामध्येही पुढे असत. शाळेसाठी लाकडे आणण्यासाठी वडील आणि आणखी एकजण अलिबागला गेले. लाकडं घेऊन येताना त्यांचा ट्रक मोठ्या विहिरीला धडकला. बाबांसोबतचा माणूस जागीच ठार झाला. मी त्यावेळी पाचवीला असेन. मी आणि आई रडू लागलो. बाबा पण दुःखात होते, पण थोड्याच वेळात बाबा लाकडं घेऊन शाळेकडे गेले आणि कामाला लागले. बाबांना त्यासाठी काही मोबदला मिळणार नव्हता किंवा त्या खेडेगावात त्यांच्या कामाची कुणी तारीफही करणार नव्हते. माझ्या रक्तात शिक्षणाबद्दलचं प्रेम वडिलोपार्जित आहे,’’ बाळासाहेब म्हात्रे शांतपणे सांगत होते.
 
मुंबई आणि लगतच्या परिसरामध्ये शिशुविहार, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, संगीत विद्यालय, तंत्रनिकेतन शाळा अशा एकूण ७५ शिक्षणसंस्था आणि या शिक्षणसंस्थांमधून लाभ घेणारे २३ हजार विद्यार्थी आणि या शिक्षणसंस्थेत काम करणारे ६५० कर्मचारी.. बापरे केवढा मोठा पसारा.. या डेरेदार शिक्षण वटवृक्षाचे संस्थापक आहेत बाळासाहेब म्हात्रे. शिक्षणक्षेत्रात ठसा उमटविणार्‍या बाळासाहेबांचे जीवन म्हणजे कष्टाची गाथाच आहे. शिक्षणासाठी बाळासाहेब मुंबईला काकांकडे राहत. त्यावेळी त्यांचा दिनक्रम कसा होता? पहाटे पाच वाजता उठून सगळे आटपून विक्रोळीच्या शाळेत शिक्षक म्हणून सकाळी ७ वाजता जात. ७ ते १२.३० शिक्षकाची नोकरी पुढे सोमय्या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दुपारी १ ते ५ जात. तिथून सुटल्यावर गिरगावला रात्रशाळेत शिक्षक म्हणून संध्याकाळी ६ ते १० जात. तिथून मग रात्री भांडूपला घरी जात. कित्येक वर्षांचा हा दिनक्रम. लग्न झाले. सहचारिणी पुष्पलता याही शिक्षिका. त्यांनी बाळासाहेबांना सुचविले की बालवाडी सुरू करूया. कमालीची धावपळ करून छोटीशी बालवाडी सुरू झाली. बालवाडीमधल्या मुलांसाठी मग पुढे प्राथमिक शाळा, नंतर माध्यमिक शाळा, महाविद्यालय सुरू झाले. या संपूर्ण प्रवासात बाळासाहेब कधीच थांबले नाहीत.
 
अथक परिश्रमाची ही ऊर्जा कोणती? विचारल्यावर बाळासाहेब म्हणाले, ’’गावी माझ्या घरापासून शाळा पाच किलोमीटर दूर होती. अनवाणी पायाने दररोज शाळेत पाच किलोमीटर जाणे-येणे हा माझा नित्यक्रम. गरिबी, ग्रामीण पार्श्वभूमी या सगळ्या वातावरणातून विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट मी अनुभवली होती. माझ्यासारख्या अगणित मुलांना याच प्रसंगातून जावे लागत असेल, ही जाणीव मला त्यावेळीही होती आणि आताही आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांसाठी विनासायास शिक्षण उपलब्ध असावी, अशी माझी आंतरिक इच्छा. त्यातच माझे शिक्षण रयत शिक्षणसंस्थेत झाले. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कार्यांचे आणि चरित्राचा मनावर दाट परिणाम झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील या थोर माणसांनी निःस्वार्थीपणे आभाळाएवढे कामसमाजासाठी केले. आपण जमेल तितके तरी करूया हा विचार नेहमी मला हिंमत देतो. त्यामुळे समस्या, त्यातून मार्ग काढणे हे माझे जीवनविषय आहेत. हे कामनाही तर माझे कर्तव्यच आहे.’’ बाळासाहेब स्मितहास्याने बोलत होते, त्यांच्या बोलण्यातून जीवनाचा संघर्ष कुठेही कटूतेने व्यक्त होत नव्हता, तर आयुष्यभर केलेल्या संघर्षात न थकता ध्येयाची वाट शोधली, याचे समाधान होते.
 
 
 
 
- योगिता साळवी 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.