पूर्वांचलाचे आसमंत रंगले केसरियाने !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018   
Total Views |
 

 
सध्या हाताच्या बोटावर मोजता येतील अशा राज्यात विरोधकांची सरकारे आहेत. बाकी सर्वत्र केसरियाची उधळण झाली आहे. हे देशास वैभवाप्रत नेण्याच्या मार्गातील सुचिन्हच मानायला हवे!
 
त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे तेथे लाल रंगाचा अस्त झाला असून केसरिया रंगाचा उदय झाला आहे. होळीच्या निमित्ताने सर्वत्र विविध रंगांची उधळण होत असताना त्या सर्व रंगांमधून केसरियाने पूर्वांचलाचे आसमंत व्यापून टाकले आहे. त्रिपुरामध्ये गेली २५ वर्षे अस्तित्वात असलेल्या साम्यवादी राजवटीस मतदारांनी झुगारून दिले असून भारतीय जनता पक्षास निर्विवाद कौल दिला आहे. त्रिपुरामधील या निकालाच्या निमित्ताने डाव्या राजवटीच्या काळात घडलेल्या अनेक घटनांपैकी एका घटनेकडे लक्ष वेधल्यास ते अप्रस्तुत ठरणार नाही. त्रिपुरामध्ये मार्क्सवादी राजवटीच्या काळात २००१ मध्ये रा. स्व. संघाच्या चार प्रचारकांचे अपहरण करण्यात आले होते आणि नंतर शेजारच्या म्यानमारमध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती. मातृभूमीला परमवैभवाप्रत नेण्याचे कार्य करण्यासाठी आपल्या घरादारावर पाणी सोडून ते प्रचारक त्रिपुरामध्ये कार्यरत होते. त्यांचे तेच कार्य डाव्या राजवटीला जाचत होते. डाव्या राजवटीच्या काळात संघ परिवारातील अनेकांच्या हत्या करण्यात आल्या. डाव्यांची राजवट असलेल्या केरळ राज्यात तर अशा घटना सातत्याने घडत आहेत, तर पूर्वांचलातील भाजपचा विजय साजरा करताना तेथे कार्य करताना हौतात्म्य पत्करलेल्या अशा सर्व कार्यकर्त्यांचे स्मरण पंतप्रधानांना होणे साहजिकच होते. पूर्वांचलातील विपरीत परिस्थितीत तेथे गेली अनेक वर्षे घट्ट पाय रोवून कार्य करीत असलेल्या कार्यकर्त्यांमुळेच हे परिवर्तन शक्य झाले, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. पूर्वांचलातील निकालाचे वृत्त देताना एका प्रसिद्ध इंग्रजी राष्ट्रीय दैनिकाने, ‘ईशान्य भारत : उगवत्या संघाचा प्रदेश’ अशा आशयाचे शीर्षक देऊन पूर्वांचलात भाजपची, संघ परिवाराची ताकद वाढली असल्याचे उशिरा का होईना मान्य केले. एकेकाळी संघ परिवाराच्या संदर्भातील चार ओळीच्या बातम्या देण्यास का-कू करणारी माध्यमे अलीकडील काही काळात रकानेच्या रकाने भरून त्या कामाची दखल घेऊ लागली आहेत.
 
त्रिपुरातील भाजपच्या विजयाने मार्क्सवादी विचारांच्या मंडळींचे तर डोळे पांढरे झाले. आपणास त्रिपुरा आंदण दिल्याच्या थाटातच तेथील मुख्यमंत्री माणिक सरकार आणि त्यांची राजवट वावरत होती. प. बंगालमधून मार्क्सवाद्यांचे उच्चाटन झाल्यानंतर आता त्रिपुरामध्येही मतदारांनी त्यांना अस्मान दाखविले आहे. आता फक्त केरळमध्ये डाव्यांची राजवट उरली आहे. त्या राजवटीचाही अपराधांचा घडा ओसंडून वाहू लागला आहे. त्रिपुरा आणि अन्य दोन राज्यांतील निकालाचा तपशील सर्वत्र आला असला तरी त्याचा येथे उल्लेख आवश्यक असल्याने केला आहे. त्रिपुरामध्ये या निवडणुकीत ६० पैकी ५९ जागांसाठी मतदान झाले. त्यात भारतीय जनता पक्ष ‘इंडीजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा’ (आयपीएफटी) या युतीस ४३ जागा मिळाल्या, तर डाव्या आघाडीस अवघ्या १६ जागा मिळाल्या. काँग्रेस पक्षास शून्य आणि अन्य शून्य असे निकाल लागले. या निवडणुकीत भाजप युतीला ५०.५ टक्के, डाव्या आघाडीला ४४.९ टक्के, काँग्रेसला १.८ टक्के आणि अन्य २.८ टक्के अशी मते मिळाली. २०१३ साली झालेल्या निवडणुकीत डाव्या आघाडीस ५० जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला १० जागा मिळाल्या होत्या. त्या निवडणुकीत भाजपच्या मताची टक्केवारी होती फक्त १.५ टक्के. मागील निवडणुकीची ही आकडेवारी लक्षात घेता तेथे भाजपने जे यश मिळविले आहे ते नक्कीच थक्क करणारे आहे. पक्षाध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महासचिव राममाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर, हिमंत बिश्व सर्मा, प्रदेशाध्यक्ष बिप्लबकुमार देव यांच्यासारख्या नेत्यांनी व पक्ष कार्यकर्त्यांनी गेल्या काही वर्षांत जे अपार कष्ट केले त्यामुळेच हा बदल घडला. कुशल संघटक सुनील देवधर यांनी राज्यातील मतदारांना भाजपकडे आकृष्ट करण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबविले आदी माहिती वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवरून सर्वत्र ज्ञात झाली आहेच. ‘आयपीएफटी’समवेत युती करून भाजपने डाव्या आघाडीस जोरदार हादरा दिला. आदिवासी जागा आपल्याच आहेत, असे गृहीत धरून चालत असलेल्या डाव्या आघाडीला भाजपने धक्का दिला. ‘आयपीएफटी’ने नऊ जागा लढविल्या. त्यापैकी आठ जागा मिळाल्या. शहरी भागात भाजपला २३ आणि ग्रामीण भागात १२ जागा मिळाल्या. ‘आयपीएफटी’ला शहरी भागात दोन आणि ग्रामीण भागात सहा जागा मिळाल्या, तर डाव्या आघाडीला शहरी भागात चार आणि ग्रामीण भागात १२ जागा मिळाल्या. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नामोनिशाण या निवडणुकीत उरले नाही. देशाच्या अन्य अनेक भागांप्रमाणे त्रिपुरा ‘काँग्रेसमुक्त’ झाल्याचे या निमित्ताने पाहावयास मिळाले. भाजपने केवळ ‘चलो पलटाई’ (चला, बदल घडवूया) अशी घोषणाच दिली नाही, तर प्रत्यक्षात तसे करून दाखविले! डाव्या आघाडीच्या राज्यात सर्व काही सुरळीत नव्हते. दहशत, धाकदपटशा याच्या जोरावर जनतेचा आवाज दाबून टाकण्यात येत होता. सद्दी होती ती फक्त डाव्या कार्यकर्त्यांची. आपली सोय लावून घेत त्यांनी जनतेला वार्‍यावर सोडले होते. त्याचा जोरदार फटका डाव्या राजवटीस बसला.
 
त्रिपुरामध्ये भाजपने बदल घडवून आणला. पूर्वांचलातील ज्या अन्य दोन राज्यात निवडणुका झाल्या तेथेही भाजपने चांगली कामगिरी बजाविली आहे. ख्रिस्ती मतदारांनी भाजपला मतदान करू नये, असा जाहीर फतवा चर्चने काढला होता. पण, त्यास धूप न घालता मतदारांनी भाजपला मतदान केले. नागालँड आणि मेघालयात भाजपचा अंतर्भाव असलेली सरकारे सत्तेवर येऊ घातली आहेत. नागलँड आणि मेघालयात भाजपला मतदार नाकारतील हा काही राजकीय विश्लेषकांचा होरा मतदारांनी खोटा ठरविला आहे. नागालँडमध्ये भाजप एनडीपीपीला मिळून २८, एनपीएफला २७, अन्य ४ आणि काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या तर मेघालयात काँग्रेसला २१, एनपीपीला १९, भाजपला २ आणि अन्य १७ अशा जागा मिळाल्या असल्या तरी तेथे आपले सरकार स्थापण्यास काँग्रेसला अपयश आले आहे. मेघालयात काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्या तरी तो पक्ष सत्ता मिळवू शकलेला नाही. एकूण हे निकाल पाहता पूर्वांचलातील नागालँड व मेघालयात भाजपचा जनाधार वाढत असल्याचे दिसत आहे.
 
पूर्वांचलातील या निवडणुकांचे निकाल बाहेर आल्यानंतर भाजप विरोधकांची मळमळ बाहेर पडू लागली आहे. काहींनी मतदानयंत्रांमध्ये घोटाळा झाला असल्याचे नेहमीचे तुणतुणे वाजविण्यास सुरुवात केली आहे, तर या निकालाचा देशात आगामी काळात होणार्‍या विधानसभा, लोकसभा निवडणुकांवर काही परिणाम होणार नाही, असे काहींना वाटू लागले आहे. गुजरातमध्ये भाजपला कमी जागा मिळाल्यानंतर भाजपची घसरण सुरू झाली, असे म्हणणारी ही मंडळी भाजपचे कौतुक करण्यात हात का आखडता घेतात? असे वागणार्‍या बुद्धिवंतांना ढोंगी, लबाडच म्हणायला हवे! सध्या हाताच्या बोटावर मोजता येतील अशा राज्यात विरोधकांची सरकारे आहेत. बाकी सर्वत्र केसरियाची उधळण झाली आहे. हे देशास वैभवाप्रत नेण्याच्या मार्गातील सुचिन्हच मानायला हवे!
 
 

- दत्ता पंचवाघ  
 
@@AUTHORINFO_V1@@