अनु’वादा’चं अधिवेशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 

 
महाराष्ट्राच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे बरेचसे दिवस गोंधळात आणि एकमेकांच्या समजुती काढण्यात निघून गेले. ‘हल्लाबोल’ आणि अन्य मोर्चांनी त्यावेळी अधिवेशनाचा अगदी बट्‌ट्याबोळ केला. अखेरच्या दिवसात भराभर कामं आटपण्यात आली आणि अधिवेशनाची सांगता झाली. पाहता पाहता नव्या वर्षाचा फेब्रुवारी महिना उजाडला आणि राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वेध लागू लागले. मोठा गाजावाजा करत अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात तर झाली. परंतु, सुरूवातीपासूनच या अधिवेशनाला एक वेगळा रंग येण्याची चाहूल लागली होती. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनीही आपली परंपरा राखत चहापानावर बहिष्काराची घोषणा केली, तर सत्ताधार्‍यांनीही विरोधकांना ‘वैफल्यग्रस्त’ म्हणत त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
 
 
अधिवेशन काळातच दि. २७ फेब्रुवारी म्हणजेच मराठी राजभाषा दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सर्वत्र मराठी भाषा अभिमान गीत सादर करणार असल्याचा अनोखा आणि स्तुत्य उपक्रम जाहीर केला. एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी काही नेते केंद्राकडे साकडे घालत आहेत, तर दुसरीकडे मराठी भाषा दिनाच्या आदल्या दिवशी विरोधकांना आयतं कोलीत मिळालं, ते म्हणजे राज्यपालांचं अभिभाषण. राज्यपाल अमराठी असल्यामुळे त्यांना मराठीची अडचण असणं स्वाभाविकच आहे. त्यातचं राज्यपालांचं अभिभाषण मराठीत अनुवादित करून ऐकवण्याची परंपरा आपल्याकडे आहे. मात्र, त्या दिवशी सुरक्षेच्या कारणास्तव अनुवादक वेळेवर त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत आणि पुरता गोंधळ उडाला. सुरूवातीची काही मिनिटं राज्यपालांनी मराठीतून भाषण केले आणि त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा इंग्रजीकडे वळवला. मात्र, त्याचवेळी मराठीचे अचानक उफाळून आलेले विरोधकांचे प्रेम जागं झालं आणि त्यांच्या कानावर ना-ना तर्‍हेच्या भाषा पडू लागल्या. काहींच्या कानावर हेडफोन्स नसतानाही त्यांना अचानक गुजरातीचा साक्षात्कार झाला. विरोधकांचा वाढलेला गोंधळ लक्षात घेता, मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी अनुवादक कक्षाकडे धाव घेतली आणि मोर्चा एकहाती सांभाळला. विरोधकांनी राज्यपालांसमोर वेलमध्ये उतरून घोषणाबाजी करत अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. एक एक करून विरोधक बाहेर पडत असतानादेखील तावडे यांनी भाषांतरकाराची भूमिका पार पडत मराठीची लाज राखली आणि आपण खर्‍या अर्थाने मराठी भाषा मंत्री असल्याचे सिद्ध केले. क्रियापदाचं मोठेपणं हे त्याच्या कर्त्याने केलेले कर्म हे किती मोठे आहे, यावर अवलंबून असतं असं म्हणातात. तेच मोठेपण याठिकाणी तावडे यांनी सर्वांना दाखवून दिलं. खरंतर त्यांच्यासारख्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी जाणं अपेक्षित नसतानाही एकंदरीत परिस्थिती पाहता त्यांनी घेतलेला निर्णय हा नक्कीच स्वागतार्ह होता.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी एखादी घटना घडली असावी. मात्र, कधी मराठीचा ‘म’सुद्धा न काढलेले काही मंत्री त्या दिवशी अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून त्याला विरोध करत होते. मराठीच्या केवळ दिखाव्याचं प्रेम असलेल्या या नेत्यांबद्दल विचार करताना पु. ल. देशपांडे यांचं वाक्य आवर्जुन आठवतं- ‘‘आफ्टर ऑल मराठी कम्पलसरी पाहिजे. कारण, आपल्या मदरटंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात, तितकं फॉरेन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातं. पण, इंग्लिश मस्ट बी ऑप्शनल.’’ असो... पण, एरवी ऊठसूठ मराठीचा कैवार घेणार्‍या शिवसेनेच्या वाघाची डरकाळी मात्र यंदा कुणालाही ऐकू आली नाही. मराठीसाठी सदैव आग्रही असलेले अनेक दिग्गज नेतेही यावेळी मूग गिळून गप्प बसले होते. त्यामुळे राजकारणी मंडळींचं मराठीप्रेम हा केवळ दिखावा आहे की काय, हाच प्रश्न या निमित्ताने पडला. त्यातच मराठी राजभाषा दिनी विधानभवनात आयोजित कार्यक्रमात आणखी एक गोंधळ उडाला. मराठी अभिमान गीत गाताना लाऊडस्पीकरचा आवाज गायब झाला आणि ‘अभिमान’ पुन्हा एकदा मुका झाला. त्यातच अभिमान गीताचं एक कडवं सत्ताधार्‍यांनी गाळल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि या मुद्द्यावरुन मग सरकारची कोंडी करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु झाला. मात्र, या सगळ्या गदारोळात शिवसेनेतील मराठीच्या कैवार्‍यांनी केवळ बघ्याची भूमिका कशी घेतली, हा यक्षपश्नच म्हणावा लागेल. पहिल्याच दिवसापासून मराठी भाषेचा अवमान झाल्याचा कांगावा करत सरकार विरोधात रान पेटवलेल्या विरोधकांच्या विरोधाकडे बघत बसण्याची प्रेक्षकी भूमिका शिवसेनेने अगदी मनापासून साकारली. सुनील तटकरे यांनीदेखील हा मुद्दा उपस्थित करत ‘‘शिवसेना या प्रकरणी गप्प का,’’ असा सवालही केला. मात्र, त्यावरही उत्तर देण्याची गरज मराठीच्या या मावळ्यांना जाणवली नाही.
 
सुरूवातीपासूनच या ना त्या कारणांनी गाजलेलं हे अधिवेशन पुन्हा गाजलं ते म्हणजे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणार्‍या ऑडिओ क्लिपवरून. एका वृत्तवाहिनीने शहानिशा न करता एक महागौप्यस्फोट केला आणि विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली. सत्ताधार्‍यांनाही या निमित्ताने विरोधकांना शांत करण्याचा मुद्दा मिळाला. विधानपरिषदेत सत्ताधार्‍यांनी विरोधकांची याच मुद्द्यावर कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन ते अडीच तास यावर चर्चा झाली, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सत्ताधार्‍यांकडून होणारे आरोप हे वैयक्तिक पातळ्यांवर जात असल्याचा दावा करत धनजंय मुंडे यांनी ‘‘सुरूवात तुम्ही केली, शेवट मी करणार,’’ असं म्हणत आक्रमक पवित्रा घेत रोज आता आपण एका मंत्र्यांची ऑडिओ क्लिप जाहीर करु, असं म्हणत पुन्हा सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे यांचे स्वीय सहाय्यक प्रदीप कुलकर्णी यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप सभागृहापुढे सादर केली आणि रोज अशीच एक क्लिप सादर करणार असल्याचा त्यांनी सरकारला इशारा दिला. विधिमंडळात दलाली चालते असे वाहिनीने केलेले आरोप नक्कीच निंदनीय होते. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचे आरोप विधिमंडळावर करण्यात आले असल्याचे सांगत हे खरंच निंदनीय असल्याचे मत सभापतींनी व्यक्त केले. संबंधित वृत्तवाहिनीवर हक्कभंग प्रस्तावदेखील दाखल करण्यात आला. महिन्याभरात या घटनेचा अहवालदेखील सादर होईल. त्यामुळे मराठी भाषा असो, विरोधीपक्ष नेते असो किंवा परिचारकांचं प्रकरण असो, या ना त्या कारणाने गाजलेलं हे अधिवेशन पुढील काळात किती गाजेल आणि सामान्यांचे किती प्रश्न मार्गी लागतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
 
 
 
 
- जयदीप दाभोळकर 
 
@@AUTHORINFO_V1@@