विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ६०

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2018   
Total Views |





अवंती : मेधाकाकु तुझ्या आखणीप्रमाणे, आपल्या म्हणींच्या अभ्यासाचा आजचा हा अखेरचा दिवस आहे. बरोबर ना.. आता शाळांच्या वार्षिक परीक्षा संपून उन्हाळी सुट्टी सुरु होईल. मलासुद्धा पुढच्या वर्षीच्या शाळेच्या अभ्यासाची तयारी करायची आहे. हे सगळे असले तरीही आज मनात घालमेल होते आहे. काही तरी संपल्याची भावना काही दिवस रेंगाळणार आहे आता. पण आता मी उत्सुक आहे आजच्या शेवटच्या धड्यासाठी.

मेधाकाकू : अवंती... मूळ संस्कृत भाषेतील न्यायशास्त्र आणि त्यातील न्यायसूत्रे आणि आपल्या या तर्कसंगत लोकश्रुती यांचे संदर्भ आपण मागच्या अभ्यासात पहिले. अवंती, आता लक्षात घे की, कुठल्याही गोष्टीचे-संकल्पनेचे लघुरूप अर्थात संक्षिप्तरूप व्यक्त करण्यासाठी या न्यायसूत्राचा उपयोग केला गेला. साहित्य, व्याकरण, गणित, विज्ञान अशा सर्व शास्त्रांच्या अभ्यासामधे या लघुरूप सूत्रांचा वापर संस्कृत भाषेच्या माध्यमातून काही सहस्त्र वर्षांपासून आपल्या प्राचीन पूर्वजांनी केला.

अशी सूत्र, धाग्याप्रमाणे काम करून विविध ज्ञानशाखांना एकत्र जोडण्याचे काम करतात. अशा न्यायसूत्राने जोडलेल्या संधींमुळे (संधी = दोन ज्ञानशाखांना जोडणारी संकल्पना) योग्य अर्थासह, सम्यक म्हणजे उत्तमरीतीने, परिपूर्ण विचार निर्माण होतात. असे सम्यक - उत्तम विचार, आपण आपल्या लोकश्रुतींच्या अभ्यासात अनुभवले. सूत्र अर्थात न्यायसूत्र वापरलेल्या साहित्यात अगदी लघुरूप म्हणजे छोटी छोटी तर्कसंगत वाक्ये असतात. प्रत्यक्षात दोन विरोधी विचार मांडणारी अथवा साम्यस्थळे दाखवणारी दोन वाक्ये अशा सूत्रांमध्ये संधीस्वरूपात एकमेकांना जोडलेली असतात. यामधे तांत्रिक आणि अन्य संदर्भातील शब्दांचा योग्य वापर केलेला असे.

अवंती आता या संक्षिप्त अथवा लघुरूप लोकश्रुतींचे मुख्य प्रयोजन लक्षात घे. प्राचीन भारतातील गुरुकुल शिक्षण पद्धतीमधे, अनेक वर्षांच्या ज्ञानसाधनेतून निर्माण झालेले सर्वच ग्रंथ कंठस्थ केले जात असत म्हणजेच पाठ केले जात असत. अशा संशोधनाने सिद्ध झालेल्या ग्रंथात लघुरूप संधी आणि संज्ञा यांचा वापर केला गेला. अर्थातच अशी संक्षिप्त रूपे आणि त्यांचे मथितार्थ, सूक्ष्मार्थ आणि गुढार्थ समजायला बऱ्याचवेळा कठीण असत. म्हणूनच अशा सूत्रांचे सविस्तर अर्थ सांगणारी भाष्य लिहिण्याची पद्धत त्या काळात रूढ होती. सूत्रांच्या अशा व्याख्या स्पष्ट करणाऱ्या, विस्तृत अर्थ सांगणाऱ्या किंवा अर्थविस्तार लिहिण्याच्या पाच पद्धती प्रचलित होत्या. वृत्ती, भाष्य, वार्तिका, टीका आणि टिप्पणी अशा त्या पाच पद्धती. आपल्या अभ्यासातील सर्वच लोकश्रुती आणि लोकोक्ती, वृत्ती या पद्धतीच्या आहेत कारण त्या खूपच संक्षिप्त स्वरूपाच्या आणि अनेकदा समजायला कठीण आहेत. आता ही म्हण किती छान काही सांगते आहे बघुया...!

आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ

मेधाकाकू : हे आहे एका संगीतप्रेमी कुटुंबाचे वर्णन. भेरी म्हणजे सनईसारखेच लांब असे फुंकून वाजवण्याचे स्वरवाद्य, तर पडघम म्हणजे नौबत किंवा छोट्या नगाऱ्यासारखे चार्मवाद्य आणि संबळ म्हणजे धूम आणि टिमकी या नावाची लहान मोठ्या आकाराची दोन एकत्र बांधलेली गळ्यात अडकवून वाजवायची चर्मवाद्य. ही तीनही वाद्य महाराष्ट्राची लोकवाद्यच आहेत आणि ही तिन्ही मिळून मंगलस्वरांची निर्मिती करतात. या सहा – सात शब्दांत या कुटुंबाचे घट्ट बांधणीचे, सूर - ताल जमलेले असे रसिक कुटुंब आहे आणि त्या वाद्यांच्या गुणवत्तेसह त्यांच्या सूत्रात एका धाग्याने ते या लोकश्रुतीत विणले गेले आहे. त्या वाद्यांचा उपमा म्हणून केलेला चपखल उपयोग फार रंजक आहे.
अवंती : मेधाकाकू... ही फारच छान म्हण सांगितलीस. मग इतके मोठे ज्ञानभांडार एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत कसे पोहोचले असावे.

मेधाकाकू : मी आधी उल्लेख केला त्याप्रमाणे हे ज्ञानसाधनेचे ग्रंथ गुरुकुल शिक्षणपद्धतीने पिढ्यान पिढ्या शतकानुशतके, श्रुती स्मृती या योजनेतून पुढे जात राहिले. अशाच एका ग्रंथात वायु पुराणात या ‘सूत्र’ संकल्पनेची व्याख्या सांगितली गेली आहे. वायु पुराण या ग्रंथाच्या निर्मितीचा कालावधी महाभारतानंतर दोनशे वर्षे असा मानला जातो. या वायु पुराणाचे वैशिष्ट्य असे की, यातील पूर्ण अभ्यास भावनिक मांडणीपेक्षा, तर्कसंगत आणि विवेक दृष्टीने प्रभावित आहे.

अल्पाक्षरं असंदिग्धं सारवत्‌ विश्वतोमुखम्‌।
अस्तोभं अनवद्यं च सूत्रं सूत्र विदो विदुः॥

मेधाकाकू : याचा भावार्थ असा, कमीतकमी अक्षरे म्हणजेच कमीतकमी शब्दांचा वापर, संदेहरहित म्हणजे निश्चित मांडणी, संक्षिप्त म्हणजे थोडक्यात अर्थविवेचन, वैश्विक स्विकृती असलेला निरंतर प्रकृतीचा म्हणजे कालातीत संदर्भ - टिकाऊ आणि त्रुटीहीन म्हणजेच परिपूर्ण, अशी ही सूत्रे. अशा सूत्रांना जाणणाऱ्याला सूत्रविद असे संबोधित केले जाते. अशाच सूत्रविद म्हणजे सूत्र विद्वानांनी गेली अनेक शतके अशा सूत्रात बांधलेल्या लोकश्रुती निर्माण केल्या आणि सुदैवाने आपण त्याचा अभ्यास करू शकलो.

अवंती : मेधाकाकु असे किती ग्रंथ असतील काही सांगशील याबद्दल ?


मेधाकाकू : अवंती ’अगणित ग्रंथ’ इतकेच वर्णन करता येईल तुझ्या प्रश्नाचे. आज आपल्या सुदैवाने असंख्य ग्रंथालयांमध्ये आणि आंतरजाल अर्थात इंटरनेटवर अशी किमान २५ लाख पुस्तके आपल्या वाचनासाठी उपलब्ध आहेत. तर अवंती, आता आपण आपला अभ्यास संपन्न करूया तुला तुझ्या परीक्षेसाठी अनेक शुभेच्छा. शुभास्ते पन्थान: ....!!!

- अरुण फडके
@@AUTHORINFO_V1@@