शोषित-वंचितांचे कैवारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
 
आपल्याकडे शिक्षण हा सर्वात दुर्लक्षित विषय होता. एखाद्या नकोशा असलेल्या, पण राजकीय गणितांमुळे मंत्रिमंडळात घ्याव्याच लागलेल्या इसमाला शिक्षण खातं सोपवायचं असा केंद्रात आणि राज्यात प्रघात होता. त्यातून शिक्षणातले इतिहास, भूगोल वगैरे विषय म्हणजे तर दुर्लक्षाची परिसीमा! करायचे काय ते शिकून? गणित, सायन्स आणि इंग्रजी एवढेच विषय असावेत. कारण, तेच पुढे करिअरची वाट ठरवतात, असे विद्यार्थी, पालक व अनेक शिक्षकांचेही मत असे. म्हणजे शिक्षणाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी ही नितळ पोटार्थी असते. ज्ञान मिळवण्यासाठी, व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, उत्तम व सुजाण मनुष्य बनण्यासाठी शिक्षण घ्यायचं असतं, हे त्याच्या गावीही नसतं.
 
गेल्या काही वर्षांत शिक्षणाला आर्थिकदृष्ट्या चांगले दिवस आले आहेत. म्हणजे शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुधारला असं नव्हे; उलट तो आणखी पोटार्थी व धंदेवाईक झाला आहे, ट्यूशन क्लासेस, शाळा, कॉलेज, पॉलिटेक्निक काढून लक्षावधी रुपये जमा करता येऊ शकतात, हे लक्षात आल्यामुळे या सगळ्यांचा जोरदार धंदा सुरू झाला आहे. पूर्वी गॅस एजन्सीज नि दारूची दुकानं वाटली जायची, तशी आता पॉलिटेक्निक वाटली जातात. इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाटल्या जातात. इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस वाटली जातात? सगळं शिक्षण पोटार्थी असल्यामुळे तिथे इतिहास-भूगोल वगैरे फालतू विषय कुणाच्या खिजगणतीतही नसतात, आपल्या विकसनशील वगैरे समजल्या जाणार्‍या देशाच्या शिक्षणक्षेत्राचे चित्र आहे.
 
विकसित म्हणजे पाश्र्चिमात्य देशांमध्ये अशी स्थिती नाही. तिचे इतिहासाला योग्य महत्त्व दिले जाते. तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी असा, नाही तर तंत्रज्ञानाचे, तुम्ही ज्या देशाचे जबाबदार नागरिक बनणार आहात, त्या देशाचा किमान इतिहास तुम्हाला ठाऊक असावाच लागतो आणि ठाऊक असणं फक्त परीक्षा पास करण्यापुरतच नसून, त्या इतिहास शिक्षणातून विद्यार्थ्याला आपल्या देशाबद्दल अभिमान निर्माण होईल, त्याच्या मनात राष्ट्रीय अस्मिता निर्माण होईल, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. आपल्या देशातल्या किंवा राज्यातल्या सर्वोच्च नेत्यांपैकी कुणी कधी एखाद्या इतिहास शिक्षकांच्या प्राध्यापकाच्या परिषदेला हजेरी लावलीय, असं ऐकलंय तुम्ही? छे! असल्या भंकस गोष्टींसाठी वेळ आहेच कुणाला?
 
नुकतीच रशियात इतिहास शिक्षकांची एक परिषद झाली. तिला रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हजर होते. ‘‘इतिहासाच्या मास्तरड्यांची मीटिंग? आणि तिला राष्ट्राध्यक्षांची हजेरी? सालं येडंच दिसतंय हे पुतीन!’’ अशी आपल्याकडच्या राजकारण्यांची प्रतिक्रिया असू शकेल. पुतीन यांनी इतिहास शिक्षकांच्या परिषदेला हजर राहून जे भाषण केलं, त्यात गर्भित धमकी होती. म्हणजे पुतीन राजकीय हेतूनेच तिथे आले होते. पण, शालेय इतिहास शिक्षकांसमोर बोलायला राष्ट्राध्यक्षांना यावं लागलं, यातून शिक्षकांचं सामर्थ्य लक्षात यावं, पुतीन यांनी ते सामर्थ्य मान्यच केलं. फक्त शिक्षकांनी ते आपल्या म्हणजे सरकारच्या बाजूने वापरावे, असे त्यांनी सांगितले.
 
१९८५ साली मिखाईल गोर्बाचेव्ह रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी ’ग्लासनोस्त’ आणि ’पेरेस्त्रोईका’ ही नवीन राजकीय धोरणं सुरू केली. त्यामुळे अभिव्यक्तीवर लावण्यात आलेला गळफास निघाला, प्रचारमाध्यमे मुक्तपणे लिहू लागली, पाठोपाठ सरकारी दप्तरखाने खुले झाले. ७० वर्षे साम्यवादी सरकारच्या पोलादी पडद्याआड दडून राहिलेल्या असंख्य गोष्टी जगासमोर येऊ लागल्या. यातल्या सर्वात भयंकर गोष्टी होत्या त्या जोसेफ स्टॅलिनच्या काळातल्या. स्टॅलिन १९५३ साली मेल्यानंतर राष्ट्राध्यक्ष झालेल्या निकिता क्रुश्चेव्हने १९५६ साली स्टॅलिनच्या कृष्णकृत्यांवरचा पडदा दूर करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो तेवढ्यापुरताच. क्रुश्चेव्ह जाऊन ब्रेझनेव्हची राजवट सुरू झाल्यावर रशियाभोवतीच्या गुप्ततेचा पोलादी पडदा पुन्हा उभारला गेला होता. आता मात्र तो पूर्ण उघडला. सरकारी दप्तरखाने नुसते खुले झाले एवढेच नव्हे, तर त्यातल्या गुप्त कागदपत्रांचं संशोधन करायला युरोप अमेरिकेतल्या विद्वानांनासुद्धा परवानगी देण्यात आली.
 
यातून जी प्रचंड माहिती बाहेर आली, तिच्यामुळे सोव्हिएत राज्यपद्धतीचा राक्षसी चेहरा जगासमोर आला. प्रोलटेरिएट ऑफ दि वर्कर्स, कामगारांचे राज्य, श्रमिकांचे, कष्टकर्‍यांचे, शोषित, पीडितांचे, गोरगरीबांचे राज्य म्हणून ज्या सोव्हिएत राज्यपद्धतीचे, साम्यवादी समाजव्यवस्थेचे डिंडिम पिटण्यात आले होते, ते राज्य म्हणजे एक अत्यंत क्रूर, खूनी, रक्तपिपासू राज्य होते, हे जगाला त्यांच्याच कागदपत्रांवरून पुन्हा एकदा समजले. एकट्या स्टॅलिननेच कत्तली केल्या असे नव्हे, तर अगदी सोव्हिएत राज्य संस्थापक व्लादिमीर लेनिनपासूनच कत्तलींचा सिलसिला सुरू झाला होता. चंगेझखान आणि तैमूरलंग यांनी ज्यांच्या मुंडक्यांचे मनोरे रचले; ते निदान त्यांचे शत्रू तरी होते. इथे या साम्यवाद्यांनी शेकडो-हजारो, नव्हे; लक्षावधी स्वबांधवांनाच ‘साम्यवादाचे शत्रू’ असं संबोधून ठार मारलं. स्टॅलिनची राजवट तर अतोनात क्रूर होती. विविध कारणांनी त्याने खरोखर किती माणसं मारली, याची गणतीच नाही. दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरीस १९४५ साली; दोस्त राष्ट्रांच्या बैठकीत स्टॅलिनने स्वत:च्या तोंडाने चर्चिलला, आपण किमान १ कोटी लोक ठार मारल्याचं अभिमानानं सांगितलं होतं आणि स्टॅलिन पुढे १९५३ पर्यंत जिवंत होता व त्याचा खाटिकखाना चालूच होता. परंतु, १९३७-३८ साली स्टॅलिनने जी प्रचंड कत्तल घडवून आणली, ती अति कुप्रसिद्ध आहे. १९३७ सालच्या सुरुवातीला सोव्हिएत पॉलिटब्युरोचा म्हणजे सर्वोच्च मंडळाचा एक मान्यवर प्रतिनिधी रँडेक याला पकडण्यात आले. त्याच्यासह इतर १६ वजनदार नेत्यांवर शासनाला विरोध केल्याबद्दल खटला भरण्यात आला. खटला हे निव्वळ नाटक होतं. रँडेक व इतर तीन जणांना जन्मठेप देण्यात आली. इतर १४ जणांना सरळ गोळ्या घालण्यात आल्या. पुढे काही दिवसांनी रँडेकचा तुरुंगात रहस्यमय मृत्यू झाला. दि. ११ जून १९३७ रोजी सोव्हिएत सैन्यातल्या जनरल तुखाचेवस्की या ख्यातनाम सेनापतीसह जनरल दर्जाच्या आणखी सात सेनापतींना अटक करण्यात आली. शासनाचे शत्रू असण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. लगेच दुसर्‍याच दिवशी त्या आठही जणांना गोळ्या घालण्यात आल्या. यानंतर सोव्हिएत लाल सेनेत प्रचंड ’शुद्धीकरण’ मोहीम उघडण्यात आली. तीन मार्शल दर्जाचे, १३ आर्मी कमांडर दर्जाचे, ५७ कोअर कमांडर दर्जाचे आणि ११० डिव्हिजनल कमांडर दर्जाचे तरबेज अधिकारी ’राज्याचे शत्रू’ ठरवून गोळ्या घालून मारण्यात आले. ज्यांना प्रथम दर्जाचे अधिकारी म्हटलं जातं, त्यांची ही गत; मग दुय्यम व तृतीय दर्जाचे अधिकारी व सामान्य सैनिक यांच्या आकड्यांची फक्त कल्पनाच करायची. दि. २ मार्च १९३८ या दिवशी बुखारिनला पकडण्यात आले. एके काळी बुखारिन हा स्टॅलिनच्याच तोडीचा नेता समजला जात होता, पण त्यालाही ’राज्याचा शत्रू’ ठरवण्यात आले. बुखारिन व रेकोव्ह यांना गोळ्या घालण्यात आल्या. इतर १८ राजकीय नेत्यांना जन्मठेप भोगण्यासाठी सैबेरियात हद्दपार करण्यात आले. स्टॅलिनच्या १९३७-३८च्या या ‘साफसफाई’चे नागरी परिणाम जे काही व्हायचे ते झालेच; पण लष्करी परिणाम जास्त भीषण झाले. कारण दोन-तीन वर्षांतच हिटलरने रशियावर आक्रमण केलं. हिटलरच्या सुसज्ज सेनेला तोंड देण्यासाठी रशियाकडे सेनापतीच नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली. युद्धाच्या पहिल्या फटक्यातच जर्मनीने रशियाची तीन हजार विमानं आणि १२०० रणगाडे नष्ट केले. सहाशे तोफा जिंकल्या आणि एक लाख सैनिक बंदी बनवले. १९४१च्या अखेरीस ठार झालेल्या सोव्हिएत सैनिकांचा आकडा होता ४५ लाख, या सगळ्या हानीला जबाबदार होता स्टॅलिन
 
गोर्बाचेव्ह यांच्या राजवटीत हा सगळा इतिहास अधिकृतपणे बाहेर आला आणि मग वेलुत्सिन आणि पुतीन यांच्या राजवटीत त्याची चर्चा सुरू राहिली. शालेय अभ्यासक्रमातही त्याचा आवश्यक तेवढा भाग समाविष्ट करण्यात आला. ब्लादिमीर पुतीन हे मुळात के.जी.बी. या कुख्यात सोव्हिएत हेर संघटनेत अधिकारी होते. मग ते राजकारणात शिरले. ऑगस्ट १९९९ मध्ये ते रशियाचे पंतप्रधान झाले आणि २००१ मध्ये राष्ट्राध्यक्ष झाले. आता हळूहळू त्यांनी प्रचारमाध्यमांना आवळायला सुरुवात केली आहे. माध्यमांनी सोव्हिएत कालखंडातल्या कत्तलींच्या कहाण्या पुन्हा पुन्हा उकरून काढू नयेत, असं त्यांनी बजावलं आहे. सुरुवातीला सांगितलेल्या इतिहास शिक्षकांच्या परिषदेत आवर्जून हजर राहून, गर्भित धमकीवजा भाषण करताना त्यांनी असं सांगितलं की, ‘‘स्टॅलिनशाहीतल्या जुलमाच्या, कत्तलीच्या कहाण्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उगीच घोळवून सांगू नयेत. कत्तली काही सोव्हिएत राजवटीतच झाल्या असं नाही. जगभर सर्वत्र तेच चाललंय. अमेरिकेने जपानवर लागोपाठ दोन अणुबॉम्ब टाकले ते मानवतावादी कृत्य होतं काय?’’
 
पुतीन एवढ्यावर थांबलेले नाहीत, क्रेमलिनला मान्य असलेली इतिहासाची पाठ्यपुस्तकं प्रकाशित करण्यात आली आहेत. स्टॅलिनच्या क्रूर राजवटीची चर्चा करणार्‍या नि पुतीन हळूहळू अनियंत्रित हुकुमशहा बनण्याच्या मार्गावर आहेत की काय? असे प्रश्र्न उपस्थित करणार्‍या एका पुस्तकावर अलीकडेच बंदी घालण्यात आली. पुतीन यांचं म्हणणं काहीही असलं तरी रशियन नागरिकांना खरं काय ते माहीत आहेच. १९३७-३८ मध्ये स्टॅलिनच्या ’साफसफाई’त बळी गेलेल्या काही लोकांच्या नातेवाईकांनी नुकताच मॉस्कोतल्या के. जी. बी, हेर खात्याच्या (आता याला एफ. एस. बी. म्हणतात) कार्यालयाजवळ चौकातच एक समारंभ घडवून आणला. या कत्तलीला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या लोकांनी आपापल्या आठवणी जागवल्या. त्यातली सर्वात ज्येष्ठ महिला होती ७९ वर्षांची इरिना कालिना. आपले वडील इग्नाती कालिनांचं छायाचित्र आणि कार्नेशन फुलांचा गुलाबी गुच्छ देऊन आलेली इरिना म्हणाली, ‘‘माझे वडील बेलारुस या प्रांताचे परराष्ट्रमंत्री होते. अचानक आम्हा सर्व कुटुंबालाच अटक झाली. वडिलांना हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली जन्मठेपेवर पाठवण्यात आलं. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. बाकी कुटुंबाला कझाकस्तानमधल्या एका गुलागमध्ये म्हणजेच सामूहिक श्रमछावणीत पाठवण्यात आलं. पाच वर्षांनंतर आमची सुटका झाली ती जर्मन सैन्याच्या रेट्यामुळे, तेव्हा आघाडीवर लढायला नि पिछाडीवर काम करायला माणसं पाहिजे होती...’’ सोव्हिएत संघराज्यातल्या एका राज्याच्या मंत्र्याची ही स्थिती, तर सर्वसामान्यांची काय स्थिती असेल! आणि म्हणे हे श्रमिकांचं, कष्टकर्‍यांचं, शोषितांचं राज्य!
 
पण पुतीन म्हणतात, ‘‘हे शिकवू नका. जगभर असंच चाललंय.’’
 
 
 
 
- मल्हार कृष्ण गोखले 
 
@@AUTHORINFO_V1@@