निसर्ग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


चैत्राची चाहूल लागली आहे. पहाटे थोडा वेळ गारवा आणि मग दुपारभर नुसत्या गरम झळा! जीवाची काहिली. वर आग ओकणारा सूर्य, डोळ्यांमध्ये उतरून येतो जणू. निसर्ग उदार किती पण! नाजूक, लुसलुशीत, कोवळी, हिरवी - तांबूस पालवी; निळा, पिवळा, केशरी, गुलाबी अशा किती छटा झाडावर आलेल्या फुलांच्या बहराच्या ! नुसती एक नजर टाकली तरी डोळ्यांचा ताप निवतो. उन्हाच्या काहिलीवर रंगांची हळुवार फुंकर! निसर्गाचा रंगोपचार (colour theropy).
मागोमाग येणारा मोगऱ्याचा बहर. जाई – जुई – सायलीच्या वेलींना फुटणारे धुमारे. मनाचा रखरखाट शांत करणारी सुगंधी पखरण! निसर्गाचा गंधोपचार ( aroma theropy ).
सुख - दुःखाचा असा समतोल निसर्गाकडून शिकावा. रंग आणि सुगंध यांनी भरून काढावी शीतलतेची उणीव ! सृष्टीचक्रातील हा अपरिहार्य तप्त कालखंड, खूप प्रतीक्षेनंतर येणाऱ्या त्या भविष्यकाळातील जलधारांच्या स्मरणात सुसह्य करून घ्यावा.
लांबवर जाणाऱ्या रस्त्यावर सावली धरणारं एक शिरीषाचं प्रगल्भ झाड! नाजुकशी शिरीषाची फुलं! खालून नीट न्याहाळता येत नाहीत. वाऱ्याबरोबर एक फूल गरगर फिरत खाली उतरतं अगदी माझ्यासमोर. माझ्याच नकळत माझी ओंजळ झेलते त्या फुलाला आणि काय करावं याचं? असा विचार फेर धरतो मनात, कवितेच्या ओळी होऊन -
ते फूल मला बोलावी शिरीषाच्या झाडावरचे
जाणार कसे पण, नाही वरदान मला पंखांचे.
माझ्या सीमा जाणोनी, कधी तेच उतरते खाली
हळुवार किती! वाऱ्याने विखुरती तुरे, मखमाली
अगतिकता माझी जेंव्हा, अस्वस्थ मला अति करते
तेंव्हा मी शिरीष फुलाला, पानात वहीच्या जपते.
उत्तर न मिळालेले अनेक प्रश्न अंतर्मनात खोल दडलेले. निसर्गाच्या सान्निध्यात कधी अवचितच त्यांची उत्तरे गवसतात. एका पावसाळ्यानंतर, जमिनीत खोलवर स्वतः ला गाडून घेतलेले लिलीचे कंद, पुढच्या पावसाळ्यात जमिनीतून, जादू घडावी तसे लिलीच्या पांढऱ्या, पिवळ्या, गुलाबी फुलांच्या स्वरूपात आपले अस्तित्त्व दाखवतात, तसेच काहीसे अशा प्रश्नांचे होते. एकमेकांबरोबर अनेक वर्ष घालवूनही, सहजीवनाचा न समजलेला अर्थ, एका अशोकाच्या, फुले न येणाऱ्या झाडावर, उंच चढलेली मधुमालतीची वेल एका क्षणात समजावून जाते.
अशोक वृक्ष वरती होती, मधुमालती लहरत चढली
त्या नाजूक भाराने त्याची, फांदी होती हलके झुकली.
वाऱ्याच्या मृदू फुंकर झुळुका, हळूच त्यांना झुलवत होत्या
कंच पाचूच्या गर्द डहाळ्या, मधुमालती खुलवत होत्या.
फुले कधी ना येती ज्याला, आता फुलांनी होता सजला
निराधार निर्बल वेलीला, जगण्याचा आधार गवसला.
अपूर्णत्त्व हे त्या दोघांचे, आता कोठे उरले होते?
सहजीवन आदर्श असावे कसे? हेच ते सांगत होते.
एखादा समुपदेशक सुद्धा इतक्या कमी वेळात आणि इतक्या प्रभावीपणे समजावू शकला नसता सहजीवनाचा अर्थ!
पानगळती मुळे, आपल्याच पायाशी आपल्या पानांचे आच्छादन. चांगलेच आहे! मुळांचा ओलावा टिकून राहिल ना ! किती सकारात्मकता ! प्राप्त परिस्थितीत, आहे त्यात चांगले शोधणे म्हणजे तरी दुसरे काय ?
अशी किती उदाहरणे. प्रत्येकाची वेगवेगळी. एकाच दृश्याचे अनेक अर्थ ! आपल्या प्रश्नांप्रमाणे प्रत्येकाला मिळणारे वेगळे उत्तर! प्रश्न पडायला हवेत आणि उत्तरे मिळवण्याची इच्छा मात्र असायला हवी. निसर्ग अक्षयपात्र आहे अशा सर्व उत्तरांचे. कधीही ना संपणारे, कधीही निराश न करणारे.
- शुभांगी पुरोहित
@@AUTHORINFO_V1@@