आ. सुरेश भोळे यांचा शासनाकडे पाठपुरावा, अनेक कामे मार्गी लागणार
मुलभूत सुविधा उपलब्ध होणार
जळगाव :
शहर महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या विकास योगनेअंतर्गत सन २०१७-१७ च्या लेखाशीर्षनुसार जळगाव शहरासाठी ५ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. आ. सुरेश भोळे यांनी शहरासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता.
राज्यातील महानगरपालिकांना मुलभूत सोयीसुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येत असते. त्यासाठी आ. सुरेश भोळे हे शासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत होते. बुधवारी शासनाने याबाबत परिपत्रक प्रसिध्द करून राज्यभरातील १४ महानगरपालिकांना ३६७ कोटींचा निधी वितरीत केला. त्यात जळगाव शहरासाठी ५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. आ. सुरेश भोळे यांनी याबाबत माहिती दिली असून शहरातील काही विकासकामे या निधीतून मार्गी लागतील. त्यामुळे सर्वसमावेशक नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांमध्ये भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनपाच्या षड्यंत्राविरोधात नागरिक आ. भोळेंच्या भेटीला
जळगाव : शहरातील टेलिफोन नगरातील सर्व्हे नं.४९८ मधील रहिवाशांनी गुरुवारी आ. सुरेश भोळे यांच्या कार्यालयात जाऊन हे बांधकाम अनधिकृतरित्या असून, शासन स्तरावर हे प्रकरण मांडून शासनाकडून न्याय मिळवून द्यावा यासंदर्भात निवेदन दिले.
रहिवाशांनी शासकीय नियम विसअ ३६१५/१५९५/नवि-११ नुसार राज्यातील शहरांच्या विकास योजनेमध्ये क्रीडांगणासाठी आरक्षित असणार्या जागांमध्ये कोणतेही बदल करण्यात येऊ नये अशी मागणी करतानाच या शासकीय नियमाची महानगरपालिकेकडून कशी पायमल्ली करण्यात आली आहे? हे निवेदनातून मांडले.
या सुखसुविधा भारतीय घटनेच्या कलम ४९ व ५१ नुसार मुलभूत हक्कात मोडत असतांना रहिवाशांना त्यापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र महानगरपालिका व संबंधितांकडून करण्यात येत आहे, तसेच क्रीडांगणे वाचवा व खेडाळू जगवा या केंद्र व राज्य सरकारचे धोरण कसे धाब्यावर बसविण्यात आले आहे? याची सविस्तर माहिती रहिवाशांनी दिली.
याप्रसंगी भूपेंद्र वाणी, सुमित छाजेड, मनिषा बाविस्कर, प्रीती महाजन, रेणुका अग्रवाल, अनिल शिरसाळे, मुरलीधर महाजन, उदय पाटील, लक्ष्मण शिंपी, संदीप काबरा, अविनाश घोडगावकर, दिलीप रंगलानी, मुरलीधर महाजन उपस्थित होते.