पंतप्रधानांकडून प्रकरणाची गंभीर दखल
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सी.बी.एस.ई. बोर्डाच्या १०वी व १२वी पेपरफुटी प्रकरणी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातले असून या प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथे आज मंत्रिमंडळाचे निर्णय जाहीर करण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, पूर्वांचल विकास मंत्री जितेंद्र सिंग व अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार उपस्थित होते.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंत्रालया अंतर्गत एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती यातील दोषींना शोधण्याबरोबरच आगामी काळात करावे लागणारे अत्यावश्यक बदलही सुचवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भातील सर्व तपशील त्यांनाही वेळोवेळी सांगितला जाणार आहे असे त्यांनी सांगितले.
ही खूप दुःखद घटना आहे. या १६ लाख विद्यार्थ्यांची व त्यांची पालकांचे पीडा मी समजू शकतो. मी ही एक पालक आहे. विद्यार्थ्यांची काय मानसिकता असते याची मला पुरेपूर कल्पना आहे असे जावडेकर यावेळी म्हणाले. त्यामुळे ज्या गुन्हेगारांनी हे पेपर लीक केले आहेत त्यांची अजिबात गय केली जाणार नाही. पोलिस लवकरात लवकर दोषींनी पकडतील असा मला विश्वास आहे. ज्याप्रमाणे दहावीच्या पेपर लीक प्रकरणी ४ व्यक्तींनी पकडण्यात आले आहे त्याचप्रमाणे याही प्रकरणात लवकरात लवकर त्यांना पकडले जाईल असे जावडेकर यावेळी म्हणाले.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सी.बी.एस.ई.ची ख्यातील सर्वात शिक्षण क्षेत्रात सर्वात चांगली व सुरक्षित संस्था म्हणून आहे. त्यांची परीक्षा सर्वात निर्दोष परीक्षा म्हणून मानली जाते. मात्र या प्रकारामुळे याही संस्थेला एक डाग लागला आहे. त्यामुळे आम्ही आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ. पोलिसांनी तर एक वेगळे तपास पथक त्यासाठी बनवलेच आहे मात्र आम्ही ही एक अंतर्गत तपास समिती तयार केली आहे. दोन्ही तपासामधून समोर आलेली तथ्ये आम्ही आपल्यासमोर सादर करू. मात्र मी विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. याबाबत पुढील परीक्षा केव्हा होणार याचा निर्णय सी.बी.एस.ई. करेल असे जावडेकर यावेळी म्हणाले.