जामनेर तहसीलदार असतील प्रशासक
शेंदुर्णी, ता. जामनेर :
येथे नव्याने नगरपंचायत स्थापन करण्याबाबतची अधिसूचना बुधवारी शासनाचे उपसचिव कैलास बधान यांनी जाहीर केली आहे. शेंदुर्णीत नगरपंचायत स्थापन होण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सतत पाठपुरावा केला होता. याबाबतची अधिसूचना जाहीर झाल्याने त्यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे.
शेंदुर्णी ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट केले आहे. या क्षेत्राकरिता शेंदुर्णी नगरपंचायत गठीत केली आहे. तसेच नव्याने गठीत शेंदुर्णी नगरपंचायतीची यथोचित रचना होईपर्यंत जामनेर तहसीलदारांची शेंदुर्णी नगरपंचायतीशी संबंधित सर्व अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या घडामोडींसंदर्भात शेंदुर्णी ग्रामपंचायतीला अद्याप शासनाचे कोणतेही पत्र किंवा आदेश प्राप्त झालेले नसल्याचे सरपंच विजया खलसे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. या विषयासंदर्भात राज्य शासनाकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यावर ३१ मार्चपूर्वी कार्यवाही होणे अपेक्षित आहे. राज्य शासनाकडून अधिसूचना जाहीर झाल्याबाबत अद्याप ग्रामपंचायत प्रशासनाला कोणतीही माहिती नसल्याचेही विजया खलसे यांनी सांगितले. दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.