जिल्ह्यासाठी यंदा तीन हजार कोटी रूपयांचा कर्ज आराखडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |

१८७७ कोटी रूपयांच्या पीक कर्जाचा समावेश

खरीप हंगामासाठी १७४५ तर रब्बीकरिता १३२ कोटी रुपये



बुलडाणा : जिल्ह्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध व्हावे. कुठल्याही प्रकारची कमतरता पीक कर्जामध्ये येवू नये, या करिता राज्य शासनाने जिल्ह्यासाठी १ हजार ८७७ कोटी रुपयांचा पिक कर्ज वितरणाचा आराखडा मंजूर केला आहे. तसेच सन २०१८-१९ करिता सर्व प्रकारच्या पिकांसाठी ३ हजार २०० कोटी रूपयांचा कर्ज आराखडा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली आहे. तसेच या कर्ज आराखड्याचे विमोचन देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते काल करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, यावर्षीच्या पीक कर्ज आराखड्यात खरीप हंगामासाठी १ हजार ७४५ कोटी व रब्बी हंगामाकरिता १३२ कोटी रूपयांच्या पीक कर्जाचा समावेश आहे. सन २०१८-१९ मध्ये देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार पीक कर्ज बँकांनी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना द्यावे. येत्या १५ एप्रिल २०१८ पासून नवीन पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावाच्या संलग्नीत बँक शाखेत अर्ज करावे. पीक कर्ज वितरण करताना बँकांनी मेळावे घ्यावेत. महसूल यंत्रणा व सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पीक कर्ज वितरणामध्ये सहकार्य करावे. पीक कर्ज वितरणामध्ये बँकांनी आपल्या प्रत्यक्ष कर्ज वितरण प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करावे. अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
गेल्या वर्षी एकूण कर्ज आराखड्यामध्ये १४५८ कोटी रूपये कृषि कर्जासाठी होते. त्यामध्ये यावेळी वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ४८ शाखांमार्फत, बँक ऑफ महाराष्ट्र २३ शाखा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया २२ शाखांमधून, विदर्भ ग्रामीण विकास बँक २८ शाखांमधून, जिल्हा केंद्रीय सहकारी बँक ७० शाखांमधून, आयसीआयीआय ७ शाखांमधून, एचडीएफसी ८ शाखांच्या माध्यमातून कर्ज वितरण करण्यात येणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
@@AUTHORINFO_V1@@