भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ राज्यभर मोर्चे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |

 
 
सांगली : ज्येष्ठ हिंदुत्ववादी नेते व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या सन्मानार्थ विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून आज राज्यभरात सन्मान मोर्चे काढण्यात आले. १ जानेवारी नंतर कोरेगाव-भीमा येथे उसळलेल्या दंगलींना संभाजी भिडे गुरुजींना जबाबदार धरण्यात आल्याच्या विरोधात हे मोर्चे काढण्यात आले होते. विविध जिल्ह्यांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून शांततेत काढण्यात आलेल्या या मोर्च्यांमध्ये हजारो तरुणांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला. 


सांगली, सातारा, पुणे, नाशिक, नगर आणि नागपूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हे मोर्चे काढण्यात आले. पुण्यासह मुंबई आणि काही जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी या मोर्चांना परवानगी नाकारली होती मात्र तरी देखील मोर्चेकरी विविध ठिकाणी जमून भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ घोषणा देत असल्याचे चित्र दिसत होते. पुण्यामध्ये नदीपात्रात कार्यकर्त्यांनी एकत्र जमून ठिय्या आंदोलन केले व नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.


'भिडे गुरुजींना बदनाम करण्यासाठी काही समाजकंटकांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आपल्या वैयक्तिक द्वेषापोटी हे लोक भिडे गुरुजींवर विनाकारण आरोप लावत आहेत. परंतु गुरुजी हे पूर्णपणे निर्दोष आहेत.' अशी भावना मोर्चेकरांकडून व्यक्त करण्यात आली. 


सांगली हे भिडे गुरुजींच्या कामाचे केंद्रस्थान असल्यामुळे राज्यभरातून सर्वांचेच लक्ष सांगलीच्या मोर्च्याकडे लागले होते. सांगली शहरामध्ये आज दुपारी मोर्चाला सुरुवात झाली. भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले. हातामध्ये भगवे झेंडे घेऊन गुरुजींच्या सन्मानार्थ घोषणा दिल्या.




मुंबई आणि पुण्यामध्ये ठिय्या आंदोलन :
 
मुंबई आणि पुण्यामध्ये मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मोर्चेकऱ्यांकडून ठिय्या आंदोलन केले. पुणे शहरातील प्रसिद्ध शनिवारवाड्याजवळील परिसरात आणि नदीपात्रामध्ये मोर्चेकऱ्यांनी आपला ठिय्या मांडला असून भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तर तिकडे मुंबईमध्ये आझाद मैदानावर परवानगी नाकारल्यामुळे ठिकठिकाणी मोर्चेकऱ्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
 

 

(पुण्यातील नदी पात्रामध्ये जमलेले मोर्चेकरी ) 




(मुंबईमध्ये सुरु असलेले ठिय्या आंदोलन )
 
साताऱ्यातही मोठ्या प्रमाणावर मोर्चा निघाला. संभाजी भिडे यांच्यावर आरोप करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या नावाने घोषणा देण्यात येत होत्या. सर्व धारकरी पांढऱ्या गांधीटोप्या डोक्यावर घालून भर दुपारी उन्हातही मोर्च्यामध्ये सहभागी झाले होते. सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये भिडे गुरुजींचे काम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे साताऱ्यातील मोर्च्यामध्ये तरुण मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले पाहायला मिळाले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@