महानगरी मुंबईत मेट्रोयुगाला प्रारंभ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018   
Total Views |

मुंबईमध्ये सर्वत्र मेट्रोकामांनी वेग घेतला असून पुढच्या वर्षीपर्यंत मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे मुंबईतील मेट्रो मार्गांच्या प्रगतीवर टाकलेली ही एक नजर...
 
वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो १ सेवेने २०१४ मध्ये मुंबईत उशिरा का होईना, पण मुंबईत मेट्रोयुग सुरू झाले. पण, देशातील इतर शहरांमध्ये त्यापूर्वी कित्येक वर्षांपासून मेट्रो धावतच होती. कोलकातामध्ये प्रथम मेट्रो १९८४ मध्ये, त्यानंतर चेन्नईमध्ये १९९५ मध्ये व दिल्लीत २००२ मध्ये सुरू झाली.
 
 
पण, आता मात्र परिस्थिती बदलली आहे. कारण, पुढील दोन ते चार वर्षांत विद्यमान राज्य सरकारकडून मुंबईतील मेट्रोचा तब्बल ३०० किमीचा विकास साधला जाईल. तेव्हा मुंबईतील एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यात पोहोचण्यासाठी फक्त अर्धा ते पाऊण तासांचा अवधी लागेल. २०१८-१९ सालामधील एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पातही मेट्रो प्रकल्पांसाठी पाच हजार कोटींची घसघशीत तरतूद करण्यात आली आहे. त्यावरुन राज्य सरकार मेट्रो प्रकल्प किती गांभीर्याने घेत आहे, त्याचा परिचय येतो. त्याचबरोबर मुंबई, नवी मुंबई आणि एकूणच मुंबई महानगर क्षेत्रात बस, रेल्वे, मेट्रो अशा विविध सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमांतून प्रवास करिण्याकरिता एक सर्वसमावेशक कार्डही लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
 
मेट्रोचे फायदे 
 
रेल्वे वाहतूक जरी लोकप्रिय असली व एका शहरातून दुसर्‍या शहराकडे वा उपनगरांकडे जाण्याचे उत्तम तसेच जलद साधन मानले गेले, तरी मुंबईच्या उपनगरीय रेल्वेची गर्दी कमी झालेली नाही. वर्षानुवर्षे त्यामध्ये केवळ लाखोंची भर पडताना दिसते. रेल्वेची गर्दी न हटता, अपघातांचे प्रमाण मात्र वाढते आहे. त्यामुळे मुंबईतील उपनगरीय लोकल सेवेचा भार हलका करण्यासाठी, गर्दी कमी करण्यासाठी मेट्रो अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
 
शहरात मेट्रोचे विस्तृत जाळे उभारले जात आहे व हे मेट्रो मार्ग अगदी घरापासून अर्धा ते १ किमी अंतरावर असणार आहेत. प्रवाशांचा लोंढा वेगाने नेण्याची क्षमता मेट्रोकडे आहे. मेट्रो रुळावरून जात असल्याने रस्त्यावरील अडथळे तिच्याआड येत नाहीत. जास्त क्षमतेची मेट्रो एका दिशेला ९० हजार प्रवासी वेगाने नेऊ शकते. अशी मेट्रो मुंबई व दिल्ली शहरांकरिता योग्य आहे. वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर आता रोज चार लाख प्रवासी प्रवास करतात. मेट्रोच्या वापराने रेल्वेच्या प्रवाशांची गर्दी कमी होईलच, पण मुंबईतील पश्चिम-पूर्व भाग या मेट्रो-१ ने जोडले आहेत. असेच जोडणारे इतर मेट्रो मार्ग म्हणजे मोनो रेल, मेट्रो २ ब व मेट्रो ६.  मेट्रो ही इलेक्ट्रिक इंधनावर चालते. पेट्रोलियम इंधनामुळे हवेत विषारी उत्सर्जनामुळे हवा प्रदूषित होते, पण तसे मेट्रोमुळे होत नाही. मेट्रोमध्ये आधुनिक अंकीय तंत्रज्ञान वापरले जाते म्हणजे गाड्यांचे जाणे-येणे वेळापत्रकाप्रमाणे ठेवता येते. त्यामुळे ते प्रवाशांच्या अधिक सोईचे व लोकप्रिय ठरले आहे.
 
मेट्रो वापरातून रस्त्यावरील मोटारवाहनांच्या संख्येत घट झाल्यामुळे विषारी उत्सर्जनातही घट होईल. मेट्रोच्या प्रकल्पांची प्रगती काय आहे ते आपण तीन विभागांच्या आधारे बघूया.
 
पहिला विभाग : मेट्रो रेल सेवेत रुजू-
 
८ जून २०१४ रोजी वर्सोवा ते घाटकोपर ही ११.४ किमी मेट्रो सेवा सुरू झाली. या प्रकल्पाचा एकूण खर्च रु. ४,३२१ कोटी असून ही सेवा अतिशय लोकप्रिय ठरली आहे.
 
प्रवाशांच्या फेर्‍या : ४ जुलै २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ३० कोटी प्रवाशांनी या मेट्रोने प्रवास केला. हा मुंबई मेट्रोक्षेत्रात उच्चांक मानला जातो. सध्या मेट्रो गर्दीच्यावेळी साडे तीन मिनिटाच्या फरकाने व तासाला २५ हजार प्रवासी, अशा सक्षमतेने फिरत आहे.
 
मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर पहिले १० कोटी प्रवासी ३९८ दिवसांत, पुढील १० कोटी ३८८ दिवसांत व त्यानंतरचे १० कोटी प्रवासी ३३७ दिवसांतच नोंदले गेले.
 
मेट्रोची सुरक्षा : सध्या मेट्रोला महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे कवच आहे व ६९० जवान स्थानकावर तैनात आहेत. सध्या महिन्याला सुरक्षेकरिता दीड कोटी रुपये खर्च केले जातात. मेट्रोचालकांनी मेट्रोचा प्रवास सुरक्षित होण्याकरिता सेक्युकेअर मोबाईल अॅप सुरू केले आहे. संकटप्रसंगी या अॅपचा खचित उपयोग होईल.
 
मेट्रोची प्रस्तावित भाडेवाढ रद्द : मेट्रो रेल तोट्यात चालली आहे, या सबबीने मेट्रोचालकांनी दुसर्‍यांदा प्रस्तावित केलेली भाडेवाढ उच्च न्यायालयांनी रद्द ठरविली आहे. तसेच मेट्रोचे दर सर्व मेट्रोंसाठी समान अपेक्षित आहेत.
 
दुसरा विभाग : - बांधकाम सुरू :
 
१. मोनो रेल टप्पा १ चेंबूर ते वडाळा ८.४ किमी उन्नत मार्ग दि. १ फेब्रुवारी २०१४ ला सेवेत रुजू झाला होता. पण, संकटांमुळे बंद पडलेले काम लवकरच सुरू होणार आहे.
 
आगीचे संकट : दुर्दैवाने दि. ९ ऑक्टोबर, २०१७ ला मोनोगाडीच्या दोन डब्यांना आग लागली तेव्हापासून मोनोरेल सेवा बंद आहे. चौकशी समितीने चालक कंत्राटदार स्कोमीच्या आठ अधिकार्‍यांना या दोन डब्यांच्या मोठ्या अग्निदुर्घटनेकरिता जबाबदार धरले आहे. टायर सपाट होऊन घर्षणातून ही घटना घडली असावी, असा तर्क केला आहे. गाडीत फायर स्मोक डिटेक्टर बसवायला हवेत. संकटप्रसंगी अनेक गोष्टींची उपलब्धी हवी, असे शेरे पण समितीने दिले आहेत.
 
२. मोनो रेल - टप्पा २ : वडाळा ते जेकब सर्कल ११.२ किमी दुसर्‍या टप्प्याच्या उन्नत मार्ग- कामाकरिता चाचण्या व काही कामे बाकी आहेत. मोनो-२ साठी डब्यांची कमतरता आहे, असे समजते. मोनो रेल टप्पा १ व २ ची संकटे व समस्या दूर झाल्या की एमएमआरडीएच्या धोरणाप्रमाणे दोन्ही मार्ग एकदम सुरू करण्याचे प्रयत्न होऊन ही मोनो बहुतेक एप्रिल-मे मध्ये सुरू होईल. आता दोन होतकरू कंत्राटदारांनी (आयएलएफएस व रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर) निविदांना प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या निविदा बोली रु. एक हजार कोटींपर्यंत येणे व १० वर्षे मोनो सांभाळणे अपेक्षित आहे. मोनोचे (चेंबूर ते जेकब सर्कल) किमान व कमाल भाडे अनुक्रमे रु. १० व रु. ४० असेल.
 
३. मेट्रो ७ : दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व १६.५ किमी, उन्नत मार्ग, स्थूल अंदाज खर्च रु. ६२०८ कोटी. समाप्तीकाल २०१९ साल.
 
४. मेट्रो २ अ : दहिसर पश्चिम ते डीएननगर १८.५ किमी., उन्नत मार्ग, स्थूल अंदाज खर्च रु. ६४१० कोटी. समाप्तीकाल २०१९ साल. प्रकल्प जागेचा अडथळा टाळण्याकरिता व वेळेची बचत करण्याकरिता स्थानकाच्या फलाटाकरिता प्रिकास्ट बहाले (pie girders) वापरण्याचे ठरले आहे.
 
५. मेट्रो ३: कुलाबा-वांद्रे-सीप्झ ३३.५ किमी., भूमिगत मार्ग, स्थूल अंदाज खर्च रु. २३ हजार १३६ कोटी. समाप्तीकाल २०२१-२२ साल.
 
६. नवी मुंबई मेट्रो : बेलापूर ते पेंदार ११.१ किमी. उन्नत. खांदेश्वर-तळोजा ७.१ किमी व पेंदार-तळोजा ३.९ किमी असे विस्तारित मार्गही मंजूर केले आहेत. समाप्तीकाल २०१९
 
तिसरा विभाग : मेट्रोच्या कामांना मान्यता व कामे लवकरच सुरू होणार.
 
१. मेट्रो २ ब : डीएननगर ते मानखुर्द २३.५ किमी., उन्नत व अंशत: भूमिगत मार्ग, स्थूल अंदाज खर्च रु. १० हजार ९८६ कोटी. काम अवधी - सुरू झाल्यापासून तीन-चार वर्षे व समाप्तीकाल २०२१-२२ साल.
 
२. मेट्रो ५ : ठाणे-भिवंडी-कल्याण २४ किमी., उन्नत मार्ग, स्थूल अंदाज खर्च रु. ८४१६ कोटी. कामअवधी - सुरू झाल्यापासून तीन-चार वर्षे व अंदाजे समाप्तीकाल २०२१-२२ साल.
 
३. मेट्रो ६ : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-कांजूरमार्ग, १४.५ किमी. उन्नत मार्ग, स्थूल अंदाज खर्च रु. ६६७२ कोटी. कामअवधी - सुरू झाल्यापासून तीन-चार वर्षे व समाप्तीकाल २०२१-२२ साल.
 
४. मेट्रो ९ : दहिसर-मीरा रोड-भाईंदर, १२.५ किमी. उन्नत मार्ग, स्थूलअंदाज खर्च रु ६५१८ कोटी. कामअवधी - अंदाजे तीन-चार वर्षे व समाप्तीकाल २०२१-२२ साल.
 
५. मेट्रो ४ : वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली, ३२ किमी. उन्नत मार्ग, स्थूल अंदाज खर्च रु. १४ हजार ५४९ कोटी. कामअवधी - अंदाजे तीन-चार वर्षे व समाप्तीकाल २०२१-२२ साल. हा कासारवडवलीचा मार्ग गायमुखपर्यंत व भिवंडीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मेट्रोमार्गिका जोडीकरिता ठाणे शहरातील जलद वाहतूक यंत्रणा (PRTS) राबविली जाईल.
 
६. मेट्रो ८ (मेट्रो ४ वाढीव): वडाळा-जीपीओ (हुतात्मा चौक), ८ किमी उन्नत व अंशत: भूमिगत मार्ग, स्थूल अंदाज खर्च रु. २५०० कोटी. कामअवधी - सुरू झाल्यापासून दोन-चार वर्षे व समाप्तीकाल २०२१-२२ साल.
 
७. तेज मेट्रो : ४० किमी उन्नत व अंशत: भूमिगत मार्ग. दोन विमानतळे २४ तासांच्या व ताशी ९० किमी. वेगाच्या जोडप्रवासाकरिता उपयोगी ठरेल. स्थूल अंदाज खर्च रु. १८ हजार कोटी. अंदाजे समाप्ती काल २०२१-२२
 
मेट्रोचे काम करणार्‍यांनी सुरक्षिततेकडे, पर्यावरणाची नासाडी व वाहतूक खोळंबा होऊ नये शिवाय अपघात होणार नाहीत याकडे जास्त लक्ष द्यावे. वृक्षतोड करू नये व केली तर दुप्पट झाडांची लागवड करावी. मेट्रो कारशेडच्या व मेट्रो डब्यांकरिता समस्या उद्भवल्या तर त्या लवकर सोडवाव्यात. जमीन खणताना जवळच्या इमारतींना धोका निर्माण करू नये.
 
 
 
- अच्युत राईलकर
 
@@AUTHORINFO_V1@@