बलिदानाची शौर्यगाथा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018   
Total Views |
 
 
 
जगभरात धर्मांध जिहादींनी थैमान घातलेले असतानाच गेल्या शुक्रवारी फ्रान्समध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. त्यानंतर जगभरातून या हल्ल्याचा निषेधही करण्यात आला. परंतु, या हल्ल्यानंतर फ्रान्सचे पोलीस अधिकारी कर्नल आर्नोड बेलट्रामे यांच्या नावाची विशेष चर्चा होत आहे. कारण त्यांनी देशासाठी, जनतेसाठी, एका महिलेच्या प्राणरक्षणासाठी दिलेले बलिदान...!
 
सीरिया, इराकसारख्या युद्धग्रस्त देशांतील निर्वासित मुस्लिमांना आश्रय देण्यात आघाडीवर असलेल्या युरोपीय देशांमध्ये फ्रान्सचा वरचा क्रमांक लागतो. फ्रान्सच्या अध्यक्षपदासाठी २०१७ साली झालेल्या निवडणुकीवेळीही निर्वासित मुस्लिमांचा मुद्दा गाजला होता. राजकीय पटलावर फ्रान्समधील राष्ट्रवादी नेत्यांनी निर्वासित मुस्लिमांना विरोध करत त्याआधारे मतेही मागितली. मात्र, जनतेने जहाल राष्ट्रवादी नेत्यांना नाकारत इमॅन्युएल मॅक्रॉन यांना अध्यक्षपदी बसवले. एकीकडे फ्रान्समध्ये सत्तांतर होत असतानाच निर्वासित मुस्लीम समुदायाला आश्रय देण्याचे आणि त्यांनी फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ले घडविण्याचे सत्रही सुरूच होते. नुकत्याच फ्रान्समध्ये झालेल्या या हल्ल्यामध्ये निर्वासित मुस्लिमांपैकी कोणाचा हात होता वा या हल्ल्यातील दहशतवादी रेडुअन लकदीम हा नेमका कोण होता याची माहिती समोर आलेली नसली तरी ज्या फ्रान्सने निर्वासित मुस्लिमांना आश्रय दिला, त्या फ्रान्सलाही दहशतवादी संघटनांनी आपल्या क्रौर्यापासून दूर ठेवले नसल्याचे प्रत्यंतर सगळ्या जगाला २३ मार्च रोजी आले.
 
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव ऍन्टोनियो गुतेरेस यांनी या हल्ल्याचा निषेध करत फ्रान्स सरकारला सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्र्वासन दिले. शिवाय फ्रान्सच्या सुरक्षा दलांनी ज्याप्रकारे या हल्ल्याचा प्रतिकार केला, त्याची प्रशंसादेखील केली.
 
दहशतवादी हल्ला झाला की, हल्लेखोरांचे वार छातीवर झेलत सर्वसामान्यांचा जीव वाचवणार्‍या जवानांची नक्कीच आठवण येते. आपल्या जीवाची बाजी लावत देशावर आलेले संकट कुठल्याही परिस्थितीत परतवून लावण्याचेच ध्येय जवानांच्या ध्यानीमनी असते. मग तो जवान भारतीय असो वा परदेशातला. फ्रान्समध्येही तसेच झाले. फ्रान्सच्या टुलो शहरातल्या सुपरमार्केटमध्ये शुक्रवारी काही हत्यारबंद दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी पोलिसांनी हल्लेखोरांना घेरत त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. यादरम्यानच हल्लेखोर दहशतवाद्यांनी सुपरमार्केटमधील एका महिलेला ओलीस ठेवले. त्यावेळी आपल्या जीवावर उदार होत कर्नल आर्नोड बेलट्रामे यांनी त्या महिलेला सोडून देण्याच्या बदल्यात स्वतःलाच दहशतवाद्यांच्या हवाली केले. त्यानंतर दहशतवाद्यांनी आर्नोड बेलट्रामे यांच्या गळ्यावर गोळी मारली. गोळी मारल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या आर्नोड यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. देशासाठी, सर्वसामान्यांसाठी, एका महिलेच्या प्राणरक्षणासाठी बलिदान देण्याची त्यांची ही वृत्ती सलाम करण्यासारखीच...! आर्नोड बेलट्रामे यांच्या या बलिदानावर भाष्य करत त्यांचा पराक्रम, त्यांचे बलिदान, त्यांची वीरता फ्रान्सच्या नागरिकांच्या सदैव स्मरणात राहील, असे फ्रान्स सरकारमधील मंत्र्याने म्हटले.
 
आर्नोड बेलट्रामे हे फ्रान्सच्या सुरक्षा दलातील जिगरबाज अधिकारी म्हणून ओळखले जात असत. २००३ साली ते पोलिसांच्या स्पेशल फोर्समध्ये दाखल झाले आणि २००५ मध्ये त्यांना युद्धामुळे होरपळणार्‍या इराकमध्येही पाठविण्यात आले होते. २०१२ साली ते प्रेसिडेन्शियल गार्डचे सदस्यही होते. आपल्या पोलीस सेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल, त्यांच्या कामगिरीचा सन्मान करत फ्रान्स सरकारने त्यांना देशाच्या ’द ऑर्डर ऑफ मेरिट’ या सर्वोच्च पुरस्कारानेही गौरवले होते. आता आर्नोड बेलट्रामे यांच्या दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूने फ्रान्सची जनता एका धाडसी जवानाला तर मुकली आहेच पण ही जनता या हल्ल्यातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठीही नक्कीच उतावीळ झाली असेल.
 
 
 
 
- महेश पुराणिक

 
 
@@AUTHORINFO_V1@@