पदयात्रेवर तुफान दगडफेक करणार्‍या ३० जणांवर गुन्हे

    27-Mar-2018
Total Views |

अडावद दगडफेकप्रकरणी पोलिसांची कारवाई; सीसीटीव्ही फुटेज तपासले

 
 
अडावद, ता. चोपडा :
गडावर जाणार्‍या भाविकांची पदयात्रा अडवून वाद्य वाजवण्यास मनाई करत भाविकांच्या वाहनांवर दगडफेक केल्याप्रकरणी अडावद पोलिसांनी ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून सार्वजनिक शांततेचा भंग करणार्‍यांविरुद्ध रात्री उशिरा कारवाई केली. ही घटना २५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली होती.
 
 
येथील माळीवाड्यातील रवींद्र रामकृष्ण महाजन, किशोर नामदेव महाजन, निवृत्ती लोटन महाजन, अविनाश बापू महाजन यांच्यासह १५ ते २० जण छोटा हत्ती वाहनाच्या पुढे श्रीरामाचे बॅनर लावून सप्तश्रृंगी गडावर पदयात्रेने निघत होते. कामधेनू दूध उत्पादक संस्थेच्या रस्त्याने जात असताना मन्यार मोहल्ल्याजवळ १० ते १५ जणांनी पदयात्रेकरुंच्या वाहनाला अडवले. त्यांनी वाद्य वाजवण्यास मनाई केल्याने याठिकाणी वाद उद्भवला होता. त्याच वेळी पदयात्रा अडवणार्‍यांनी भाविकांच्या वाहनांवर दगडफेक केली होती. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या घटनेची माहिती होताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वेळीच हस्तक्षेप केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. दोन्ही गटाच्या लोकांची पोलिसांनी समजूत काढून हा वाद मिटवला होता. गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनीही पुढाकार घेऊन लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. रामनवमीच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने अफवांचे पेव फुटले होते. विशेष खबरदारी म्हणून पोलिसांनी गावात तगडा बंदोबस्त ठेवला होता. डीवायएसपी वाघमारे तळ ठोकून होते.
 

यांच्याविरुद्ध गुन्हा - सायंकाळी रामनवमीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन असल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. मिरवणूक आटोपल्यावर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून वाद घालणार्‍या उपद्रवी लोकांची ओळख पटविली. या घटनेबाबत रात्री उशिरा गोपनीय शाखेचे पो.कॉं. संदीप चतूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात रवींद्र महाजन, किशोर महाजन, निवृत्ती महाजन, अविनाश महाजन यांच्यासह १० ते १५ इसम तसेच दुसर्‍या गटाचे हसन खान पठाण, गुलाम नबी मन्यार, शेख रज्जाक शेख समत, सादिकअली न्याजअली, शेख रफिक शेख रशीद, मजहर उर्फ गुड्डू शेख सलिमोद्दीन, वसीम सलीम तेली यांच्यासह १० ते १५ जणांविरुद्ध भादंवि कलम ३४१, १४३, १४७, १४९, ३३७, ४२७, मु.पो.का. कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.